गरब्यात विशिष्ट धर्मीय कलाकारांना बंदीचा फतवा काढून सामाजिक एकतेला नख लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:59 AM2017-09-21T01:59:01+5:302017-09-21T01:59:04+5:30

नवरात्र उत्सवातील ‘गरबा’ आता ‘ग्लोबल इव्हेन्ट’ बनत असताना गरबात सादरीकरण करणा-या विशिष्ट धर्मीय कलाकारांना बंदीचा फतवा काढून सामाजिक एकतेला नख लावण्याचा प्रयत्न गुजरातेतील काही संघटनांनी चालवला आहे. सार्वजनिक उत्सावाला धार्मिक रंग देण्याचा हा प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे.

Attempts to ban social unity by fostering certain religious artists in Garibi | गरब्यात विशिष्ट धर्मीय कलाकारांना बंदीचा फतवा काढून सामाजिक एकतेला नख लावण्याचा प्रयत्न

गरब्यात विशिष्ट धर्मीय कलाकारांना बंदीचा फतवा काढून सामाजिक एकतेला नख लावण्याचा प्रयत्न

Next


नवरात्र उत्सवातील ‘गरबा’ आता ‘ग्लोबल इव्हेन्ट’ बनत असताना गरबात सादरीकरण करणा-या विशिष्ट धर्मीय कलाकारांना बंदीचा फतवा काढून सामाजिक एकतेला नख लावण्याचा प्रयत्न गुजरातेतील काही संघटनांनी चालवला आहे. सार्वजनिक उत्सावाला धार्मिक रंग देण्याचा हा प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे.
भारतीय सण-उत्सवामागे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक परंपराही आहे. नवरात्र, दिवाळी, दसरा, रमजान आणि ख्रिसमस हे सण-उत्सव आपल्याकडे सार्वत्रिकपणेच साजरे केले जातात. रमजान महिन्यातील रोजा आणि नवरात्रीतील उपवास करणा-यांना धर्माच्या भिंती आड येत नाहीत. जाती-धर्र्मांंच्या भिंतीपल्याड जात लोकांना एकत्र आणणे हाच तर या उत्सवांमागे मुख्य उद्देश असतो. गावोगावच्या जत्रेत, माऊंट मेरीच्या यात्रेत सहभागी होणाºयांना आणि अजमेर शरीफच्या दर्ग्यात चादर चढविणा-यांना जात विचारली जात नाही, हेच तर भारतीय समाजाचे ठळक वैशिष्ट्य आहे. भारतातील अनेक धार्मिक स्थळे, उत्सव आणि परंपरांकडे सामाजिक ऐक्याची प्रतिके म्हणूनच पाहिले जाते. नवरात्रात खेळला जाणारा गरबा अथवा दांडिया हाही असाच एक सलोखा वाढविणारा आणि इंद्रधनु रंगांची लयबद्ध अशी मानवी नात्यांची साखळी मजबूत करणारा सामूहिक नृत्यप्रकार आहे.
मानवाच्या उत्क्रांतीमध्ये व्यक्तींचा समूह आणि समूहाचे समाजकारण करण्यामध्ये नृत्य, गायन, वादनादी कलांचा मोठा वाटा राहिलेला आहे. अत्यंत प्राचीन काळात आदिमानवाला भाषेचा शोध लागला नव्हता, बोलीभाषा विकसित झाली नव्हती, तेव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी, एकत्र येऊन उत्साह वाढवण्यासाठी शारीरिक भाषेचा वापर होत असे. साज, संगीत आणि शृंगाररसाचा अप्रतिम आविष्कार असलेल्या समूह नृत्यप्रकाराची मुळं आदिमकाळात दडलेली आढळून येतात. पौराणिक ग्रंथामध्येसुध्दा नृत्यकलेचा उल्लेख वारंवार आलेला आहे. ‘गरबा’देखील समूहनृत्यच. गरबा हा शब्द ‘गर्भ’ या संस्कृत शब्दातून आला. गरबानृत्यात मध्यभागी गर्भदीप ठेवून त्याभोवती फेर धरला जातो. नवरात्रींच्या दिवसात सृष्टी हिरवाईने नटलेली असते, वातावरणात एकप्रकारचा उत्साह असतो. हा उत्साह, उमंग गरबानृत्यातून अभिव्यक्त होतो. सृष्टीच्या सृजनसोहळ्याचा नृत्यातून सादर केलेला तो एकप्रकारे आविष्कारच असतो. त्यामुळे या उत्सावाकडे राधा-कृष्णाच्या रासदांडियाचा संदर्भ लावून विशिष्ट धर्मीयांना अटकाव करणे योग्य ठरणार नाही.
गुजरातमधील भूज येथील एका संघटनेने नवरात्रोत्सवानिमित्त होणाºया आॅर्केस्ट्रात विशिष्ट धर्मीय कलाकारांना विरोध केला आहे. मुंबईत नवरात्र मोठ्या धूमधडक्यात साजरे होते. लोकप्रिय गरबा गायकांचे भव्य पंडाल असतात. फाल्गुनी पाठक, प्रीती-पिंकी ही काही बडी नावे यात येतात. या कलाकारांकडे जाती-धर्माच्या चष्म्यातून बघणाºयांनी आपल्याकडचे मंगलप्रसंग अधिक मंगलमय करणा-या बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचे सूर आठवून बघावेत. नृत्य, संगीत, गायन या अभिजात कलांना जाती-धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही. गरबा हा तर आता वैश्विक इव्हेन्ट बनला आहे. फ्लोरिडापासून टोरँटोपर्यंत तो तितक्याच उत्साहाने सादर केला जातो. अशावेळी त्यातील कलाकारांची जात काढून गालबोट लावले जाऊ नये.

Web Title: Attempts to ban social unity by fostering certain religious artists in Garibi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.