कॉंग्रेसचे नेते नारायण राणे आणि प्रकाश आवाडे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध आहे. याची भाजपच्या वरिष्ठांनी तातडीने दखल घेऊन, तूर्तास तरी हा प्रवेश थांबविला आहे. मात्र आपले घर पडत असताना काहीच हालचाल कॉँग्रेसच्या नेत्यांकडून होत नाही, याचे आश्चर्य वाटते!देशाचा आणि राज्याचा कारभार पाहणा-या भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्टÑातील कॉँग्रेस विचारसरणीचा पहाड अजूनही कठीणच वाटतो आहे. त्याला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेसमधील नाराजीचा लाभ उठवित भाजपचा पक्षविस्तार करण्यात ताकद खर्ची पडत आहे. त्यामध्ये मूळ भाजपवाले कार्यकर्ते, नेते आणि निष्ठावान संघवाले बाजूला फेकले जात आहेत. त्यांच्यात एक आंतरिक नाराजी आहे. पण पक्षनेतृत्वानेच जेथे पक्षाच्या विस्तारास मर्यादा आहेत, असे वाटते, तेथे ‘फोडा आणि जोडा’ नीती वापरण्यात येऊ लागली आहे. त्यामुळेच कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीतून नाराज असणाºयांना आपल्याकडे ओढण्याची कला भाजपला हस्तगत करण्याची ओढ लागली आहे. यासाठीच्या मोहिमेवर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना नेमण्यात आले आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारे आवाडे घराणे भाजपच्या हाताला लागेल, असे वातावरण आहे. जिल्ह्याच्या कॉँग्रेसी राजकारणात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, त्यांचे पुत्र माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना नेहमीच डावलण्यात आल्याची भावना आहे. इचलकरंजी परिसरात संस्थात्मक काम उभे करण्यात त्यांच्याइतके कोणीही कष्ट घेतलेले नाहीत. मात्र राजकीय स्पर्धेतून त्यांना बाजूला करण्यासाठी कॉँग्रेसमधीलच जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांच्या गटाकडून कुरघोड्या केल्या जातात. त्याचा फटका आवाडे यांना बसलाच, मात्र त्यापेक्षा अधिक तोटा कॉँग्रेस पक्षाचा झाला. दोन गटात विभागल्या गेलेल्या कॉँग्रेसमुळे पक्षाची ताकद संपत चालली आहे. याच राजकारणातून प्रकाश आवाडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी कॉँग्रेसच्या दुसºया गटाने भाजपला मदत केली. परिणामी एकेकाळचा बालेकिल्ला असणारा इचलकरंजी परिसर भाजपकडे गेला. या सर्व राजकारणाला कंटाळून जिल्हा परिषद निवडणुकीत आवाडे समर्थकांनी ताराराणी आघाडी स्थापन केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आवाडे यांच्या गटाला एकही जागा द्यायची नाही, अशी खेळी विरोधी गटाने केली होती. आवाडे यांच्या गटाने कॉँग्रेसशी फारकत घेताच, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हातकणंगले तालुक्यात (११ जागा) कॉँग्रेसला एकही जि.प. सदस्य निवडून आणता आला नाही.कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीने पक्ष पोखरून संपत चालला असतानाही, प्रदेश कॉँग्रेस समितीकडून कोणीही लक्ष देत नाहीत. अशा राजकारणाला कंटाळून प्रकाश आवाडे यांनी चक्क भाजपमध्येच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे संपूर्ण ६० वर्षांचे राजकारण कॉँग्रेसचा झेंडा हाती घेऊन, कॉँग्रेसच्या विचाराने झाले, त्याला हा छेद आहे. त्यांच्या या निर्णयाने कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना काहीही वाटत नाही. प्रकाश आवाडे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन, त्यांच्याबरोबर भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हा निर्णय पटेना. त्यांनी आवाडे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला आहे. कॉँग्रेसचे कार्यकर्ते भगवी वस्त्रे परिधान करण्यास तयार झाले आहेत. भाजपचे कार्यकर्ते मात्र, त्यांच्या पंगतीत आम्ही कसे काय बसू शकतो? असे म्हणतात. ज्यांंच्याशी संघर्ष करुन आम्ही उभे राहिलो त्यांच्यासोबत आम्ही कसे काम करावयाचे असा त्यांचा सवाल आहे.तिकडे नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाचेही असेच त्रांगडे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणे यांच्या भाजप प्रवेशाला अनुकूल आहेत. महसूलमंत्री चंद्रकांतदादा यांनी तर राणे यांच्यासाठी आपले मंत्रिपद सोडायला तयार आहे असे, जाहीरपणे सांगितले आहे. असे असले तरी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा या प्रवेशाला विरोध आहे. याची भाजपच्या वरिष्ठांनी तातडीने दखल घेऊन, तूर्तास तरी हा प्रवेश थांबविला आहे. एवढीसुद्धा हालचाल पक्षाचे घर पडत असताना कॉँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडून होत नाही, याचे आश्चर्य वाटते!
भाजपच्या विस्तारास कॉँग्रेसचीच मदत!
By वसंत भोसले | Published: August 26, 2017 2:12 AM