बांगला देशात दहशतवादाचा नवा चेहरा उघड

By admin | Published: July 5, 2016 03:40 AM2016-07-05T03:40:00+5:302016-07-05T03:40:00+5:30

राष्ट्रांच्या राजधान्यांवर होणारे दहशतवादी हल्ले हे आता नियमित होऊ लागले आहेत. पॅरिस असो, ब्रुसेल्स असो, इस्तंबुल किंवा काबुल असो वा बगदाद, पेशावर असो, प्रत्येक शहराला हिंसाचाराचा धोका

In Bangladesh, the new face of terrorism revealed | बांगला देशात दहशतवादाचा नवा चेहरा उघड

बांगला देशात दहशतवादाचा नवा चेहरा उघड

Next

- विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

राष्ट्रांच्या राजधान्यांवर होणारे दहशतवादी हल्ले हे आता नियमित होऊ लागले आहेत. पॅरिस असो, ब्रुसेल्स असो, इस्तंबुल किंवा काबुल असो वा बगदाद, पेशावर असो, प्रत्येक शहराला हिंसाचाराचा धोका निर्माण झाला आहे. दहशतवादाला धर्म नसतो किंवा हिंसक कृत्यांचा धर्माच्या तत्त्वांशी कोणताही संबंध नसतो, असे म्हटले तरी, दहशतवादी कृत्यांना जिहादच्या संकल्पनेपासून वेगळे करता येणार नाही. अशा हत्त्यांना जिहादचे उदात्तीकरण करणे कितीही विकृत असले तरी या युद्धाला वैचारिक रंग आपोआप मिळत असतो. म्हणूनच दहशतवाद्यांसोबतचा लढा निव्वळ सुरक्षाविषयक उपायांशी निगडित नसतो, तर दहशतवादाच्या मानसिकतेशीसुद्धा जुळलेला असतो. पण ही मोजपट्टी गेल्या आठवड्यात ढाक्का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला लावता येणार नाही. या हल्ल्यात ज्या २० जणांची निर्घृण हत्त्या करण्यात आली ते विदेशी नागरिक होते किंवा कुराणातील वचने ते उद्धृत करू शकले नाहीत, म्हणून त्यांची हत्त्या झाली हे वर्णन अपुरेच ठरेल. कारण ते दहशतवादी शिक्षित होते आणि चांगल्या कुटुंबातील होते. बांगलादेशी समाजातील त्यांचा दर्जा लक्षात घेता, ते कशाचाही निषेध करण्यासाठी आले नव्हते.
या घटनेची ही एक बाजू, तर दुसऱ्या बाजूने निरनिराळ्या संघटना या घटनेची जबाबदारी स्वीकारण्यास समोर आल्या आहेत. इराक आणि सीरियाच्या इसिस या संघटनेने या कृत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. पण बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यापासून सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत सारेजण बांगला देशात इसिसचे अस्तित्व नाही असा दावा करीत आहेत. हे कृत्य देशांतर्गत दहशतवाद्यांनीच केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बांगलादेश हे अपयशी राष्ट्र असल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय, या गुप्तचर संघटनेनी हे कृत्य केल्याचा त्यांचा दावा आहे. प्रचाराच्या दृष्टीने हा खुलासा पटण्यासारखा आहे. कारण पाकिस्तानलाही अशाच आरोपांना तोंड द्यावे लागत आहे. पाकिस्तानशी वैचारिक साम्य असलेले हे राष्ट्र १९७१ मध्ये पाकिस्तानपासून जरी वेगळे झालेले असले तरी ते पाकिस्तानपासून भिन्न नाही हे दाखविण्यास पाकिस्तान उत्सुक आहे. आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ बांगलादेशने जमात-उल-मुजाहिदीन या बंदी असलेल्या संघटनेचे आयएसआय शी असलेले संबंध सूचित केले आहेत.
अलीकडच्या काळात बांगला देशमध्ये अल्पसंख्यकांवर आणि धर्मनिरपेक्षतावाद्यांवर होणाऱ्या हल्ल्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. या कृत्यांच्या विरुद्ध अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करणे सुरू केले असून प्रत्येक हल्लेखोराला आपण सजा देऊ असे त्यांचे म्हणणे आहे. अल्पसंख्यकांवर या प्रकारे ठरवून हल्ले करण्यात आल्यावर सरकारने ८००० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबतीत पंतप्रधान शेख हसिना यांनी कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांनी मूलतत्त्ववाद्यांच्या भावनांना धुडकावून लावले आहे.
