झोप उडावी अशा आयुष्याचा नायक भन्नाट वळणावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 06:43 AM2021-04-10T06:43:08+5:302021-04-10T06:44:31+5:30
सायकलरिक्षा ओढणारे मनोरंजन ब्यापारींकडे सध्या बंगालात सगळ्यांचे डोळे लागलेत, कारणही तसेच आहे!
- श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
प्रचंड उन्हाच्या टळटळीत दुपारी कोलकत्याच्या जाधवपूर विद्यापीठाजवळच्या ज्योतिष रे कॉलेजच्या पुढे घामाघूम अवस्थेत सवारीची वाट पाहात असतानाही तो सायकलरिक्षावाला पुस्तक वाचत होता. कॉलेजमधून एका विद्यार्थ्याला सोबत घेऊन प्राध्यापिका बाहेर आल्या. दोघे रिक्षात बसले अन् घराकडे जात असताना रिक्षाचालकाने विचारले, ‘‘मॅडम, जिजिभिषा म्हणजे काय?’’
बंगालीतला इतका अवघड शब्द रिक्षाचालकाला कसा माहिती, म्हणून मॅडमना आश्चर्य वाटले. त्यावर ‘‘रिक्षा ओढतानाही मी पुस्तके वाचतो’’, असे त्या तिशीतल्या रिक्षावाल्याने सांगितले.‘‘ वाचतोस तर लिहायलाही सुरुवात कर’’, असे सांगून मॅडमनी एका कागदावर नाव, पत्ता लिहून दिला. तो वाचून रिक्षावाला उडालाच. कारण, थोड्या वेळापूर्वी तो वाचत होता, अग्निगर्भ. ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी यांची एक अजरामर लेखनकृती! अन् सामान्य कष्टकऱ्यांचे जगणे शब्दांत मांडणाऱ्या त्याच त्या थोर लेखिका त्याला लिहायला सांगत होत्या!
... सायकलरिक्षा चालविणारा होता मनोरंजन ब्यापारी. बंगालच्या दलित साहित्याला नवे वळण देताना रसरशीत जीवनानुभव मांडणारे लेखक, ‘‘इंटोरॉगेटिंग माय चांडाल लाइफ’’ आत्मचरित्रासाठी हिंदू लिटरेचर पुरस्काराचे विजेते. गेल्या सप्टेंबरमध्ये स्थापन झालेल्या पश्चिम बंगाल दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष. केवळ ऐकून व वाचून झोप उडावी अशी आयुष्याची चित्तरकथा जगलेला नायक.
आज आठवण यासाठी, की पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मनोरंजन ब्यापारींकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. हुगळी जिल्ह्यातल्या बालागडमधून ते तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवताहेत. थोडे सुखद असे त्यांच्या आयुष्यातील हेही वळण भन्नाट आहे.
फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानमधून आई-वडिलांसोबत बंगालमध्ये आलेला हा मुलगा निर्वासितांच्या छावणीत राहतो. पुढे वडील जाधवपूर रेल्वे स्टेशनवर हमाली करतात. त्याच स्टेशनवर ब्यापारी यांनी शेकडो रात्री काढल्या. अनेक वर्षे नक्षली बनून जंगलमहलमध्ये घालवली. दंगल, प्राणघातक हल्ला वगैरे गुन्ह्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला. शंकर गुहा नियोगी यांच्यासोबत छत्तीसगडच्या बस्तरमध्ये काम केले. तुरूंगाशी तर त्यांचे अतूट नाते. जाधवपूर स्टेशनच्या फलाटावर रेल्वे पोलिसांचा कारवाईचा कोटा पूर्ण करताना व्यावसायिकांशी साटेलोट्यातून पाच रूपयांत चार-पाच दिवस कितीतरी वेळा ते तुरुंगात गेले. पडेल ते काम केले. सायकलरिक्षा नंतर ओढली. आधी चहा टपरी चालवली, दफनभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार केले, एका संस्थेत आचारी बनले. एकवीस वर्षे विद्यार्थ्यांचे जेवण बनवले.
मनाेरंजन ब्यापारी नामशुद्र जातसमूहातील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगालमध्ये बाेलावून घटना समितीवर निवडून देणाऱ्या नेत्यांचा समाज. एकोणिसाव्या शतकात हरिचंद व गुरूचंद ठाकूर या पितापुत्रांच्या नेतृत्वातील नामशुद्र चळवळीच्या आधी या जाती अस्पृश्य चांडाळ म्हणून ओळखल्या जायच्या. दलित-शोषितांच्या वंचितांच्या, गरिबांच्या, 'नाही रे' वर्गाच्या वाट्याला येणारे सारे काही ब्यापारी यांनी भोगले. त्यांनी कधी शाळेचे तोंड पाहिले नाही. तुरूंगात वाचायला, लिहायला शिकले अन् मग वेड्यासारखे वाचतच सुटले. महाश्वेतादेवींमुळे लिहायला लागले. आपल्याकडील दलित आत्मचरित्रांच्या मालिकेत फिट्ट बसेल, असे भडभडून टाकणारे अनुभव जगापुढे आले. दुबळ्यासमाजाचे नायक म्हणून जयपूर, हैदराबाद वगैरेच्या साहित्य चर्चांमध्ये ते केंद्रस्थानी राहिले. भद्रलोकांच्या मते प. बंगाल हे जातीव्यवस्था घट्ट नसलेले राज्य. ब्यापारींच्या लिखाणाने त्या समजाला तडा गेला. कैक वळणे अन् चढउतार जगलेले मनोरंजन ब्यापारी यांचे आयुष्य या निवडणुकीत नव्या वळणावर उभे आहे. अकल्पितांच्या ज्या वाटेवर ते चालत आलेत ते पाहता हे वळण कदाचित त्यांना विधानसभेत घेऊन जाईलही!