बळजबरीच्या धर्मांतराविषयी संघ आणि भाजपा परिवाराची भूमिका नेहमी आक्रमक असते. मात्र सत्तेच्या अतिलालसेपायी आता हाच भाजपा चक्क बळजबरीने पक्षांतरे घडवून आणू लागला आहे. धर्मांतरासाठी आमिषे दाखविली जातात, असा आरोप होत असतो तर पक्षांतरासाठी आमिषांसोबत नाकाबंदी, कोंडी केली जाते. पर्याय खुंटल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी भाजपामध्ये जात आहे. खान्देशात तसाही भाजपा ‘शतप्रतिशत’कडे वाटचाल करीत आहे. सार्वत्रिक निवडणुकांची प्रतीक्षाही न करता संपूर्ण पालिका भाजपामध्ये आणण्याचे घाऊक कार्य वेगाने सुरू आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर नगरपालिका काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात होती. अडीच वर्षांनंतर सत्ताधारी नगरसेवकांनी घाऊकपणे बंडखोरी केली आणि महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघातील शिंदखेडा नगरपंचायतीत काँग्रेस-राष्टÑवादीशी संबंधित नेत्यांची आघाडी सत्तेत आहे. नोव्हेंबर महिन्यात तेथे निवडणूक होणार आहे. सत्ताधारी गटनेत्याने दहा नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. याची पुनरावृत्ती रावल आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे धुळ्यात करीत आहेत. पुढील वर्षी तेथे निवडणूक आहे. महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. सर्वपक्षीय मातब्बर नेते आणि नगरसेवकांना ‘भाजपा’मध्ये पावन करून घेण्याचे केंद्र उघडल्याप्रमाणे साप्ताहिक पक्षांतर सोहळे होत आहेत. जळगावचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या पत्नी व विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामारे जावे लागले. त्यापूर्वी विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाची कामगिरी सुमार दर्जाची राहिली. राष्टÑवादीच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या आघाडीने पालिकेत सत्ता स्थापन केली आणि आता लोकनियुक्त नगराध्यक्षांसह १३ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मंत्री, आमदारपदाचा वापर करून पालिकांची कोंडी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आमदार निधीतून करावयाची कामे पालिकेमार्फत न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय घेणे, शासकीय योजनांचे प्रस्ताव अडकवून ठेवणे या कारवायांमुळे नगरसेवक मेटाकुटीला येणे स्वाभाविक आहे. विकास कामे होत नसतील आणि या परमार्थातून ‘स्वार्थ’साधत नसेल तर नगरसेवक होण्यात काय फायदा हा व्यावहारिक विचार करून त्यांनी ‘भाजपा’वासी होण्याचा निर्णय बहुदा घेतला असावा.
सत्तेच्या अतिलालसेपायी भाजपा बळजबरीने पक्षांतरे घडवू लागलाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 4:50 AM