- डॉ. प्रकाश पवारराज्यशास्त्र विभागप्रमुख,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये राजकीय संघर्षाला सुरुवात पाच वर्षांपूर्वी झाली. कारण शिवसेना-भाजपाच्या लोकसभेच्या जागा वाढल्या, त्यास मोदीलाट जबाबदार असल्याचा दावा भाजपाने केला. त्यामुळे शिवसेनेचा आत्मसन्मान दुखावला गेला. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती मोडली गेली. शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. स्वतंत्रपणे निवडणूक लढवूनदेखील शिवसेनेला जवळपास २० टक्के मते आणि ६३ विधानसभेच्या जागा मिळाल्या होत्या. यामुळे शिवसेनेचे स्थान भाजपाच्या तुलनेत दुय्यम स्थानावर गेले, परंतु शिवसेनेने स्वतंत्रपणे प्रगती मात्र केली होती. शिवसेनेने ही गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील सिद्ध केली. उदा. सध्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला. शिवसेनेच्या तुलनेत भाजपाला दुय्यम स्थानावर जावे लागले. यातूनच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचे वाटप आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक आधार या दोन मुद्द्यांवरून या दोन्हीही पक्षात चढाओढ सुरू आहे. भाजपाने बुथ स्तरावर कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. असेच धोरण शिवसेनेनेदेखील राबविण्यास सुरुवात केली. शिवसेनेने भाजपाप्रमाणे बुथप्रमुख, पन्नाप्रमुख, वन बूथ टष्ट्वेंटी युथ असे धोरण स्वीकारले. म्हणून भाजपाकडून सातत्याने असा दावा केला जात आहे की, कुबड्या आम्ही घेत नाही, तर याउलट शिवसेना आत्मनिर्भरतेची घोषणा देते. यातूनच या दोन पक्षांमध्ये तणाव वाढला आहे.भाजपाप्रमाणे शिवसेनेने नवीन संकल्पनांचा वापर करून भाजपावर नाराज असणारे मतदार शिवसेनेकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेने आक्रमक हिंंदुत्व, गुजराती अस्मिता, उत्तर भारतीय अस्मिता अशा नवीन कल्पना राजकारणात आजच्या संदर्भात मांडल्या आहेत. उदा. भाजपाचे हिंंदुत्व राम मंदिर केंद्रित नाही, तर शिवसेनेचे हिंंदुत्व राम मंदिर केंद्रित आहे. अशी कल्पना शिवसेनेने पुढे आणली आहे. शिवसेनेने अशी घोषणा वापरली की, प्रत्येक हिंंदूचा हाच आवाज प्रथम मंदिर नंतर सरकार, ही शिवसेनेची हिंंदुत्वविषयक धारणा मुंबई भागातील उत्तर भारतीय मतदारांना संघटित करणारी आहे, तसेच त्यांची आक्रमक हिंंदुत्व अस्मिता व्यक्त करणारी आहे. तर याउलट संघ व इतर संघटना भाजपा हिंंदू मंदिर बांधण्यात टाळाटाळ करीत आहे, असा प्रचार करीत आहेत. यातूनच आक्रमक हिंंदुत्वाचा एक अवकाश तयार झाला आहे. तो शिवसेनेने आपल्याकडे वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा उठविल्यानेच सेना-भाजपामध्ये हिंंदुत्वाच्या विचारसरणीवर वाद उभा राहिला.शिवसेनेने नोटाबंदीतून उदयाला आलेल्या एका नवीन पोकळीचादेखील प्रचारात मुद्दा आणला. नोटाबंदीमुळे लघू उद्योजकांना व रिअल इस्टेटला तोटा झाला. गुजराती, मारवाडी, लोहाना असे गुजरातमधील समूह या आर्थिक तोट्यामुळे भाजपा विरोधात गेले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नोटाबंदीविरोधी भूमिका घेतली. ही भूमिका गुजराती अस्मिता व हितसंबंध जपणारी आहे. छोटे उद्योजक व व्यापारी भाजपाचे समर्थक होते, त्यांना जीएसटी, नोटबंदीमुळे फटका बसला. अशा उद्योगप्रधान समूहाचे हितसंबंध जपण्याची कल्पना शहरी भागात विकसित करत आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये सामाजिक आधारावरून अंतर्गतपणे धुमश्चक्री सुरू आहे. शिवसेनेला मराठा, ओबीसी या समूहांमधून पाठिंंबा मिळतो. भाजपाने मराठा आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला. यामुळेदेखील शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये मराठ्यांच्या सामाजिक पाठिंंब्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली. शिवसेना पक्षांतराच्या मुद्द्यांवरून भाजपाच्या विरोधात गेली आहे. राज्यात ग्रामीण मतदारसंघांची संख्या कमी आणि शहरी मतदारसंघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा भाजपा-शिवसेनेतील संघर्ष शहरी भागातील आधार मिळविण्यासाठी वाढलेला दिसतो. शहरी भागाचे राजकारण रिअल इस्टेटवर आधारलेले आहे. भाजपा लोकांना घरे किती दिली, याचा प्रचार करीत आहे, तर शिवसेना यामुळे दुखावली जात आहे.कल्याण-डोंबिवली येथे मोठा गाव, रेती बंदर येथील रस्ता योग्य आणि अयोग्य पद्धतीने बांधला, यावरून शिवसेना-भाजपामध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचा गाभादेखील रिअल इस्टेट हाच आहे. शिवसेना आणि भाजपाचे हे राजकारण ‘शठम् प्रति शाठ्यम्’ या तत्त्वावर सुरू आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये शिवसेनेला जागावाटपाचे सूत्र जुने अपेक्षित आहे, तर भाजपाला जागावाटपाचे सूत्र बदलावयाचे आहे. या सर्व धामधुमीत शिवसेना-भाजपा युती झाली, तर भाजपाचा काही तोटा कमी होऊ शकतो, परंतु शिवसेना-भाजपा युती नाही झाली, तर भाजपाच्या निम्म्या जागा कमी होऊ शकतात, तर शिवसेना ४-५ जागांवरती खाली येऊ शकते. हा बदल लोकसभेसाठी होईल, परंतु जर शिवसेना-भाजपा यांच्यामध्ये युती झाली, तर महाराष्टÑातील निम्म्या जागांपर्यंत शिवसेना-भाजपा मजल मारू शकते, परंतु युती झाली नाही, तर शिवसेना-भाजपाच्या जागा या निम्म्यापेक्षा जास्त खाली घसरू शकतात. त्यामुळे भाजपा शिवसेनेशी लोकसभेला वेगळी व विधानसभेला वेगळी युती करण्याचे नवे प्रारूप पुढे आणण्याची शक्यता जास्त दिसते.
भाजपापुढील पेचप्रसंग; सेनेच्या नव्या धारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:47 AM