जेवढा मोठा प्रकल्प, तेवढा मोठा विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:01 AM2018-04-29T06:01:32+5:302018-04-29T06:01:32+5:30

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल

The bigger the project, the big development! | जेवढा मोठा प्रकल्प, तेवढा मोठा विकास!

जेवढा मोठा प्रकल्प, तेवढा मोठा विकास!

googlenewsNext

- मनमोहन शर्मा
नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल; तर तो साफ चुकीचा आहे. कारण या प्रकल्पासाठी सर्वात आधुनिक असे बीएस-व्हीआय प्लस (युरो व्हीआय) निकषांची पूर्तता करणारे जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा परिणाम येथील काजू, आंबा किंवा फळबागांवर होईल, या केवळ अफवा म्हणता येतील. तसे असते तर गुजरातच्या वाळवंटी जामनगरमध्ये रिफायनरी प्रकल्प आल्यानंतरही दर्जेदार केसरी आंबा पिकलाच नसता.
देशातच नव्हे, तर जगभर इंधनाची गरज वाढताना दिसत आहे. विशेषत: मुंबईसारख्या महानगरात पेट्रोल, डिझेलच्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरीत कच्च्या तेलावर (क्रूड आॅइल) प्रक्रिया करून पेट्रोलियम पदार्थ मिळणार असतील, तर देशाच्या परकीय चलनात प्रचंड बचत होणार आहे. आजही देशाला ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यात प्रक्रिया करण्यासाठीही बाहेरील देशांतील रिफायनरीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी स्वत:ची रिफायनरी असेल, तर नक्कीच कर आणि इतर खर्च टाळता येतील. त्यातून या प्रकल्पात दररोज सुमारे १२ लाख बॅरल्स इतके पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होणार आहेत. त्याचा फायदा नक्कीच देशाला आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांना होणार आहे.
पर्यावरणावर बोलायचेच झाले, तर विरोध करायला आधारच उरत नाही. कारण आजही चेंबूर येथील रिफायनरी आणि त्याशेजारी असलेल्या मानवी वस्त्यांकडे पाहून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. ६० वर्षांपूर्वी उभारलेल्या या रिफायनरीत कालांतराने बदल केले गेले. तरीही या ठिकाणी प्रदूषणाची समस्या जाणवत नाही. याउलट नाणार प्रकल्पात सर्वात आधुनिक पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे विविध पेट्रोलियम पदार्थ मिळवताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. देशातील जामनगर, विशाखापट्टणम, मथुरा अशा विविध शहरांचेही दाखले देता येतील.
(लेखक आयसीटीचे माजी प्राध्यापक व रसायन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)
(शब्दांकन - चेतन ननावरे)

Web Title: The bigger the project, the big development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.