काँग्रेसला नैराश्यातून बाहेर काढण्याचे आव्हान
By विजय दर्डा | Published: December 17, 2017 11:56 PM2017-12-17T23:56:00+5:302017-12-18T03:23:55+5:30
काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासात राहुल गांधींचा समावेश अशा नेत्यांत आहे, ज्यांना कमी वयातच पक्षाध्यक्ष होण्याचे भाग्य लाभले.ते गांधी-नेहरू परिवारातील आहेत म्हणून त्यांची या पदावर निवड झाली, असे टीकाकारांना भले म्हणू दे, पण निवडणुकीची सर्व प्रक्रिया रीतसर पूर्ण करूनच त्यांची निवड झाली, हे वास्तव आहे. पक्षाची धुरा राहुल गांधींनी हाती घ्यावी ही सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा होती. ते या कसोटीला उतरतील, अशी मला आशा आहे.
काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासात राहुल गांधींचा समावेश अशा नेत्यांत आहे, ज्यांना कमी वयातच पक्षाध्यक्ष होण्याचे भाग्य लाभले.ते गांधी-नेहरू परिवारातील आहेत म्हणून त्यांची या पदावर निवड झाली, असे टीकाकारांना भले म्हणू दे, पण निवडणुकीची सर्व प्रक्रिया रीतसर पूर्ण करूनच त्यांची निवड झाली, हे वास्तव आहे. पक्षाची धुरा राहुल गांधींनी हाती घ्यावी ही सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा होती. ते या कसोटीला उतरतील, अशी मला आशा आहे.
राहुल गांधी नेहरू-गांधी परिवाराचे वारस आहेत व या परिवाराचे संस्कार व शक्ती त्यांना निसर्गत: मिळाली आहे, हीच त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मोतीलाल नेहरूंपासून पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी व सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी व काँग्रेसच्या माध्यमातून या देशातील जनतेला बलशाली करण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील या कुटुंबाचे योगदान, त्यांची कामगिरी व त्याग याची सर्व जगाला कल्पना आहे. कोणालाही उगीचच सन्मान मिळत नाही व लोक कोणावरही फुकाचे प्रेम करत नसतात, हे टीकाकारांनी ध्यानात घ्यायला हवे. पं. नेहरू व इंदिराजींवर देशातील जनतेने जीवापाड प्रेम केले ते उगीच नाही! त्या मागे या नेत्यांची तपश्चर्या होती.
येथे मला सांगावेसे वाटते की, तुम्ही राहुल गांधी यांची तुलना मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्याशी करू शकत नाही. काळानुरूप पीढी बदलत असते. शेवटी सर्वांच्या मुळाशी संस्कार असतात, हे सर्वात महत्त्वाचे, आणि वेळ बदलली तरी हे संस्कार कधी बदलत नसतात. लोकशाहीवरील नितांत श्रद्धा, सांप्रदायिक शक्तींविरुद्ध लढण्याची जिद्द, गरिबीविरुद्ध लढा देण्याची ईर्षा हे नेहरू-गांधी कुटुंबाचे संस्कार होते व आजही आहेत.
राहुल गांधी यांच्यापुढे असंख्य अडचणींचा डोंगर उभा आहे. त्यांची प्रतिमा मलिन करण्याची एक सुनियोजित चाल खेळली गेली आहे. समाजाची मानसिकता अशी असते की, एखाद्याबद्दल वारंवार काही वाईट सांगितले गेले की ते खरे असावे अशी धारणा तयार होऊ लागते. खरं तर एखाद्याला अशा तºहेने बदनाम करणे हा हल्ली एक धंदा झाला आहे. राहुल गांधी अशा मुशीतून तयार झाले आहेत की, त्यांनी हा अपप्रचार खोटा ठरविला, हे खरे पण सध्याचा काळच असा आहे की, सांप्रदायिक शक्ती, कुप्रचार करणारे व सोशल मीडियाला आपण क्षुल्लक मानू नये. या सर्वांशी काँग्रेसला जबरदस्त लढा द्यावा लागणार आहे. काँग्रेस पक्षात सध्या जे घोर नैराश्य पसरले आहे ते दूर करून नवी आशा फुंकणे हे राहुल गांधी यांच्यापुढील गंभीर आणि मोठे आव्हान आहे. आज भाजपा व रा. स्व. संघाचे कार्यकर्ते पद्धतशीर कामाला लागले आहेत. एक काळ असा होता की आपण काँग्रेस कार्यकर्ता आहोत हे सांगायचा लोकांना अभिमान वाटायचा. एवढेच नव्हे तर लग्नसंबंध जोडतानाही आम्ही काँग्रेसी आहोत असे ते सांगायचे. राहुल गांधींना हा सन्मान कार्यकर्त्यांना परत मिळवून द्यायचा आहे. सोनियाजींनी आपल्या अथक परिश्रमाने काँग्रेसला एकत्र ठेवण्याचे प्रयत्न केले. मला व्यक्तिगतरित्या असे वाटते की, प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी होत होती असे नाही पण त्या प्रत्येकाला सोबत घेऊन काम करीत. सर्वांच्या विचाराचा सन्मान करीत. राहुलजींच्या मनात असेल तसेच सर्व होईल, असेही नाही. तरीही त्यांना सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल.
