Ayodhya Verdict : ना जीत, ना हार, बंधुभावाची असू द्या बहार
By विजय दर्डा | Published: November 10, 2019 04:09 AM2019-11-10T04:09:48+5:302019-11-10T06:57:00+5:30
ज्या निर्णयाची अनेक वर्षांपासून लोक वाट पाहत होते, तो निर्णय अखेर जाहीर झाला.
- विजय दर्डा
ज्या निर्णयाची अनेक वर्षांपासून लोक वाट पाहत होते, तो निर्णय अखेर जाहीर झाला. ही कायद्याची लढाई १३४ वर्षांपासून सुरू होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने संपूर्णत: वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकमताने हा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी रामजन्मस्थानाचा अधिकार रामलल्लांना दिला आहे. तसेच मंदिराच्या निर्माणासाठी सरकारने तीन महिन्यांच्या आत एक ट्रस्ट निर्माण करावा, असेही सांगितले आहे. याशिवाय मशिदीसाठी अयोध्येत मुस्लीम पक्षाला पाच एकर जमीन देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
कोणत्याही विवादात न्याय मिळणे हे महत्त्वाचे असते. पण त्यापेक्षा महत्त्वाचे न्याय कसा मिळाला, हे असते. त्यासाठी कोणत्या प्रक्रियेचे पालन करण्यात आले, हेही बघावे लागते. सर्वोच्च न्यायालयाने आर्कियालॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या अहवालाचा आधार प्रामुख्याने घेतला आहे. न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत संतुलित तसाच समग्रही आहे. मुस्लीम पक्षकार स्व. हाशिम अन्सारी यांचे सुपुत्र आणि विद्यमान पक्षकार इकबाल अन्सारी यांनीदेखील म्हटले आहे की, झालेला निर्णय सर्वोत्तम असून त्यात माझा पराभव झाला, अशी स्थिती नाही. आता याबाबतीत कोणताच वाद शिल्लक उरलेला नाही. अन्सारी यांच्या या भावनांचा मी सन्मान करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनजी भागवत यांनी हा निर्णय हा कुणाचा विजय नाही किंवा कुणाचा पराभवही नाही असे जे विचार व्यक्त केले आहेत त्याच्याशी मी सहमत असून, त्या विचारांचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे कुणी उत्सव साजरा करू नये तसेच त्याबद्दल कुणी दु:खही व्यक्त करू नये. मोदीजींनी टिष्ट्वट करून जे म्हटले आहे की रामभक्ती असो वा रहिमभक्ती असो, ही वेळ सर्वांसाठी भारतभक्तीची आहे, तेही योग्यच आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच तत्काळ काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावून निर्णयाचे स्वागत केले तसेच तेथे राम मंदिराची उभारणी करण्याची मनीषा जाहीर केली, त्याबद्दल त्यांची प्रशंसाच करायला हवी. लोकांनी जातीय सलोखा कायम राखावा, असेही त्यांनी लोकांना आवाहन केले. याशिवाय भाजपशासित राज्यांचे तसेच काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री विशेषत: ममता बॅनर्जी यांची मी विशेष करून प्रशंसा करतो; कारण त्यांनी आपापल्या राज्यात सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, जेणेकरून राज्यात कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. आणखी एक समाधानाची बाब ही की, विभिन्न राज्यांतील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या काळात आपले इतिकर्तव्य अतिशय दक्षतेने पार पाडत आहे. परिणामी, सोशल मीडियावर छेडछाड करून उन्मादी वातावरण निर्माण करण्याच्या घटना घडल्या नाहीत. लहानसहान गोष्टींवर उतावळेपणाने प्रतिक्रिया देणारा सोशल मीडिया या निर्णयाच्या बाबतीत संयमाने वागल्याचे दिसून आले.
धर्म ही आमची आस्था आहे, हे माझे स्पष्ट मत आहे. आपल्या आस्थेचा आपण सन्मान करतो. तसेच इतर लोकही आपल्या आस्थेचा सन्मान करतात. सर्वांनीच सर्वांच्या आस्थेचा यथायोग्य सन्मान करायला हवा. पण जेव्हा आपण राष्ट्राचा विचार करतो तेव्हा आपण आपल्या आस्थेच्या पलीकडे जात आपल्या राष्ट्रधर्माचे पालन करायला हवे. त्यादृष्टीने आपला भारत देश भाग्यशाली आहे. येथे प्रत्येक नागरिक राष्ट्राला प्राधान्य देतो. आपण कोणत्याही धर्माचे पालन करीत असू, कोणत्याही तºहेच्या आराधनेवर आपला विश्वास असला तरी राष्ट्राचा जेव्हा विचार येतो तेव्हा आम्ही सारे एक असतो.
या एकतेचे कारण आमच्यातील बंधुभाव हेच आहे. ते आमचे शक्तिस्थळ आहे. ही ताकद आपण कोणत्याही स्थितीत टिकवून ठेवली पाहिजे. या आपसातील बंधुभावाचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. राम मंदिराचे पक्षकार परमहंस रामचंद्र दास आणि बाबरी मशिदीचे पक्षकार हाशिम अन्सारी यांनी न्यायालयात ६० वर्षांपर्यंत लढा दिला. पण दोघेही परस्परांचे चांगले मित्र होते. ते एकाच रिक्षात बसून न्यायालयात जायचे आणि तेथून एकत्रच परत यायचे. या गोष्टीचे लोकांना आश्चर्य वाटायचे. पण ते म्हणायचे की, आमची लढाई वैचारिक स्वरूपाची आहे. त्यामुळे आमच्यातील मैत्रीत अंतर का येईल? हा निर्णय पाहायला ते दोघेही आज जिवंत नाहीत. पण त्यांच्या दोस्तीचे किस्से अयोध्या शहरात मशहूर आहेत. संध्याकाळी घरी परतल्यावर ते पत्ते खेळत बसायचे. त्या वेळी ते मंदिर-मशिदीचा विषयही काढायचे नाहीत. इतिहासात अशा तºहेच्या अनेक गोष्टी पाहावयास मिळतील. जेथे एखाद्या मंदिरासाठी मुस्लीम शासकाने जहागिरी दिली आहे किंवा हिंदूंनी मशिदीसाठी जमीन दिली आहे. इतिहासातील आणखी एक घटना सांगावीशी वाटते. अठराव्या शतकात एका मंदिराचा विध्वंस करण्यासाठी अनेक कट्टरपंथी एकत्र आले होते, तेव्हा बंगालचे नवाब सिराजुद्दौला यांनी आपले सैन्य पाठवून या कट्टरपंथीयांना ठार केले होते.
हे सारे सांगायचे मुख्य कारण हे आहे की, आमच्या देशातील गंगा-यमुना या नद्यांनी केलेले संस्कारही या देशाची सर्वांत मोठी ताकद आहे. ही ताकद आपण जोपासायला हवी. या संवेदनशील काळात आपण अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. तसेच एखाद्या ठिणगीचा वणवा करू पाहणाऱ्यांना आपण वेळीच पायबंद घालायला हवा. जेणेकरून आमची सामाजिक समरसता अक्षुण्ण राहील आणि आमच्यातील बंधुभावावर कोणताही परिणाम होणार नाही. मग आपण गर्वाने म्हणू शकू
‘सारे जहांसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा’.
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)