अरुण साधू... मितभाषी पण ठाम भूमिका घेणारा पत्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:33 AM2017-09-26T03:33:08+5:302017-09-26T03:35:25+5:30
सव्यसाची पत्रकार, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सतत नवतेचा शोध घेण्याची वृत्ती असणारे व समाजाशी जोडलेली नाळ कायम जपणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून अरुण साधूंचा कायम उल्लेख होत राहील.
सव्यसाची पत्रकार, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सतत नवतेचा शोध घेण्याची वृत्ती असणारे व समाजाशी जोडलेली नाळ कायम जपणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून अरुण साधूंचा कायम उल्लेख होत राहील. त्यांच्यासोबत पत्रकारितेचा मोठा काळ घालवलेल्या दिनकर रायकर यांच्या या आठवणी.
अरुण साधू यांच्या निधनाची बातमी आली आणि माझे मन ४७ वर्षे मागे गेले. सप्टेंबर १९७० साली मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये रिपोर्टर म्हणून रुजू झालो. मला पहिले काम क्राईम रिपोर्टिंगचे दिले. सोबत एक सिनियर पत्रकार म्हणून अरुण साधू यांना दिले गेले. माझ्या पहिल्या बातमीतील काही चुका त्यांनी दुरुस्त केल्या. त्या चुका मी पुन्हा कधीही केल्या नाहीत. सिनियर म्हणून ते एक आठवडा सोबत होते. तसे आम्ही दोघे समवयीन, पण पत्रकारितेत ते मला ज्येष्ठ होते. मात्र त्यांच्या वागण्याबोलण्यात ती ज्येष्ठता त्यांनी त्यावेळी दाखवली नाही आणि पुढेही कधीच नाही. नंतर ते टाइम्स आॅफ इंडियात गेले मात्र आम्हा दोघांना पॉलिटिकल बिट मिळाले. त्यामुळे आमच्या भेटीगाठी, चर्चा सतत होत राहिल्या. मंत्रालय, विधिमंडळ, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांना भेटी, सभा, दौरे अशा अनेक प्रसंगात आम्ही एकत्र होतो. त्यातून माझी पत्रकारिता संपन्न होत राहिली.
ते दिवस राजकीय स्थैर्याचे होते. तसेच विरोधी पक्षातील नैतिकतेचे मापदंड अधोरेखित करणारे होते. काहीही लिहिले आणि धकून गेले असा तो काळ नव्हता. त्यामुळे आम्ही एकमेकांची साप्ताहिक वार्तापत्रे उत्सुकतेने वाचून त्यावर चर्चा करीत होतो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील अशा वार्तापत्रांवर मंत्रालय प्रेसरुममध्ये चर्चा रंगायच्या. त्यातून नवीन काही शोधण्याचा प्रयत्न असायचा. एक किस्सा असाच, अरुण साधूंनी झोपडपट्टीत राहून कचरा गोळा करणाºयांवर एक वार्तापत्र लिहिले होते. गोळा केल्या जाणाºया कचºयात लोखंड, पत्रा असे धातूही असायचे. साधूंनी लिहिताना ‘‘हे मेटल विकून गरीब लोक पैसे कमावतात’’ असा उल्लेख टाइम्समध्ये केला होता. तो वाचून त्यावेळी एक्स्प्रेसचे चीफ रिपोर्टर बी.एस.व्ही. राव त्यांना म्हणाले, ‘‘ए बच्चा, इट्स नॉट ओन्ली मेटल... इट्स अ प्रेशस्स मेटल’’ असा उल्लेख पाहिजे होता. एक ‘प्रेशस्स’ शब्द आला असता तर त्या लेखाची उंची वाढली असती हे साधंूनी मान्य केले व पुढे हा किस्सा सगळ्या प्रेसरुमध्ये सांगितला. इतका मोकळेपणा त्यांच्याकडे होता आणि अशी निकोप स्पर्धाही त्यावेळी होती.
पत्रकारितेखेरीज त्यांचे इतरही खूप लिखाण सुरू असायचे. त्यांचा वेगळा असा वाचक वर्ग होता. शासकीय अधिकारी, मंत्री त्यांच्या त्या साहित्यविषयक लिखाणावरून त्यांच्याशी बोलायचे, त्या गप्पा ऐकताना आम्हाला नेहमी हेवा वाटायचा. टाइम्सची नोकरी सोडून ते पुढे स्टेट्समनमध्ये गेले. त्यावेळी त्या पेपरचा लौकिक होता. पण ती नोकरी सोडून ते फ्री प्रेसचे संपादक झाले. आमचा त्याला विरोध होता. पण साधू म्हणाले, प्रत्येक पत्रकाराने संपादक होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे, मला ते पद मिळते आहे, मग मी ते का सोडू?
मितभाषी पण लिखाणातून ठाम भूमिका घेणारा हा जगनमित्र पत्रकार होता. आम्ही किती काळ एकत्र घालवला यापेक्षा तो आम्ही खूप चांगला घालवला हे माझ्यासाठी कायम स्मरणात राहील...