मला आणखी एक सांगायचे आहे, सध्या राजकारणात सर्वत्र पैशाचा बोलबाला आहे. एखाद्या सभेसाठी गर्दी जमविण्यापासून ते टाळ््या वाजविण्याचीही कंत्राटे दिली जात आहेत. काँग्रेसही यातून वेगळी नाही. जो खरा कार्यकर्ता असायचा तो आपल्या वाहनाने लोकांना सभेच्या ठिकाणी घेऊन जायचा. स्वत: झेंडे व बॅनर लावायचा. आता हे चित्र कुठे दिसत नाही. पूर्वी सेवादलाचे लोक सक्रिय असायचे. आता ते फक्त १५ आॅगस्ट, २६ जानेवारी किंवा काँग्रेस दिनाला सलामी मारतानाच दिसतात!
एनएसयुआयची स्थिती वाईट आहे. विद्यार्थ्यांतून नेतृत्व निर्माण करणारा हा घटक कुचकामी ठरला आहे. युवक काँग्रेसची दुरवस्थाही कोणापासून लपून राहिलेली नाही. खरे तो पक्षाचा पाया आहे. नवे नेतृत्व तेथून येणार असते, यायला हवे. परंतु पैशाचा बोलबाला एवढा वाढला आहे की ज्याच्याकडे रग्गड पैसा आहे तोच युवक काँग्रेस किंवा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी पोहोचू शकतो. केवळ नेतृत्वगुण आहेत म्हणून कोणी पुढे येऊ शकत नाही. ही परिस्थिती बदलावी लागेल. राहुलजींना खुशमस्कºयांच्या कंपूपासून दूर राहावे लागेल. आमचे म्हणणे राहुलजींपर्यंत पोहोचत नाही, अशी आज पक्षातील बडे नेतेही तक्रार करतात. राहुलजींना लोकनेता होऊन सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवावे लागतील. मी शरद पवार यांचे उदाहरण देईन. त्यांना एखादा साधा कार्यकर्ताही सरळ जाऊन भेटू शकतो. राहुलजींना उद्योगपतींबद्दलचा दृष्टिकोनही बदलावा लागेल. देशाच्या जीडीपीमध्ये उद्योगपतींचे योगदान महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यावे लागेल. देशाच्या विकासात तेही महत्त्वाचे भागीदार आहेत, हे विसरता येणार नाही.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
संसदेत एखादा दस्तावेज सादर करण्याच्या संदर्भात ‘विनंती’ असा शब्दप्रयोग करण्यास आक्षेप घेतल्याबद्दल मी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचे अभिनंदन करतो. १८ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत कॉलेनाईझेशनसारखे शब्द, ‘योर एक्सेलन्सी’, ‘आय बेग टू ले’ ‘योर आॅनर’ आणि विमानांवर ‘व्हीटी (व्हाईसरॉय टेरिटोरी’) यावर नेहमीच हरकत घेतली. राज्यसभेत मी हा मुद्दा मांडला व हे शब्द काढून टाकण्याचा आग्रह धरणारे पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले. आता उपराष्ट्रपतींनीच आक्षेप घेतला म्हटल्यावर हे शब्द लवकरच प्रक्रियेतून काढून टाकले जातील.
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)