किरण अग्रवालमुले ही देवाघरची फुले, असे म्हणत उद्याचे भविष्य त्यांच्यात दडल्याचे उत्सवी सूर एकीकडे आळविले जात असताना, दुसरीकडे उमलण्याआधीच कोमेजू पाहणाऱ्या या फुलांची वर्तमानातील स्थिती संवेदनशील मनाला चटका लावणारीच दिसून यावी हे दुर्दैवीच ठरावे. विशेषत: ग्रामीण व आदिवासी भागाप्रमाणेच महानगरांमध्येदेखील कुपोषित बालके आढळून येत असल्याचे पाहता, आरोग्य यंत्रणांच्या सक्षमतेवर तर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावेच; पण अशा अवस्थेत सुदृढ व सशक्त भविष्याची स्वप्ने कशी रंगवता यावीत, असाही प्रश्न पडावा.आज देशभर बालदिन साजरा केला जाईल. बालकांमधील जाणिवा व क्षमता वाढवून राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने या भावी पिढीला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होतील, ते गरजेचेच आहे. कारण, उद्याच्या भविष्याचे स्वप्न आज या बालकांमध्येच पेरता व पाहताही येणारे आहे. पण आपल्याकडील उत्सवप्रियता अशी की, दिनविशेषाला आपण जी जागरूकता अगर तळमळ दाखवतो, ती तेवढी वा तशी एरव्ही दिसत नाही. त्यामुळे दिवस येतात-जातात. उत्सवी स्वरूपाचे पोषाखी कार्यक्रम पार पडतात आणि कालगणना पुढे सरकली की मागच्याचा विसर पडतो. बालदिनाच्याही बाबतीत तसेच होऊ नये. कारण, वर्तमानाच्या आधारे भविष्य घडविण्याची संधी यातून लाभणारी आहे. जे चांगले आहे, आश्वासक आहे व उद्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल त्याची चर्चा यानिमित्ताने व्हावीच, परंतु जिथे सुधारणांना वाव आहे, त्यातही शासन यंत्रणेकडून निधी खर्च होऊनही ज्यात समाधानकारक उद्दिष्टांची साध्यपूर्ती होताना दिसत नाही; अशा बाबींकडे लक्ष पुरवून प्रणालीतील दोष दूर करण्याचे प्रयत्न झाल्यास नक्कीच चांगले काम घडून येऊ शकेल. अर्थात, यासाठी केवळ शासकीय यंत्रणांवर विसंबून चालणार नाही तर सामाजिक संस्थांनाही पुढाकार घ्यावा लागेल.
यासंदर्भात प्रकर्षाने समोर येणारी बाब म्हणजे कुपोषण. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील किंवा ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती पाहता तिथे कुपोषणाचा विषय कायम असल्याचे एकवेळ समजूनही घेता यावे, परंतु शहरी-महानगरी परिसरातदेखील कुपोषित बालके आढळून येत असल्याचे पाहता यासंबंधातील तीव्रता लक्षात यावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार तीन वर्षांच्या आतील व अतिशय कमी वजनाची जी बालके असतात, अशी तीव्र कुपोषित बालकांची संख्या देशात तब्बल ९३ लाख इतकी असल्याचे मागे आढळून आले होते. त्यातील दहा टक्के बालकांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याची किंवा उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. राज्यातली, म्हणजे महाराष्ट्रातील आकडेवारी बघितली तर सुमारे ९४ हजार बालके तीव्र कुपोषित आढळून आली होती, तर त्यापेक्षा बरी स्थिती असलेल्या, परंतु कुपोषितच म्हणवणाऱ्यांची संख्या पाच लाखांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय मुंबई, पुणे व नाशिक यांसारख्या महानगरांमध्येही कुपोषित बालके आढळून आली आहेत. वस्तुत: कुपोषणमुक्तीसाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असताना व कोट्यवधी रुपये खर्च होत असताना हे टाळता येऊ शकलेले नाही. गावोगावी अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण आहाराचीही व्यवस्था केली गेली आहे. परंतु बालकांऐवजी व्यवस्थेतील भलत्यांचेच पोषण त्यातून होत असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळते. तेव्हा बालदिनी बालकांच्या भवितव्याची चर्चा करताना कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांच्या समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष पुरविले जाणे प्राधान्याचे ठरले आहे.