देशाला आठ हजार कोटी रुपयांनी गंडवून विदेशात पसार झालेल्या किंगफिशर या विमान कंपनीचा फरार मालक विजय मल्ल्या हा पळण्यापूर्वी देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना संसदेच्या संयुक्त सभागृहात भेटला असेल आणि त्यांच्याशी त्याने केलेली चर्चा सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात बंद झाली असेल तर तो केंद्र सरकार व त्याची एकूण अर्थव्यवस्था याविषयी जनतेत संशय उत्पन्न करणारा प्रकार आहे. भारतीय जनता पार्टीचे पुढारी आणि त्यांचे प्रवक्ते असे काही घडलेच नाही असे उच्चरवात सांगत असले तरी त्यांचे ते सांगणेही आता कुणाला फारसे खरे वाटत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांनी या आरोपावरून अरुण जेटलींना थेट आरोपीच्या पिंजºयातच उभे केले आहे. त्या पक्षाचे खासदार पुनिया यांनी जेटली व मल्ल्या यांची झालेली भेट सीसीटीव्हीच्या कॅमेºयात बंद असल्याचे व आपण ती प्रत्यक्ष पाहिली असल्याचे म्हटले आहे. आपले म्हणणे खोटे ठरले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी प्रतिज्ञाही त्याने केली आहे. जेटलींची ही कथित भेट झाल्याच्या दुसºया दिवशी मल्ल्या देशातून पळाला आहे. पळताना त्याने सरकारच्या विश्वासातील जेट कंपनीच्या विमानाचे पहिल्या वर्गाचे तिकीट घेतले आहे. जाताना आपल्या खासदारकीचे सारे विशेषाधिकार त्याने दिल्लीच्या विमानतळावर वापरले आहेत. शिवाय देश सोडताना त्याने आपल्यासोबत ३६ बॅगा व एक अपरिचित स्त्रीही सोबत नेली आहे. दिल्लीच्या विमानतळावर एक खासदार असे सारे करीत असताना त्याचा सुगावा सरकारला किंवा त्याच्या विमान वाहतूक मंत्रालयाला लागला नसेल यावर कोण विश्वास ठेवील? ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे तरी कोण मान्य करील? एकतर आपण जे करत आहोत त्याला सरकारचे संरक्षण आहे किंवा सरकारातले कुणीतरी आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास वाटल्याखेरीज हा मल्ल्या असा पळून जाणे कसे शक्य आहे? मल्ल्याच्या मागेपुढे आणखीही तीन माणसे अशीच देश बुडवून पळाली. त्यात दोन मोदी आणि एक चोकसी आहे. यातल्या नीरव मोदीला देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे संरक्षण व पाठिंबा होता हे कधीचेच देशाला ठाऊक झाले आहे. ‘आपल्या आजारी पत्नीला भेटायला मला इंग्लंडला जायचे आहे’ असे खोटे सांगून या मोदीने सुषमा स्वराज यांच्याकडून परदेश भेटीचा परवाना मिळविला व त्याचवेळी त्या परवान्यावर जगातील इतर देशांना भेटी देण्याची परवानगीही प्राप्त केली. देश सोडून गेल्यानंतर हा मोदी साºया जगात हिंडत राहिला. सध्या तो इंग्लंडमध्ये आहे. दुसरा मोदी असाच सरकारला पूर्वसूचना देऊन देशातून बेपत्ता झाला. तिसरा चोकसी हा सध्या अँटिग्वा या देशाच्या आश्रयाने राहात आहे. या तिघांनाही स्वदेशात आणण्याची व त्यांना योग्य ते शासन करण्याची प्रतिज्ञा मोदी सरकारने केली आहे. ते मात्र या सरकारला व देशाला वाकुल्या दाखवत आपापल्या जागी मजेत आहेत. मल्ल्या इंग्लंडच्या राणीच्या नवºयासोबत टेनिस खेळतो आणि अनेक जागतिक नेत्यांच्या पार्ट्यांमध्येही सामील होतो. नीरव मोदी खेळाच्या मैदानावर असतो. दुसरा मोदीही मजेत राहतो आणि चोकसी भारतात पत्रके पाठवतो. हा सारा इतिहास पाहता मल्ल्याने जेटलींची भेट घेतली असणे व त्यांच्याशी चर्चा केली असणे कुणालाही खोटे वाटणारे नाही. सबब या प्रकरणातील सत्य समाजासमोर आले पाहिजे. काँग्रेसचे लोक खोटे आरोप करतात आणि भाजपाचे लोक सत्याला स्मरून बोलतात यावर आता कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. त्यातून सीसीटीव्हीचा कॅमेरा खोटे बोलणार नाही आणि संसदेच्या संयुक्त सभागृहात झालेली जेटली व मल्ल्या यांची भेट सरकारच्या दफ्तरातही नोंदविली गेल्याखेरीज राहिली असणार नाही. सबब या प्रकरणातले सत्य देशाला समजले पाहिजे.
मल्ल्या व जेटलींचे रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 6:21 AM