करु शकतो, करुन दाखवले!

By admin | Published: January 12, 2017 12:24 AM2017-01-12T00:24:53+5:302017-01-12T00:24:53+5:30

आठ वर्षांची आपली कारकीर्द संपुष्टात येण्यास जेमतेम आठवडाभराचा अवधी शिल्लक असताना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी

Can do it! | करु शकतो, करुन दाखवले!

करु शकतो, करुन दाखवले!

Next

आठ वर्षांची आपली कारकीर्द संपुष्टात येण्यास जेमतेम आठवडाभराचा अवधी शिल्लक असताना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष या नात्याने अमेरिकन जनतेचा निरोप घेण्यासाठी केलेल्या भाषणाद्वारे सर्वसमावेशकतेचा जो संदेश दिला तो केवळ त्यांचे उत्तराधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांनाच नव्हे तर भारतातील विद्यमान राजवटीलाही लागू पडणारा आहे. रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश (धाकली पाती) यांची सलग आठ वर्षांची कारकीर्द खालसा करुन डेमोक्रॅट बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष बनले, ते निश्चितच अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासातील एक नवे पान होते. केवळ कृष्णवर्णीयच नव्हे तर कृष्णवर्णीय आणि जन्माने मुस्लीम असलेल्या ओबामा यांना आठ वर्षांपूर्वी प्रथमच अमेरिकी जनतेने आपला अध्यक्ष म्हणून निवडून दिले आणि त्या देशातील अत्यंत प्रगल्भ लोकशाहीचे दर्शन जगाला घडले. ओबामा सत्तेत आले तेव्हां अमेरिकेला आर्थिक मंदीने ग्रासले होते. औद्योगिक उत्पादन घटले होते. रोजगार निर्मितीचा दर घसरला होता आणि केवळ तितकेच नव्हे तर ज्याला सर्वात भीषण म्हणता येईल अशा अतिरेकी हल्ल्याची जखम तशीच भळभळत होती. आपण कोणत्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची सूत्रे हाती घेत आहोत याचे संपूर्ण भान ठेऊन याही परिस्थितीतून ‘आपण सारे मिळून मार्ग काढू शकतो आणि संकटांवर मात करु शकतो’ असे आश्वासक अभिवचन तेव्हां त्यांनी दिले होते. स्वाभाविकच गेल्या आठ वर्षात आर्थिक स्थितीत, औद्योगिक उत्पादनात, रोजगार निर्मितीत सुधारणा घडवून आणतानाच अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात घुसून ठार मारल्याची जी कामगिरी आपल्या राजवटीत पार पडली तिच्याबद्दल बोलताना आपण हे करु शकत होतो व तसे आपण जणून होतो, असा जो कृतार्थ भाव ओबामा यांनी व्यक्त केला तो करतानाच ‘यापुढेही आपण करु शकतो’ अशी जी पुस्ती त्यांनी जोडली ती महत्वाची आहे. येत्या वीस तारखेस अधिकृतपणे डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता संपून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपादाची रिपब्लिकन सत्ता तिथे स्थापन होणार आहे. ज्याला ग्राम्य भाषेत उटपटांग म्हणता येईल अशीच ट्रम्प यांची आजवरची विधाने आहेत. निवडणुकीच्या प्रचारकाळात जी वक्तव्ये केली जातात, त्यांच्या तुलनेत निवडून्Þा आल्यानंतर केलेली वक्तव्ये भिन्न असतात असाच लोकशाहीचा एकूण अनुभव असतो. पण ट्रम्प यालाही अपवाद आहेत. मुस्लीमांचा द्वेष, मेक्सिकन लोकांविषयी घृणा, कृष्णवर्णीयांचा तिरस्कार, स्थलांतरांविषयी चीड, जागतिक तपमानवृद्धीच्या संकटाची थट्टा, अशा अनेक विषयांवरील त्यांची मते खुद्द अमेरिकी राष्ट्र आणि तेथील आजवरची सरकारे यांनी आखून ठेवलेल्या मार्गापासून भलत्याच दिशेने भरकटणारी ठरली आहेत. केवळ तितकेच नव्हे तर ज्या संयुक्त राष्ट्र संघटनेला अमेरिकेच्या वर्चस्वाखालील एक बलाढ्य संघटना म्हणून सारे जग ओळखते त्या संघटनेला चक्क गप्पा मारण्याचा अड्डा म्हणून हिणवण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली आहे. अमेरिका स्वत:ला जागतिक पोलीस मानते आणि सतत त्याच आविर्भावात वावरते अशी टीका प्रसंगवशात भारतातही झाली असली आणि तालिबान असो की जगातील अन्य अतिरेकी संघटना असोत, त्यांची जन्मदात्रीदेखी तीच असली तरी जगातील एक बलाढ्य लोकशाही ही अमेरिकेची मोठी ओळख आहे. जागतिक पातळीवरील महाशक्तींचा विचार करताना अमेरिकेची चीन आणि रशिया यांच्याशी तुलना केली जात असली तरी ही दोन्ही राष्ट्रे लोकशाहीवादी नाहीत. परंतु ट्रम्प त्यांच्याशी संधान बांधून अमेरिकेच्या आजवरच्या पराराष्ट्र धोरणालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जगातील महाशक्ती म्हणून अमेरिकेच्या जवळपासदेखील कोणी फिरकू शकत नाही हे ओबामा यांचे विधान महत्वपूर्ण ठरते. ट्रम्प यांनी ‘भूपुत्र आणि त्यांच्या कथित हितांचे रक्षण’ असा नारा लावून जो प्रचार केला, त्याचाही ओबामा यांनी खरपूस समाचार घेतला. विविधतेतील एकता हेच लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण असते आणि सर्वांना समानतेची वागणूक देऊन सर्वांना सोबत घेऊन चालायचे असते व त्यातच खरे देशहित असते हा ओबामा यांनी दिलेला संदेश जेवढा ट्रम्प यांच्या संभाव्य राजवटीला लागू पडतो तेवढाच तो भारतालाही लागू पडतो. भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिकेत जशी पूर्वापार द्विपक्षीय लोकशाही रुजली तसे भारतात आजवर तरी होऊ शकलेले नाही. अमेरिकेत दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने येती चार वर्षे ट्रम्प यांची राजवट सहन करताना अमेरिकी जनतेने नेमके काय करावे व काय केले पाहिजे याचे दिग्दर्शनही ओबामा यांनी त्यांच्या अखेरच्या संदेशाद्वारे केले असून ते आपण करु शकतो असा आश्वासक सूरदेखील आळवला आहे. ट्रम्प बोलले तसे वागणार नाहीत या आशेवर सध्या जग आणि भारतही आहे.

Web Title: Can do it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.