काळाबरोबर बदलूया !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 09:14 AM2018-05-04T09:14:41+5:302018-05-04T09:14:41+5:30
- मिलिंद कुलकर्णी
काळाबरोबर चालल्यास प्रगती होते; स्थितीशील राहिल्यास प्रगती खुंटते असे म्हटले जाते. आदिमानव ते आधुनिक मानव हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दैनंदिन जीवनात आपण अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करतो, कारण त्यामुळे वेळ वाचतो, श्रम कमी होतात. कामे गुणवत्तापूर्ण होतात. हा त्याचा फायदा आहे. चुलीवरचा स्वयंपाक ही बाब आता कुतूहलाचा विषय बनली आहे. घरोघरी गॅसच्या चुली आलेल्या आहेत. भौतिक साधनांमध्ये ही प्रगती सहजपणे स्वीकारल्यानंतर परंपरा, संस्कृती यात काळानुसार बदल करण्याची सुरुवात झाली आहे. ही सुरुवात खूप धिम्या गतीने आहे. पण त्याची गती वाढण्याची आवश्यकता आहे.
उदाहरण घ्यायचे झाले तर सध्या सुरु असलेल्या लग्नसराईचे घेता येईल. पूर्वीसारखे ८-१० दिवस चालणारे विवाहसोहळे कधीच कालबाह्य झाले आहेत. दीड दिवसांचे विवाह सोहळे बहुतेक ठिकाणी होतात. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम, सीमंती कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा होतो. स्वागत समारंभ ऐच्छिक असतो. अर्थात ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे तो होत असतो.
यंदा अधिक मास असल्याने लग्नतिथी साधारण १२ मे नंतर नाही, असे सांगितले जाते. विवाह जुळल्यानंतर महिनाभर थांबण्यापेक्षा या हंगामात लग्न उरकण्याकडे वर-वधु या दोन्ही पक्षांचा कल असतो. मे महिन्यातील उन्हाळी सुट्या हे त्यामागील प्रमुख कारण असते. घरातील पहिले किंवा शेवटचे कार्य असे म्हणत लग्न धुमधडाक्यात करायचे, यावर वर पक्षाकडील मंडळींचे एकमत असते. बोलणी करताना मंगल कार्यालय, घोड्यावरुन मिरवणूक, डीजे अशा अटी मंजूर करुन घेतल्या जातात. मोजकी कार्यालये प्रत्येक शहरांमध्ये असल्याने अवाच्या सवा भाडे आकारले जाते. ज्यांना परवडत नाही, ते दारापुढे मंडप टाकून कार्य उरकतात. ४५ अंश तापमानात दारापुढे मंडप टाकून होणारी लग्ने, मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटात थ्रीपीस सूट आणि फेटे बांधलेल्या तरुणाईचे सैराट नृत्य पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. वयोवृध्द मंडळी, लहान मुले यांची होणारी आबाळ नजरेआड करुन कसे चालेल? व-हाडींसाठी वाहने लागतात, हंगाम म्हटल्यावर त्यांचेही दर दुप्पट होतात. लग्न कार्याशी संबंधित सगळ्याच बाबी महागलेल्या असतात.
हे सगळे टाळता येणार नाही काय? याचा विचार अलिकडे होऊ लागला आहे. नोंदणी विवाहाची संख्या हळूहळू वाढते आहे. लग्नपत्रिका प्रत्यक्ष घरी जाऊन देण्याचे प्रमाण कमी होत असून व्हॉटस् अप, मेलद्वारे निमंत्रणे पोहोचू लागली आहेत. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळा आटोपून सायंकाळी स्वागत समारंभ आयोजित केला जाऊ लागला आहे. श्रीमंतांमध्ये ‘डेस्टीनेशन मॅरेज’ ही संकल्पना रुढ होऊ लागली आहे.
खान्देशात तर हळदीचा कार्यक्रम आणि लग्न दीड दिवसाचे असले तरी काही समाजात लग्नाच्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत मंडप रिकामा झालेला असतो. लग्नघटिकेपूर्वी भोजनावळी सुरु केल्याने अकारण ताटकळणे थांबले आहे. असे स्वागतार्ह बदल अंगिकारले गेले तर आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास कमी होऊ शकेल आणि लग्नसोहळ्याचा आनंद व-हाडींसोबत यजमानांनाही घेता येऊ शकेल.