मिलिंद कुलकर्णीसज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे ब्रीदवाक्य असलेले पोलीस दल खरोखर त्याला जागते काय, असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळेच तसे आहेत, असे नाही. परंतु, मोजके असतील, पण त्यांचे उपद्रवमूल्य मोठे आहे.जळगाव पोलीस दलात तर वर्षभरापासून अशा पाच घटना उघडकीस आल्या आहेत. मुख्यालयातील परवेज शेख या कर्मचाऱ्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. योगेश वाघ या कर्मचाºयाने महिलेच्या घरात घुसून छेडखानी केल्याचा गुन्हा दाखल आहे. सागर रमजान तडवी याच्याविरुध्द सहकारी कर्मचाºयाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप असून याच कारणावरुन सहकारी कर्मचाºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली. मुक्ताईनगरातील कर्मचाºयाने सहकारी महिलेला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आणि आता विनोद अहिरे या कराटे, स्केटींगचे प्रशिक्षण देणाºया कर्मचाºयाविरुध्द एका खेळाडू विद्यार्थिनीने अत्याचाराची तक्रार नोंदविली आहे.‘मी टू’चे अभियान तर वर्षभरापूर्वी सुरु झाले, पण त्यापूर्वी पीडित महिलांनी हिंमतीने समोर येत पोलीस कर्मचाºयांविरुध्द तक्रार दिली आहे. अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. पोलीस दल आणि खाकी वर्दीची भीती एवढी आहे, की सामान्य माणूस अन्याय निमूटपणे सहन करतो. त्याची वाच्यता करीत नाही. त्यामुळे पोलीस दलातील काही मोजके लोक त्याचा गैरफायदा घेतात. विनोद अहिरे हा कराटे, स्केटींगचा प्रशिक्षक आहे. पोलीस दलाने त्याच्यासाठी चांगले मैदान तयार करुन दिले. खेळाला प्रोत्साहन मिळावे, म्हणून त्याला कोठेही बदली दिली नाही. निवासस्थानासाठी अनेक कर्मचारी प्रतिक्षा यादीवर असताना विनोदला तातडीने निवासस्थान मिळाले. त्याचा गैरफायदा त्याने घेतला आणि पोलीस दलाला बदनाम केले.खाकी वर्दी आणि कायद्याचा धाक दाखवत पोलीस दलातील काही कर्मचाºयांकडून अनैतिक कामे सुरु असतात, हे अशा घटनांमधून ठळकपणे समोर येते.पोलीस दलासोबत राजकीय मंडळी एकत्र आली तर कहर झाला असे समजायला हरकत नाही. सत्ताधारी मंडळी पोलीस दलाचा पुरेपूर उपयोग करुन घेते. उद्योजक, व्यावसायीक मंडळी गुन्हे, बदनामी टाळण्यासाठी मग या अभद्र युतीची मदत घेते. ही ‘अर्थपूर्ण’ मदत फळाला आल्याशिवाय राहत नाही.जळगावकरांनी याचा अनुभव नुकताच घेतला. महापालिका निवडणुकीनंतर ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या तरुणांच्या गाडीला अपघात झाला. अपघातातील दुसरी गाडी शहरातील मोठ्या व्यावसायिकाची होती. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांविरुध्द गुन्हा दाखल झाला, पण दुसºया वाहनातील व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झालाच नाही. मृत तरुणांच्या नातेवाईकांनी अधिकाºयांना निवेदने दिली, पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले. पण काही उपयोग झाला नाही.दुसºया घटनेत एका राजकीय नेत्याचा नातलग असलेल्या हॉटेल व्यावसायिकाने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार औरंगाबाद रस्त्यावर केला. आधी दोन मोटारसायकलस्वारांना धडक दिली. ते मागे लागल्यावर या व्यावसायिकाने बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना धडक दिली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आरोपी पसार झाला आणि रुग्णालयात दाखल झाला. सामान्य गुन्हेगाराला आणि ‘व्हीआयपी’ आरोपीला मिळणारी ‘ट्रीटमेंट’ लोकांच्या लक्षात येत नाही, असा समज परवाच्या घटनेने दूर केला असावा. अपघातग्रस्त वाहन आरोपीला परत करण्यात आल्यावर पोलीस स्टेशनमधून ते क्रेनद्वारे जळगावला नेत असताना गाडेगाव येथे काही जणांनी ते वाहन पेट्रोल टाकून जाळले. क्रेनचालकाला बाहेर काढून हा प्रकार घडला. जनतेच्या मनातील उद्रेकाची ही घटना म्हणजे एक उदाहरण आहे. या घटनेचे समर्थन अजिबात होऊ शकत नाही, पण सातत्याने अन्याय होत असलेला दुर्बलदेखील कडेलोट झाल्यावर अशी कृती करतो, हे लक्षात घ्यायला हवे.पोलीस दल, राजकीय पक्ष, धनदांडग्या मंडळींनी या घटनेपासून बोध घ्यावा, एवढेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.
सज्जनांचे रक्षण होतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:59 PM