हवेचे प्रदूषण श्वसनमार्गात जाऊन दगा होण्यापूर्वी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 09:51 AM2023-01-19T09:51:17+5:302023-01-19T09:51:46+5:30

प्रदूषणामुळे दमा तसेच श्वसनसंस्थेच्या इतरही विकारांमध्ये वाढ होते. याबाबत नागरिकांना अधिक माहिती देणे-असणे सर्वार्थाने महत्त्वाचे आहे!

Before the air pollution enters the respiratory tract and... | हवेचे प्रदूषण श्वसनमार्गात जाऊन दगा होण्यापूर्वी...

हवेचे प्रदूषण श्वसनमार्गात जाऊन दगा होण्यापूर्वी...

googlenewsNext

डॉ. रितू परचुरे

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुंबईतील हवा प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावरचे परिणाम हा विषय चर्चिला गेला, हे चांगलेच झाले. या चर्चेदरम्यान मांडण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये अस्थमाच्या (दम्याच्या) पेशंटची संख्या वाढलेली नाही. हिवाळ्यामध्ये हवा प्रदूषणाची पातळी वाढताना दिसते आहे हे निरीक्षणही नोंदवले गेले. प्रदूषण कमी व्हावे यासाठीच्या उपाययोजनांबद्दल लवकरच संबंधितांची बैठक घेतली जाईल, असेही पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. या विषयाप्रती पावले उचलण्याचा शासनाचा निर्धार स्वागतार्ह आहे. जेव्हा आपण उपाययोजनांचा विचार करणार आहोत तेव्हा याच टप्प्यावरती अजून कुठली माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरेल याचाही विचार व्हायला हवा.

मागील तीन वर्षांमधील बराचसा कालावधी हा कोविड १९ महासाथीचा होता. २०२० आणि २०२१ दरम्यान लॉकडाऊन, प्रवासावरती बंधने, यामुळे रस्त्यावरची वाहन संख्या बरीच रोडावली होती. त्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत अनेक शहरांप्रमाणेच मुंबईतही घट दिसली.  सातत्याने मास्क लावल्यामुळे आपसूकच लोकांना प्रदूषणापासून संरक्षण मिळत होते. यामुळे दम्याच्या प्रमाणात घट होणे तसे अपेक्षितच आहे. या दोन वर्षांच्या काळात लोक दवाखान्यात जायला घाबरत होते. अनेक शासकीय दवाखाने कोविड केअर सेंटर म्हणून काम करत होते. त्यामुळे दम्याच्या रुग्णांचे रिपोर्टिंग कमी झाले असण्याची पण शक्यता आहे. त्यानंतरचे, २०२२ हे वर्ष त्यामानाने कोविड आधीच्या वर्षांसारखेच होते. वाहनांची वर्दळ पूर्ववत झाली होती. लोकांनी मास्क वापरणे बंद केले होते. या काळात प्रदूषणाची पातळी आणि त्यायोगे दम्याच्या सारखे आजार  वाढलेले असू शकतात. या दोन्ही कालावधींचा, म्हणजेच मागच्या तीन वर्षांचा, एकत्रित विचार केला तर दम्यासारख्या आजारांची संख्या वाढलेली नाही, असे भासू शकते. एका अर्थाने ही माहिती श्वसन मार्गाच्या आजारांच्या नियंत्रणासाठी वाहन संख्या नियंत्रित करण्याचे, वाहनांच्या प्रदूषणावर बंधने काटेकोरपणे अमलात आणण्याचे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचे महत्त्व नक्कीच अधोरेखित करते. अर्थात आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांच्या नियोजनासाठी फक्त एवढेच पुरेसे नाही.

प्रदूषणामुळे दम्याच्या आणि  फुप्फुसांच्या (किंवा श्वसन संस्थेच्या) इतरही विकारांमध्ये वाढ होते हे आता सर्वमान्य आहे. हे आजार कमी करायचे असतील तर त्यासाठी पूर्वपदावर आलेल्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी किती आहे, शहरातील सर्व भागांमध्ये ही पातळी एकसारखी आहे का त्यात फरक आहेत, प्रदूषणाशी जोडलेल्या आजारांचे शहरामध्ये प्रमाण किती आहे, ते प्रमाण कोणामध्ये जास्त आहे अशी सखोल माहिती लागेल. त्यानुसार शहराच्या सर्वाधिक प्रदूषण असलेल्या भागांना उपाययोजनांमध्ये प्राधान्यक्रम देता येईल.  तसेच सगळ्यात जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींना प्रदूषणापासून संरक्षण मिळावे, यासाठी विशेष उपाययोजना करता येतील. या उपाययोजना कितपत व्यवहार्य, तसेच उपयुक्त आहेत याचाही विचार करायला लागेल. आरोग्य विभाग आणि शहर प्रशासन यांना उपाययोजना करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहेच; पण त्याही पलीकडे, ही  माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचू शकली तर लोकांचा सहभाग आणि सहकार्य वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत होईल.

-डॉ. रितू परचुरे, सीनिअर रिसर्च फेलो, 
प्रयास आरोग्य गट, पुणे
ritu@prayaspune.org

Web Title: Before the air pollution enters the respiratory tract and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.