भारतीय रेल्वेमागचे शुक्लकाष्ठ अजून संपलेले दिसत नाही. देशातल्या वेगवान रेल्वेमध्ये अभिमानाने उल्लेख होत असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये घडलेली विषबाधेची घटना रेल्वे सेवेची नाचक्की करणारी आहे. रेल्वेची ‘खानपान’ सेवा एकेकाळी दर्जेदार आणि परवडणारी मानली जायची. पण गेल्या १५-२० वर्षांत या सेवेचा दर्जा प्रचंड प्रमाणात घसरला. केवळ पर्याय नसल्याने ही सेवा जिवंत राहिली. त्याची गांभीर्याने दखल घेत रेल्वे मंडळाने सुधारणा करण्याच्या घोषणाही केल्या. पण तेजसमधील विषबाधेच्या घटनेने रेल्वेची ही सेवाही काळवंडली. ‘तेजस’मधील आॅम्लेट आणि सूप प्यायल्यानंतर अनेकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. जवळपास २४ जणांना बाधा झाली. त्यातील तिघांची प्रकृती तर अत्यवस्थ झाली होती. या घटनेमुळे रेल्वेमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी पुन्हा एकदा चर्चा चव्हाट्यावर आली आहे. ‘पॅन्ट्री कार’मधील अस्वच्छता, पुरेसे प्रशिक्षण नसलेले कर्मचारी, खानपानाचे कंत्राट एकदा मिळाल्यानंतर दर्जाकडे ढुंकूनही न पाहणारे मिजासखोर कंत्राटदार आणि त्यांना पाठीशी घालणारे रेल्वे अधिकारी या सर्वांची तपशिलाने चौकशी व्हायला हवी. ‘तेजस’मधील घटनेनंतर वरिष्ठ अधिकाºयांनी सर्वच रेल्वेमधील खाद्य पदार्थांची चाळणी पद्धतीने तपासणी करायला हवी. ज्या कंत्राटदारांकडून खाण्याचा दर्जा राखला गेलेला नाही त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकायला हवे. कारण हा थेट प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. रेल्वेने गेल्या अर्थसंकल्पात चार नवीन एक्स्प्रेसची घोषणा केली. हमसफर, अंत्योदय, उदय आणि तेजस एक्स्प्रेस. तेजस एक्स्प्रेसला भारतीय रेल्वेचा वेगवान चेहरा म्हणून देशासमोर सादर करण्यात आले. परंतु विषबाधेच्या घटनेने ही प्रतिमा धुळीस मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्यातील तीन रेल्वे अपघात असोत; दुरांतो एक्स्प्रेस, एल्फिन्स्टन दुर्घटना असो वा तेजसमधील विषबाधा. खरेतर, यामुळे भारतीय रेल्वेच्या तेजाला ग्रहण लागले आहे. सप्टेंबरमध्ये तीन रेल्वे अपघात घडले. शक्तिकुंज, कैफियत, उत्कल एक्स्प्रेस या तीनही अपघातांत प्रवासी दगावले. आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेस घसरली. यात जीवितहानी झाली नाही.त्यानंतर रेल्वे इतिहासात काळ्या शाईने नोंदवली जाणारी घटना पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात घडली. प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत २३ निष्पापांचा बळी गेला. याचा परिणाम म्हणजे दोन दिवस रेल्वेमंत्र्यांनी बैठका घेतल्या. रेल्वेच्या व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या घोषणा झाल्या. त्या घटनेला महिना पूर्ण होण्याच्या आधीच तेजसला चिपळूण येथे ब्रेक लागला. या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. पण, रेल्वेच्या खाद्यसेवेचे पुरते धिंडवडे उडाले. ती भरपाई कशी करणार, हा खरा प्रश्न आहे.
रेल्वेचा ‘तेजो’भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 3:50 AM