मुंबई दूर अस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:19 AM2018-01-15T02:19:44+5:302018-01-15T02:20:02+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी सिंदखेड राजा येथे आले होते. तिथे त्यांनी अपेक्षेनुरूप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर तुफानी हल्ला चढवला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी सिंदखेड राजा येथे आले होते. तिथे त्यांनी अपेक्षेनुरूप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर तुफानी हल्ला चढवला. भाजपा हा दंगेखोरांचा पक्ष असून, जातीधर्मांमध्ये भांडणे लावून सत्तेची ऊब घेणे, हाच त्या पक्षाचा पंथ असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. भाजपासाठी हा आरोप नवा नाही. त्या पक्षाचा पूर्वाश्रमीचा अवतार असलेल्या जनसंघाच्या काळापासूनच हा आरोप होत आला आहे; पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या या राज्यात जनसंघाच्या दिव्याची ज्योत मोठी होत गेली आणि पुढे तर दोनदा भाजपाचे सत्तारूपी कमळही फुलले! केजरीवाल आले होते, भाजपाचे कमळ सुकविण्यासाठी अन् महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्या पक्षाचे पीक कितपत तरारू शकते, याची चाचपणी करण्यासाठी! त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र डागणे अपेक्षितच होते. समतोल साधण्यासाठी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या ‘नागनाथ-सापनाथ’ची उधारउसनवारी करीत, त्यांनी काँग्रेसवरही वाग्बाण डागले. केजरीवाल हे कुशल नेता आणि प्रभावी वक्ता असल्याचे त्यांनी एव्हाना सिद्ध केले आहेच; पण राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडण्याची त्यांची इच्छा केवळ तेवढ्याच भांडवलावर फलद्रूप होणार नाही. राष्ट्रीय नेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी केजरीवाल यांनी यापूर्वी पंजाब, गोवा, गुजरात या राज्यांवरही लक्ष केंद्रित केले होते. पंजाबबाबत तर ते एवढे आशावादी होते, की दिल्ली सोडून त्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यांच्या दुर्दैवाने दिल्ली सोडून इतरत्र कुठेही आम आदमी पक्षाला यश लाभू शकले नाही. या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी अचानक केजरीवाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून येणार असल्याच्या बातम्या उमटल्या अन् केजरीवालांचे पुढील लक्ष्य महाराष्ट्र असल्याची चर्चा सुरू झाली. केजरीवालांच्या शुक्रवारच्या भाषणामुळे त्याची खात्रीही पटली; पण अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात प्रभाव राखून असलेल्या चार तुल्यबळ पक्षांशी मुकाबला करीत, महाराष्ट्रात प्रभाव पाडणे केजरीवालांसाठी सोपे नाही. आम आदमी पक्षाच्या प्रारंभीच्या काळातही महाराष्ट्रात पक्ष उभा करण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता; पण माफकही यश लाभले नव्हते. दमदार स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या जोमदार फळीशिवाय, केवळ स्वत:च्या सभांच्या भरवशावर विसंबून राहिले, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी ‘मुंबई दूर अस्त’, असेच म्हणावे लागेल.