ते अंतर्गत दहशतवादी आहेत की इसिसच्या तालमीत तयार झालेले दहशतवादी आहेत याविषयीच्या चर्चेत आपण फार काळ गुंतून राहाता कामा नये. ढाक्क्यावरील हल्लेखोरांवर करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षा दलाने एका हल्लेखोरास जिवंत पकडले आहे. त्यामुळे त्याच्याकडून बरीच माहिती मिळू शकेल. पण या दहशतवादी कृत्यानंतर जगासमोर जी माहिती उघड होत आहे त्यावरून जगातील कोणतीही जागा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानतळे, उच्चभ्रूंची रेस्टॉरेंटस् किंवा मेट्रो स्थानके यांच्यावर हल्ले करून हे दहशतवादी आजच्या आधुनिक जगातील नागरिकांना आपले लक्ष्य करीत आहेत. हे स्त्री-पुरुष नागरिक राष्ट्रा राष्ट्रांमधील भीती दूर करून जगाला अधिक जवळ आणण्याचे आणि राहण्यायोग्य स्थळ बनविण्याचे काम करीत आहेत व त्यांच्यातील मुक्ततेचे हे स्वरूपच जिहादी मानसिकतेसमोर आव्हान निर्माण करीत आहे.
जी माणसे अशा हल्ल्यांच्या मुळापर्यंत जाऊ इच्छितात आणि त्यातून जिहादी तत्त्वांच्या प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अशा तऱ्हेचे विश्लेषण पटण्यासारखे नाही. तथापि जिहादींच्या मानसिकतेचे योग्य पृथ:करण करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून साऱ्या जगाला दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित ठेवणे शक्य होणार नाही. पण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात हल्ल्यांच्या संभाव्य स्थानांची सुरक्षितता करता येऊ शकेल. दहशतवाद ही केवळ एका राष्ट्रापुरती मर्यादित समस्या राहिलेली नाही़. त्या घटनेचा परिणाम घटनेच्या स्थळापर्यंत मर्यादित राहण्याचे दिवस आता संपले आहेत. आता दहशतवादी हल्ल्याचे निनाद जगभर उमटतात. या घटनेत बळी पडणाऱ्यात विभिन्न राष्ट्रांचे लोकही असतात हे अनेक घटनांमध्ये उघड झाले आहे. पण ढाक्का येथील घटनेनंतर ही समजूत अधिक पक्की झाली आहे. कारण त्या हल्ल्यात मरण पावलेल्यात इटालियन व जपानी लोकांसह तारिषी जैन या नावाची अमेरिकेत शिक्षण घेणारी भारतीय मुलगीही आहे. याचा अर्थ हा लढा ढाक्का किंवा दिल्लीने एकट्याने लढण्याचा लढा उरलेला नाही. जोपर्यंत सगळे एकजूट होत नाहीत तोपर्यंत केव्हा ना केव्हा प्रत्येक राष्ट्रालाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. या संदर्भात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३४ इस्लामी देशांनी सौरी अरेबियाच्या नेतृत्वाखाली दहशतवाद विरोधी आघाडी करण्याचे जे पाऊल उचलले आहे त्यातून शांतता व सुरक्षा प्रदान होणार आहे. या आघाडीने रियाध येथे संयुक्त कृती केंद्रांची स्थापना करण्याचे ठरविले आहे. तसेच दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी होणाऱ्या लष्करी कारवाईला सहकार्य करण्याचेही ठरविले आहे. पण त्यावरून मुस्लीम राष्ट्रांतील फूटही दिसून आली. कारण शिया मुस्लीम असलेल्या इराणसह अन्य कोणत्याही राष्ट्राने या आघाडीत सामील न होण्याचे ठरविले आहे! आपले ध्येय साध्य करण्यासाठी दहशतवादी एकजूट झाले आहेत हे विसरून चालणार नाही. पण त्यांच्या लक्ष्यातच फूट पडली असून त्याचा लाभ घेण्यास दहशतवादी कुशल आहेत हे विसरून चालणार नाही.
हे लिखाण संपविण्यापूर्वी -
हा विरोधाभास म्हणावा लागेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी स्वीकारून केंद्र सरकारने आपल्या एक कोटीहून जास्त असलेल्या कर्मचारी व निवृत्तांसाठी १५ टक्के वेतनवाढ घोषित केली आहे. त्यामुळे दरवर्षी तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांचा भार पडणार आहे. हा भार करदात्यांसाठी फार मोठा आहे. पण या वाढीनंतरही कर्मचाऱ्यांना आनंद झालेला नाही. ही वाढ फारच थोडी आहे असे त्यांना वाटते. त्यांच्या युक्तिवादात तथ्य शोधता येईल. पण असंघटित क्षेत्रात असलेल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे काय? ते वेतनभोगी असले तरी वेतन आयोगाच्या शिफारसींपासून दूर आहेत. कल्याणकारी राष्ट्रात सरकारी कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचारी यांचा दुवा साधण्याचे काम व्हायला हवे. या दोहोतील असमानता काही प्रमाणात तरी दूर करायला हवी.

Web Title: In Bangladesh, the new face of terrorism revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.