आधुनिक शिक्षण-प्रगत महाराष्ट्राचे लक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:25 AM2019-09-03T01:25:01+5:302019-09-03T06:04:37+5:30
पालक व पर्यायाने समाजाला ही जाणीव होणे हे प्रगत समाजव्यवस्थेकडे पडलेले पाऊलच म्हणावे लागेल.
प्रकाशसिंग राजपूत
कुमठे बीटपासून ज्ञानरचनावादचा प्रचार, प्रसार होत अवघ्या महाराष्ट्रात ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती महाराष्ट्रभर अवतरली. विद्यार्थी हे स्वत: ज्ञानाची निर्मिती करीत आनंददायी पद्धतीने ज्ञानग्रहण करू लागली. याचबरोबर जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल क्रांती होऊन आली. या दोन्हींच्या परिणाम स्वरूप महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था झपाट्याने बदलली. वाचन-लेखन क्रिया गतिमान झाल्या, मूलभूत कौशल्य विद्यार्थी आत्मसात करीत प्राथमिक स्तरावर गुणवत्तेमध्ये मोठी भर पडली. ज्ञानरचनावाद पद्धतीने शाळेची गुणवत्ता लक्षणीय वाढली. डिजिटल शाळेचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारला. शाळा सुधारणांमध्ये समाजही पुढे सरकावला. शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली. डिजिटल क्लासरूम, सोलार सिस्टिम अशा अनेक गोष्टी यातून निर्माण झाल्या. १४ व्या वित्त आयोगाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रमध्ये लोकसहभागातून डिजिटल क्रांती घडून शाळा डिजिटल झाल्या. इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड जिल्हा परिषद शाळेंचा कायापालट घडून आला आहे.
पालक व पर्यायाने समाजाला ही जाणीव होणे हे प्रगत समाजव्यवस्थेकडे पडलेले पाऊलच म्हणावे लागेल. जिथे समाज व शाळा एकत्र येतात तिथे नक्कीच मोठी क्रांती घडून येते. याचे जिवंत उदाहरण पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीची शाळा. एका शाळेत समाज व लोकसहभाग आल्यावर किती झपाट्याने बदल होतो हे पाहण्यास मिळते. अशी अनेक उदाहरणे आहेत. स्वत:ची शाळा डिजिटल होण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतून रक्कमही काढून कमी पडल्यावर स्वत:ची सोन्याची अंगठी मोडून निधी उभारणारे बीड जिल्ह्यातील श्री रवींद्र गायकवाड यांच्यासारखे शिक्षक नक्कीच या शिक्षणव्यवस्थेचे आधुनिक शिल्पकारच बनत आहेत. सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटर अशा माध्यमातून शिक्षकांनी केलेले बदल, नवीन उपक्रम, तसेच आचार-विचारांची झपाट्याने देवाण-घेवाण होऊ लागली. शिक्षकांना तंत्रज्ञान शिकवणारे अनेक समूह तयार झाले, डिजिटल शाळांना एकत्र आणणारे समूहसुद्धा तयार झाले. महाराष्ट्राचा शैक्षणिक प्रगतीचा रथ हा गतिमान झाला. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रचार फार लवकर होत आहे याचा अनुभव म्हणजे डिजिटल समूह महाराष्ट्र या राज्यस्तरीय व्हॉट्सअॅप समूहांमध्ये पाठवलेल्या थ्रीडी तंत्रज्ञानाचा उपयोग राज्यभर शाळेत झालेला दिसून आला. याविषयीच्या लगेच अनेक वर्तमानपत्रांत बातम्याही आल्या सूर्यमालेच्या थ्रीडी स्वरूपात. अॅनिमेशन पाहून विद्यार्थ्यांना हा घटक निश्चित चांगल्याप्रकारे समजून आला. अँड्रॉइड स्वरूपातील असलेला अॅप एक क्यूबच्या साह्याने कसा हाताळायचा, याचे तंत्र शिक्षकांना यातून माहिती झाले व त्याचा उपयोग राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापनात केला आहे. सोशल मीडियाचा एक चांगल्याप्रकारे उपयोग कसा होऊ शकतो. याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
प्राथमिक शाळेतील शिक्षक हा तंत्रस्नेही झालेला आहे. डिजिटल क्लासमध्ये वापरण्यासाठी स्वत:ही व्हिडिओ निर्मितीचे तंत्र शिकू लागला आहे. यू-ट्यूबवर व्हिडिओ निर्मिती असेल, तसेच स्मार्ट पीडीएफ या स्वरूपाच्या निर्मिती करीत आधुनिकतेचा स्वीकार करीत आहे. क्यूआर कोड पुस्तकात आणून पाठ्यक्रम डिजिटल साधने याचा सुवर्णमध्य साधला आहे. सोलापूरचे रंजितसिंह डिसले यांनी याचा वापर सर्वप्रथम केला व आता पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा बालभारतीने क्यूआर कोड समाविष्ट केले आहे. दीक्षा अॅपची निर्मिती याच उद्देशातून झालेली आहे. यातील कन्टेन्ट (व्हिडिओ ) निर्मितीमध्ये सुद्धा शिक्षकांनी मोलाचा वाटा उचललेला आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेमध्ये कसल्याही सुविधा नव्हत्या. आॅडिओ-व्हिज्युअल साधने असायची; पण तीही चालू स्थितीत असेलच हेही फार दुर्मिळ होते. २००५-०६ मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत टी. एल. ई. अनुदान देण्यात आले तिथे कुठे शाळेमध्ये बदल होऊ लागला. शिक्षकांना तंत्रज्ञानाची ओढ लागू लागली व यातूनच २०१२-१३ नंतर शाळा प्रत्यक्ष डिजिटल होण्यामध्ये सुरुवात झाली. आज राज्यात सर्व शाळा डिजिटल झालेल्या दिसून येत आहे. ऊर्जेच्या समस्येवर मात करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापरही शाळेत करण्यात आलेला आहे.
शिक्षकाला सामाजिक अभियंता असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही, ज्याप्रमाणे अभियंता नवीन इमारत, नवीन काही निर्मिती करतो, त्याचप्रमाणे आदर्श समाज बांधण्याचे कार्य शिक्षकही करीत असतो. हे कार्य मात्र मोजमाप करण्याइतके तात्काळ दिसून येत नाही; पण त्याच्या हातून घडणारे प्रत्येक पिढीमधील बदल हे समाजव्यवस्थेला बदलतात. शाळा हे समाजाला प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. शाळा जितकी समृद्ध होईल तितका तेथील बनणारा समाजही समृद्ध व आदर्श घडेल.
जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करीत आहे. ही चळवळ नव्याने शैक्षणिक क्रांती घडवत आनंदायी शिक्षणासह आधुनिकतेचा स्वीकार करीत आहे. आय.एस.ओ. मानांकनप्राप्त शाळा आज झपाट्याने वाढत आहेत व येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा परिषद शाळा हा दर्जा प्राप्त करतील. अथांग सागरात घडलेली ही आधुनिक शिक्षण व्यवस्थेची चळवळ नक्कीच अवघा महाराष्ट्र प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवेल...
(लेखक प्रयोगशील सहशिक्षक, मुरूमखेडावाडी, औरंगाबाद आहेत)