अटक झाली खरी पण उशिराच!

By admin | Published: December 23, 2016 11:51 PM2016-12-23T23:51:12+5:302016-12-23T23:51:12+5:30

पापाचा घडा भरावा लागतो हेच खरे. मग तो महाभारतातील शिशुपाल असो, की नाशकातील माजी खासदार राष्ट्रवादीकार देवीदास

Arrested, but late! | अटक झाली खरी पण उशिराच!

अटक झाली खरी पण उशिराच!

Next

पापाचा घडा भरावा लागतो हेच खरे. मग तो महाभारतातील शिशुपाल असो, की नाशकातील माजी खासदार राष्ट्रवादीकार देवीदास पिंगळे असोत!
कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकरी हितासाठी व त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून अस्तित्वात आल्या असल्या तरी या मूळ हेतुलाच हरताळ फासून आपण नाशिकच्या समितीचे जणू तहहयात मालक आहोत अशा अविर्भावात देवीदास पिंगळे यांनी बेगुमान पद्धतीने तेथला कारभार चालविल्याच्या अनेक तक्रारी होत्या. विविध स्तरांवर चौकशाही सुरू होत्या; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील उच्चपदस्थांच्या मागे लपून आतापर्यंत प्रत्येक वेळी पिंगळे सहीसलामत बाहेर पडण्यात यशस्वी ठरले होते. कदाचित त्यामुळेच हुरूप वाढलेल्या पिंगळे यांनी शेतकऱ्यांच्या पाठोपाठ बाजार समितीमधील गरीब कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथेच त्यांच्या पापाचा घडा भरला म्हणायचे. कारण या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे अखेर त्यांना अटक केली गेली आहे.
सहकार क्षेत्रातील लुटमारीची उदाहरणे कमी नाहीत. संचालक म्हणून ज्यांच्या हाती या संस्था सोपविल्या जातात त्यांनी विश्वस्त म्हणून काम पाहाणे अपेक्षित असते. परंतु तेच या संस्थांचा गळा घोटायला निघतात आणि यंत्रणांवर दबाव आणून स्वत:चा बचाव करून घेतात त्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत असते. यात ठिकठिकाणी काही मान्यवरांची मातब्बरी सर्वज्ञात असून, त्यात नाशिकच्या देवीदास पिंगळे यांचेही नाव घेता येणारे आहे. विधान परिषदेची आमदारकी व त्यापाठोपाठ खासदारकी भूषविलेले पिंगळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक सहकारी साखर कारखाना व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या नाशिक जिल्ह्याच्या सहकारातील आघाडीच्या संस्थांमध्ये सत्ताधारी राहिले. पण त्यांच्या कार्यकाळात यापैकी कोणतीही सहकारी संस्था वादातीत राहू शकली नाही. संस्था आणि पिंगळेदेखील नेहमी कोणत्या ना कोणत्या चौकशांना सामोरे जात राहिले. यातील जिल्हा बँकेत गेल्या वेळी अवघ्या एका मताने त्यांना पराभव स्वीकारून बाहेर व्हावे लागले तर ‘नासाका’ म्हणजे नाशिक सहकारी साखर कारखाना तोट्यामुळे मोडीत निघाला. आता एकमेव बाजार समिती त्यांच्या हाती उरली असून, तेथे सुमारे पंधरा वर्षांपासून त्यांची सत्ता आहे. परंतु तेथील एककल्ली कारभाराबद्दल होणाऱ्या अनेकविध आरोपांनी पिंगळे यांची पाठ सोडलेली नसून तेथीलच एका नव्या प्रकरणामुळे अखेर त्यांना ‘आत’ जाण्याची वेळ आली आहे.
नाशिक बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांकडून जी ५७ लाखांची बेहिशेबी रोकड प्राप्त करण्यात आली, ती पिंगळे यांना देण्यासाठीच नेली जात होती, याचे पुरावे उपलब्ध झाल्याने त्यांना अटक केली गेली. परंतु सदर घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वीची आहे. याचबरोबर बाजार समितीमधील काही कर्मचाऱ्यांच्या बोनस व भविष्यनिर्वाह निधीचे पैसेही परस्पर बँकेतून काढले गेल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे आहे. हा प्रकार दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले गेले. यावरून पिंगळेंच्या अटकेला विलंब झाल्याचेच म्हणता यावे.
विशेष म्हणजे, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अगोदरच माजी खासदार समीर भुजबळ ‘आत’ गेलेले असताना आता पिंगळे यांच्यावरही तीच वेळ आली. भुजबळ व पिंगळे हे दोघे नाशिकचे माजी खासदार. शिवाय एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. त्यामुळे त्यांच्या अटकेची बाब केवळ नाशिकलाच बट्टा लावणारी नसून त्यांच्या पक्षालाही कमीपणा आणून देणारी आहे. परंतु तरी हा पक्ष मूग गिळून गप्प राहिला तर आश्चर्य वाटू नये, कारण अशांच्या पाठराखणीत या पक्षाचेच मोठे योगदान आहे. आजवर अशा कोणत्याही नेत्यास दटावण्याचे सोडा, साधा जाब विचारण्याचे धारिष्ट्यही हा पक्ष दाखवू शकलेला नसल्याने आता वेगळी अपेक्षाही करता येणारी नाही.
- किरण अग्रवाल

Web Title: Arrested, but late!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.