मिलिंद बेल्हे
अस्मितेचं राजकारण करताना एक धोका कायमच असतो. जो मुद्दा तुम्ही तुमच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणता तो कालांतराने गैरलागू होत गेला किंवा त्याला हवा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला तर तुम्हाला तुमच्या राजकारणाच पोतच बदलावा लागतो. कोणत्याही अस्मितेचं राजकारण तुम्हाला दीर्घकाळ यश मिळवून देत नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायानं त्या अस्मितेच्या पंखाखाली आलेल्यांना पुढच्या काळात रिझल्ट दाखवावा लागतो. नाही तर त्यांचा अपेक्षाभंग होऊ लागतो आणि मग त्या राजकारणाचा पाया भुसभुशीत होऊ लागतो. काहीशी तशीच अवस्था राज ठाकरे यांच्या राजकारणाची झाली आहे. परप्रांतीयांना फटकावल्यानंतर ते मराठी भाषक राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. त्यांना विधानसभेला घसघशीत यश मिळाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेत चांगले यश मिळाले. नंतर तर नाशिकची सत्ता राबवण्याची संधीही मिळाली. पण पुरेशी राजकीय लवचिकता त्यांना दाखवता आली नाही. सुरूवातीचे त्यांचे राजकारण काहीसे ताठर, प्रसंगी हटवादी, शिवसेना विरोधाचे, बरेचसे एकांगी राहिले. त्यामुळे त्यांच्या आदेशानंतर आंदोलनात उतरून प्रसंगी तुरूंगात गेलेल्या, कोर्टकचेरीत अडकलेल्या अनेक तरूणांचा भ्रमनिरास झाला. राजकीय तडजोडी करणार नाही, म्हणताम्हणता शिवसेनेपासून सर्वांशी गरजेनुसार केलेला संग त्यांच्या राजकीय चंचलतेचे दर्शन घडवत गेला, इतके की त्यांच्या मनसैनिकांनाही त्याचे समर्थन करता येईना. त्यामुळे आताही जेव्हा त्यांनी 2 डिसेंबरच्या उत्तर भारतीयांच्या संमेलनात हजर राहण्यास समंती दर्शवली तेव्हापासून त्याची चर्चा होतेय ती त्याच कारणामुळे. यातून राजकीय धरसोडीचाच नवा अंक पाहायला मिळणार का, ही ठिकठिकाणच्या मनसैनिकांच्या मनातील शंका आहे. अशाच राजकारणात ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असलेले शिवसेनेचे नेते जेव्हा मतांसाठी राष्ट्रवादी मुस्लिमांना आमचा विरोध नाही, अशी मखलाशी करतात. भाजपाचे नेतेही परिवारवाद सांभाळता सांभाळता एकाही मुस्लिमाला तिकिट न देण्याची गुर्मी बाळगतानाच तोंडदेखले का होईना, पण मुस्लिम नेते सोबत ठेवतात, त्यातलाच हा प्रकार आहे. उद्या उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन `जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी`, `मुंबई-महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणाऱ्या परप्रांतीयांना आमचा विरोध नव्हता आणि नाहीही,` अशी भाषा जर राज ठाकरे यांनी केली, तर त्याला काय म्हणणार? त्याचे समर्थन कसे करणार आणि यापूर्वीच्या खळ्ळखट्याकचेही.
राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो आणि राजकारणाला कोणताही मुद्दा व्यर्ज नसतो हे खरे असले तरी राजकारणात धरसोड वृत्ती, या बोटाची थुंकी त्या बोटावर करणाऱ्यांचे भवितव्य, त्यांची राजकीय परिपक्वता, विश्वासार्हता मतदारांसाठी किती असते हे आजवर महाराष्ट्राने पाहिले आहे. मतदारांनीही मतांच्या घटत्या भाजणीने भल्याभल्यांना ते दाखवून दिले आहे. हटाव लुंगी-बजाव पुंगी सारखी आंदोलने करणारी शिवेसनाही मतांसाठी मूळ भूमिकेपासून कशी विस्तारत गेली, तिच्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या भूमिकेची कशी सरमिसळ झाली, तेही गेल्या 15 - 20 वर्षांत दिसले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाणे, पुणे, नाशिकसारख्या बहुभाषक महानगरांतच धुगधुगी असलेल्या मनसेच्या राजकारणाचा पाया आता कुठे विस्तारतो आहे. त्यासाठी नेते राज्यभर दौरे करू लागले आहेत. सध्याच्या राजकारणात टिकायचे असेल तर बदलायला हवे, त्याची गरज त्यांना पटते आहे, हेही नसे थोडके. सध्या सर्वाधिक टीआरपी मिळवणारी, भरपूर गर्दी खेचणारी, मस्त मनोरंजन करणारी भाषणे केवळ राज ठाकरे यांची असतात. पण गर्दी म्हणजे मते नव्हेत, हे पूर्वीच्या शिवसेनेच्या आणि आता मनसेच्या राजकारणातून ते नक्की शिकले असतील. जेव्हा त्यांची लागोपाठ तीन-चार दिवस भाषणे असतात, दौऱ्यात सभा असतात आणि त्या सलग एेकायला मिळाल्या की त्यात नवा मुद्दा नाही हे सहजपणे लक्षात येते. मग त्याचत्याच मुद्द्यांवर मैदान मारून नेले जाते. आताही त्यांच्या व्यंगचित्रांमुळे महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य होत असले, चिमटे काढले जात असले आणि त्यांच्या स्वभावातील मिश्किलपणाचे प्रत्यंतर येत असले ते म्हणजे राजकारण नव्हे. वेगवेगळ्या शहरात गेल्यावर तेथील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन मुद्दे समजावून घेणे आणि आपल्या मनातील विकासाची (खूप आधीपासून तयार करून ठेवलेली) ब्लू प्रिंट दाखवणे हेही राजकारण नव्हे.
