पक्षबदलू नेत्यांना शुभेच्छा

By अतुल कुलकर्णी | Published: May 10, 2018 11:50 PM2018-05-10T23:50:07+5:302018-05-10T23:50:07+5:30

तमाम पक्ष बदलू नेते हो, आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो, आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत.

Best wishes to party leaders | पक्षबदलू नेत्यांना शुभेच्छा

पक्षबदलू नेत्यांना शुभेच्छा

Next

तमाम पक्ष बदलू नेते हो,
आणि त्यांना पक्षात पावन करणाऱ्यांनो,
आपण विविध पक्षातील नेत्यांना ज्या सफाईने स्वत:च्या पक्षात घेत आहात तितकी सफाई तर स्वच्छ भारत अभियानातही नाही. या अत्यंत पवित्र कार्याचे वर्णन करण्यासाठी आम्हा पामरांकडे शब्दच नाहीत. ज्या चार दोन लाख लोकांनी तुम्हाला मतं दिली त्यांच्या फुल्यावर फुल्या मारत तुम्ही बिनदिक्कत क्षणभरात जो परकाया पक्ष प्रवेश करता तसा तर या आधीच्या कोणत्याही देवदेवतांना जमला नसेल.
ही एवढी सफाई येते कुठून तुमच्याकडे? विचार, भूमिका, जनताजनार्दनास दिलेला शब्द या असल्या तद्दन फालतू शब्दांना काहीही महत्त्व नसते, हे आपण यानिमित्ताने ज्या दमदारपणे जनतेला ठासून सांगितले त्याला तोड नाही. जाहीरनामे हे फक्त टाइमपास म्हणून वाचायचे असतात आणि निवडणुका संपल्या की त्याचा उपयोग गुंडाळी करुन चणे, शेंगदाणे आणि भेळ खाण्यासाठी किती मस्त होतो हे मतदार नावाच्या तथाकथित राजाला कसे कळणार..? काही नतद्रष्ट पत्रकार आणि सो कॉल्ड बुद्धिवादी वर्ग पक्षांतरावर काहीही बोलतो. हे असले लोक तत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पण तत्त्वाने कुठं पोट भरत का साहेब. भूक लागली की अंबानी असो की चणेवाला, सगळ्यांना खायला भाजी, भाकरीच लागते. शिवाय सत्तेपुढं शहाणपण चालत नाही हे देखील या नतद्रष्ट मतदारांना आणि सो कॉल्ड बुद्धिजीवींना बिलकूल कळत नाही.
पक्षांतर करणे किंवा दुसºया पक्षात जाणे यामागची भावनाच कुणी समजून घेत नाही. अनेकदा सत्तेत असणाºया पक्षातील एखाद्या नेत्याने मित्रत्वाच्या नात्याने, विरोधी पक्षात असणाºयास प्रेमाने फोन केला आणि साहेब, तुमची फाईल आमच्याकडे आलीय... चांगली आहे... पण मी काही कुणाला देणार नाही बरं का... कारण माझं तुमच्यावर विशेष प्रेम आहे... असं समजा म्हणाला तर आपण देखील त्यांचा नको का मान ठेवायला...? शेवटी आपली संस्कृती जपायला पाहिजे की नाही...? आपल्या नेत्यांनी त्या फोन करणाºयाच्या अतीव प्रेमापोटी, तात्काळ आपला पक्ष सोडला, दुसºया पक्षात प्रवेश केला की हे बोरुबहाद्दर लगेच त्यावर भलेमोठे भाष्य करायला तयार होतात. पण मला एक सांगा, तुमच्याएवढी मैत्री अन्य कोणत्या ठिकाणी शोधून तरी सापडते का साहेब...?
मला सांगा, आता सत्तेतील एका सहयोगी पक्षाने विरोधात असणाºया एका पक्षाला जाहीर पाठिंबा दिला तर बिघडलं कुठे? पण नाही त्यातही हे लगेच काडी करत राहतात. नेत्यांना म्हणे, साधनसुचिता राहिलेली नाही, असेही सांगतात. हे असले अवघड शब्द कधी कामाला येत नाहीत. शेवटी सत्तेत असणारे विरोधकांचे मित्रच कामाला येतात, हे कसे काय विसरतात हे लोक कोणास ठावूक...? साने गुरुजींचा जमाना जाऊन आता नाणे गुरुजींचा जमाना आला हे देखील यांना कळत नाही... तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जे करताय ते अगदी योग्य आहे. असेच पक्ष बदलत राहा, जनता आपल्याशिवाय जाणार कुठे? फुल्या, फुल्या मारत आपल्यालाच मतदान करणार आहे. तेव्हा आॅल दि बेस्ट साहेबहो...
 

Web Title: Best wishes to party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.