‘त्या’ पोरांना बुलडोझरचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:07 AM2019-12-07T03:07:33+5:302019-12-07T03:07:55+5:30
पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणारी ही शाळा कमालीची संस्कारक्षम असून, ती मुला-मुलींना देशभक्तीपर व समाजसेवेची शिकवण देणारी गाणीही त्यांच्या शालेय अभ्यासासोबत शिकविते.
- सुरेश द्वादशीवार
(संपादक, लोकमत, नागपूर)
सरकार ही बहुधा हृदयशून्य व्यवस्था असावी अन्यथा ४७१ अनाथ व दरिद्री मुला-मुलींची शाळा व निवासस्थाने बुलडोझरने जमीनदोस्त करून तिने त्यांना हिवाळ्याच्या या आरंभी रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या बांधलेल्या टिनांच्या शेडमध्ये राहायला भाग पाडले नसते. नागपूरहून कारंजाला जाताना मंगरूळ-चव्हाळा या खेड्याच्या उजव्या हाताला दोन फर्लांगावर या मुलांच्या शाळेचे अर्धमेले शव पडले आहे. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या समृद्धी मार्गाच्या आड ही शाळा येते म्हणून सरकारच्या संबंधित विभागाने ही दुष्ट कारवाई केली आहे.
ही शाळा साºया महाराष्ट्रातून गोळा केलेल्या फासेपारधी या भटक्या समाजातील मुला-मुलींसाठी एका मतिन भोसले नावाच्या तरुणाने जनतेच्या मदतीने उभी केली आहे. महिन्यातील २० दिवस गावोगाव हिंडून पैसे जमा करायचे, शाळा चालवायची आणि त्या मुलांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करायची, हा उद्योग त्याने गेली काही वर्षे चालविला. महाराष्ट्राच्या एका वृत्तपत्राने त्याला ७७ लाखांची मदतही केली. गावोगावचे सहृदय लोक त्याला वर्गण्या व देणग्या देऊन ती शाळा जगवण्याचा प्रयत्न करतात.
पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणारी ही शाळा कमालीची संस्कारक्षम असून, ती मुला-मुलींना देशभक्तीपर व समाजसेवेची शिकवण देणारी गाणीही त्यांच्या शालेय अभ्यासासोबत शिकविते. या शाळेची याच लोकांनी बांधलेली सुमारे पावणेदोन कोटींची इमारत या समृद्धी सडकेसाठी सरकारने जमीनदोस्त केली. ती पाडण्याआधी आम्हाला पर्यायी जागा व इमारत द्या ही त्या अभागी पोरांनी केलेली मागणी सरकारने जराही मनावर घेतली नाही. शाळेला सरकारी अनुदान नाही. कोणताही लोकप्रतिनिधी वा अधिकारी तिला भेट देत नाही.
परिणामी, या अपुºया वस्त्रातील व अभावात जगणाºया पोरांनी त्या महामार्गाचे बांधकाम थांबविले. आता सरकारने त्यांच्या या अपराधासाठी त्यांच्यावर ७५ लक्ष रुपयांचा दंड बसविला आहे. तो न दिल्यास सरकार त्या मतिनला व त्याच्या सहकाऱ्यांना तुरुंगात डांबायला सज्ज झाले आहे. टिनाच्या पत्र्यांची ही शाळा व त्यात शिकणारी ती अश्राप पोरे पाहूनही एखाद्या सहृदय माणसाच्या डोळ्यात पाणी यावे. कुणाची मदत नाही, कोणता पुढारी पाठीशी नाही, सरकार डोळे वटारून उभे आहे आणि ती गरीब पोरे उघड्यावर राहून टिनांच्या झोपड्यात कशीबशी शिकत आहेत.
लोक येतात, शाळा पाहतात, अश्रू गाळतात आणि आपल्याला जमेल तेवढी मदत शाळेच्या स्वाधीन करतात. ही मुले अर्धवट कपड्यांत व मिळेल त्या अन्नात कशी जगत असावीत आणि त्या पोरांना हा मतिन भोसले नावाचा तरुण व त्याची बहुधा आजारी असलेली पत्नी कसा धीर देत असावी, याची कल्पना करणेच मुळात अवघड आहे. त्याला प्रकाश आमटेने काही मदत केली. समाजकारणातील माणसे त्याच्या पाठीशी आहेत. पत्रकारांना त्याच्याविषयी सहानुभूती आहे. राजकारणातील माणसे त्याच्याविषयी आत्मीयतेने बोलणारी आहेत. पण त्याला प्रत्यक्ष मदत होईल व त्याची शाळा एखाद्या जवळच्या पर्यायी जागेवर बांधून द्यायला सरकारला भाग पाडतील, असे त्यात कुणी नाही.
उद्या मतिनला तो दंड झाला वा त्याला तुरुंगात जावे लागले तर त्याची ही सारी मुले उघड्यावर येतील आणि त्या स्थितीत त्यांच्या मागे कुणी उभे राहणार नाही. सरकारकडे अर्जविनंत्या करून झाल्या. पुढाºयांच्या पायºया झिजवून झाल्या. अगदी अण्णा हजारे यांनाही सांगून झाले. पण त्यातील कुणालाही या पोरांसाठी पाझर फुटला नाही. ही आपलीच मुले आहेत आणि त्यांना चांगले जीवन लाभावे हे पाहणे ही आपली जबाबदारी आहे, असे कुणा उद्योगपतीला वा दानशूराला अद्याप वाटले नाही.
आपले दु:ख आणि आपले अभाव आपल्याच हृदयात कोंडून हा मतिन व त्याचे सहकारी कार्यकर्ते हे काम नेटाने आणि निर्भयतेने करतात. ‘मी तुरुंगात जाईन; पण ही टिनाची शाळा पडू देणार नाही,’ असे तो म्हणतो. मात्र सर्व शक्तिमान सरकार, त्याचे पोलीस, त्यांच्या मागे उभे असलेले राजकारण या साºयांना ही अर्धवस्त्रातील व बहुधा अर्धपोटीच झोपणारी फासेपारध्यांची गरीब व निराधार मुले कसे व कुठवर तोंड देणार? शिवाय ती उरलीसुरली शाळा पाडायला सरकारी यंत्रणा तिच्यासमोरच याक्षणी उभी आहे.