मंगळवारी पहाटे वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाल्याने वारली चित्रकलेचा व्रतस्थ साधक हरपला आहे. जी कला शतकानुशतके वारली समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतीच आविष्कृत होत होती, जिचा परिचय बाहेरच्या जगाला फारसा होत नव्हता, अशा कलेला त्यांनी संपूर्ण जगासमोर नेले. तिला लोकप्रिय केले. ही त्यांची कामगिरी लोकोत्तर म्हणावी अशी आहे. कमरेला एक धुडूत नेसलेले, विस्कटलेले केस अशा अवस्थेत त्यांनी आयुष्यभर या कलेची साधना केली. परंतु त्यांचा हा पारंपरिक अवतार या कलेला महान बनविण्याच्या प्रयत्नांच्या आड कधीही आला नाही. त्यांना जर ‘पद्मश्री’ दिली तर ते अशाच अवतारात ती स्वीकारायला येतील; म्हणून ती त्यांना नाकारण्याचा प्रयत्न झाला होता. ब्रिटिश शासनकर्त्यांपुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेले ज्योतिबा फुले मुंडासं, शर्ट आणि धोतर अशाच वेषात मुद्दाम गेले होेते. भारतीयांच्या समस्या मांडताना महात्मा गांधी हे ब्रिटिशांच्या राजदरबारात आणि संसदेत पंचा नेसूनच गेले होते. याचा विसर या महाभागांना पडला असावा. शेवटी या चिल्लर अडचणींवर मात करून त्यांना पद्मश्री मिळाली. राष्टÑपतींचा पुरस्कारही त्यांना लाभला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही प्रसिद्धी आणि सन्मान यांची हाव धरली नाही. माझ्या कलेत दम असेल तर तिचे रसिक तिला शोधत माझ्या दाराशी येतील असा सार्थ अभिमान त्यांना होता. प्रख्यात कलासमीक्षक कुलकर्णी हे प्रत्येकवेळी त्यांच्या पाठीशी उभे राहिले; आणि म्हसे यांची कला त्यांनी जगापुढे आणली. एवढा सन्मान मिळाला. ब्रिटन, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स या देशांत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. त्यानंतर त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीन एकर जमीन त्यांच्या कलासाधनेसाठी देण्याचे मान्य केले. परंतु इथल्या दळभद्री शासनाने आणि प्रशासनाने २७ वर्षे ते आश्वासन पूर्ण होऊ दिले नाही. त्यासाठी राहुल गांधींची भेट होण्याची प्रतीक्षा त्यांना करावी लागली. त्यांनी लक्ष घातल्यानंतरही अंगावर तुकडा भिरकावल्यासारखी त्यांना जमीन दिली. त्यातही अनेक बखेडे होते. शेवटी त्यातील एक एकर जमीन कशीबशी त्यांना मिळाली. लोकोत्तर कलावंताला राजाश्रय मिळाला तरी त्याची कशी फरफट शासन आणि प्रशासन करते याचे हे विदारक उदाहरण होते. यापुढे तरी शासन आणि प्रशासनाला सद्बुद्धी सुचेल व ते कलावंतांप्रति अधिक संवेदनशील होतील, अशी अपेक्षा आहे. ते तसे झाले तर ती म्हसे यांना मोठी आदरांजली ठरेल.
कलातपस्वी हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 5:38 AM