पुण्यातील शरद पवारांच्या मुलाखतीनंतर राज ठाकरे यांच्या राजकारणाचा पोत बदलत गेला असे मानण्याचा प्रघात सध्या पडला आहे. पण खरेच तो बदलला आहे का, याची चुणूक 2 डिसेंबरच्या सभेतून मिळायला हवी. वाहत्या पाण्याचे प्रदूषण होऊ देऊ नका, असे सांगत गणपती विसर्जनाप्रमाणे छट पुजेसाठी कृत्रिम तलाव तयार करा, असा किरकोळ विरोधाचा मुद्दा मांडत यंदाची छट पूजा शांततेत पार पडली. गरब्याचा उत्साह द्विगुणित झाला, रमजानला शुभेच्छा दिल्या-घेतल्या गेल्या, दिवाळीचा गोडवा वाढला... यातच निवडणुका जवळ आल्याची चाहूल जशी लागली तशीच फक्त मराठी मते यश मिळवून देणार नाहीत, हे चरचरीत राजकीय वास्तवही समोर आले.
संघ परिवाराच्या हिंदुत्वाला विरोध करत मुस्लिमधार्जिणे होण्याचा धोका पत्करणाऱ्या काँग्रेसलाही सौम्य हिंदुत्वाचा आधार घ्यावाच लागला. भाजपालाही एमआयएमच्या ओवेसींना बळ देऊन तुष्टीकरणाचे राजकारण फार काळ करता येणार नाही याचा बोध झाला. त्यामुळे जशी हिंदुत्वाची व्होटबँक फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रीय राजकारणात सुरू आहे, तसाच प्रयत्न भाषक अस्मितेबाबतही सुरू आहे, असे राज ठाकरेंच्या पावित्र्यामुळे मानायला जागा आहे. आपल्याला राजकारण जमत नसेल, तर दुसऱ्याच्या राजकारणाला खो देण्याचे कसबही अंगी बाणवावे लागते. त्यातलाही हा प्रकार असू शकतो. एकंदरीतच मनसेच्या राजकारणाला नवे धुमारे फुटताहेत. पुण्याच्या मुलाखतीत शरद पवार यांनी युवकांचे संघटन बांधण्याचा त्यांना दिलेला सल्ला जर त्यांनी गंभीरपणे घेतला असेल, तर कदाचित ते भाषक राजकारणापासून बेरोजगारीच्या मुद्द्यापर्यंतही जाऊ शकतात. त्या दृष्टीने पाहायला गेले तर 25 नोव्हेंबरच्या अयोध्या भेटीनिमित्त उद्धव ठाकरे यांच्या उत्तरेतील स्वारीला 2 डिसेंबरच्या सभेतून उत्तरही मिळू शकते.
शेवटी राजकारणात अनेक जर- तर असतात. त्यातलेच हे काही.
यानिमित्ताने सोशल मीडियावर सध्या तिरकस प्रतिक्रियांचा धुमाकूळ सुरू आहे. भरकटलेले इंजिन उत्तरेच्या दिशेला यासारख्या टीकेपासून `हमार नेता कैसन बा, राज ठाकरे जैसन बा` अशा कोपरखळ्याही मारल्या जात आहेत. त्याला तेवढेच भक्कम उत्तर मनसे देणार का, हीच उत्सुकता दोन आठवडे कायम असेल...