यमकेची बकेट लिस्ट...
By राजा माने | Published: June 11, 2018 12:16 AM2018-06-11T00:16:09+5:302018-06-11T00:16:09+5:30
महागुरू नारदांचा ‘बकेट लिस्ट कळवा’, हा मेसेज वाचून आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज सुखावला होता. आपली बकेट लिस्ट इंद्रदेव पाहणार आणि आपली सगळी स्वप्नं पूर्ण होणार, असा विचार करीत असतानाच नारदांचा दुसरा मेसेज इनबॉक्समध्ये येऊन थडकला...
महागुरू नारदांचा ‘बकेट लिस्ट कळवा’, हा मेसेज वाचून आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज सुखावला होता. आपली बकेट लिस्ट इंद्रदेव पाहणार आणि आपली सगळी स्वप्नं पूर्ण होणार, असा विचार करीत असतानाच नारदांचा दुसरा मेसेज इनबॉक्समध्ये येऊन थडकला... ‘बकेट लिस्टमधील फक्त एकच स्वप्न-इच्छा कळव.’ या मेसेजमुळे मात्र यमके हिरमुसला. केवळ एकच इच्छा कळवायची म्हणजे इतर इच्छांवर पाणी सोडायचे! अखेर त्याने ‘कळीच्या नारदा’प्रमाणे ‘कळीचा सुपरस्टार रिपोर्टर’ बनण्याची इच्छा कळविली. तसा मेसेजही धाडला. मेसेजला उत्तर न देता नारदांनी थेट फोनच केला. रिंगटोन वाजू लागली... नारायणऽ...नारायणऽ...! यमकेने फोन घेतला.
नारद : खुळ्या शिष्या! मी तुला तुझी बकेट लिस्ट मागितली नाही. मराठी भूमीतील दिग्गजांची माहिती मागितली आहे.
यमके : (गोंधळून जाऊन) बकेट लिस्ट सिनेमाला १० कोटींचा धंदा झालाय. मग माधुरी दीक्षित-नेनेंची बकेट लिस्ट पाठवू?
नारद : नेन्यांची सगळी लिस्ट पूर्ण झालेली आहे. आता लिस्टमध्ये नवे ते काय देणार?
नारद : अरे, अमितभाई ‘संपर्क से समर्थन’ साठी तिथे गेले होते. बाकी काही नाही. तू मराठी भूमीतील इतर दिग्गजांना भेटून प्रत्येकाची बकेट लिस्ट पाठव. अर्थात...लिस्टमधील एकच इच्छा!
यमकेने होकार दिला आणि दिग्गजांच्या भेटीसाठी धावला. सुदैवाने देवेंद्रभाऊ, पृथ्वीराजबाबा, सुशीलकुमार, अशोकराव, अजितदादा, चंद्रकांतदादा, राऊत, विनोदभाऊ, सुभाषबापू, इस्लामपूरचे जयंतराव ही सगळीच मंडळी मंत्रालयाच्या आवारात भेटली. या संधीचा फायदा घेत, यमकेने त्यांना थांबविले आणि लिस्टमधील एक इच्छा सांगण्याची विनंती केली.
देवेंद्रभाऊ : रेशीमबागेत पाहिली जाणारी सगळी स्वप्नं सेनेच्या साथीने साकार होवोत.
राऊत : स्वतंत्र लढणार...२०१९ ला सेनेचाच झेंडा फडकणार!
यमके : इच्छा सांगा राऊतसाहेब...
राऊत : स्वतंत्रच लढणार...मोठ्या साहेबांचे स्वप्न तेच माझे स्वप्न...समजून घ्या! (यमके लगेच पृथ्वीराजबाबांकडे वळला)
पृथ्वीराजबाबा : हात तंदुरुस्त झाले आहेत. आता अजितदादांच्या साथीने पुन्हा फायलींवर सह्या करण्याची संधी लाभो... (शेजारीच उभे असलेले अशोकराव लगेचच बोलते झाले)
अशोकराव : मला तर लोकाश्रय आहे. फायलींवर सह्याची पहिली संधी मलाच लाभो. (यानंतर मात्र हजर असलेला प्रत्येक दिग्गज गडबडीने बोलू लागला)
सुशीलकुमार : बुढ्ढी के बाल विकून शाळा शिकलेला मी मुलगा...जनतेने मला भरभरून दिले...आता, सोलापूरकरांनी लोकसभेत धाडावे, एवढेच!
चंद्रकांतदादा : देवेंद्रभाऊंनी विश्रांती घेतली तर रेशीमबाग व अमितभाई दाखवतील तेच माझे स्वप्न.
विनोदभाऊ : ‘सायलेंट मोड’ लवकर संपवा.
अजितदादा : साहेब पाहतील तेच माझे स्वप्न!
जयंतराव : अजितदादांचं स्वप्न साकार होवो.
सुभाषबापू : मी गरीब, प्रामाणिक माणूस. गडकरीसाहेब पाहतील तेच माझे स्वप्न. (एवढ्यात तिथे नारायणदादा दाखल झाले) नारायणदादा : कोकणाला टाळता काय? सेनेला चारीमुंड्या चित करणे, ही एकच इच्छा! (यमकेने सगळ्यांची बकेट लिस्ट पाठविली व शेवटी एक ता.क. लिहिले...‘कुणाच्या बकेट लिस्टमध्ये असो वा नसो, सर्वांच्या युत्या होणारच!’ )