- रवी टाले‘सिट्रस इस्टेट’ची संकल्पना उत्तम; पण या प्रयोगाची गत इस्रायली कापूस प्रकल्पासारखी होऊ नये! महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भातील शेतक-यांच्या वाट्याला काय आले, तर नागपूर, अमरावती आणि अकोला या तीन संत्रा उत्पादक जिल्ह्यांमध्ये, पंजाबच्या धर्तीवर ‘सिट्रस इस्टेट’ उभारण्याची घोषणा! अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.विदर्भातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगतच्या भागात अत्यंत दर्जेदार संत्री पिकतात. नागपुरी संत्री या नावाने ती जगात प्रसिद्ध आहेत. ती पिकविणारा शेतकरी मात्र पश्चिम महाराष्ट्रातील ऊस बागायतदारासारखा किंवा खान्देशातील केळी बागायतदारासारखा संपन्न नाही. संत्रा उत्पादक शेतक-यांची अवस्था आत्महत्येच्या मार्गाला लागलेल्या कापूस उत्पादक शेतक-यांएवढी बिकट नसली, तरी तो फार सुखी आहे, अशातलाही भाग नाही. निसर्गाची लहर, रोगराईचा घाला, दलालांचा विळखा आणि अस्थिर बाजार याचा बळी संत्रा उत्पादक शेतकरीही आहेच!कृषी माल कच्च्या स्वरूपात न विकता त्यावर प्रक्रिया करून विकल्यास गाठीशी चार पैसे लागू शकतात, हे तत्त्वज्ञान ऐकत, स्वातंत्र्यानंतर शेतकºयांच्या जवळपास चार पिढ्या संपल्या. कापूस ते कापड, संत्र्यापासून ज्यूस, स्क्वॅश, वाईन, अशी स्वप्ने दाखविणारी भाषणे ऐकून, स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची प्रतीक्षा करण्यातच शेतक-यांच्या पिढ्या खपल्या; पण एकाही स्वप्नाची पूर्ती कधी झालीच नाही!पुढे कापूस ते कापड हे स्वप्न विकणारे गेले अन् विदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कापसाचे उत्पादन भरघोस वाढविण्याचे स्वप्न विकणारे आले! त्यांनी इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित कापूस लागवडीचा प्रयोग अकोल्याच्या कृषी विद्यापीठात मोठा गाजावाजा करून सुरू केला. पांढरा हत्ती ठरलेला तो प्रयोग विद्यापीठाच्या प्रक्षेत्रापासून शेतकºयांच्या शेतापर्यंत कधी पोहोचलाच नाही! अवघ्या तीन-चार वर्षांत त्या पांढ-या हत्तीने विद्यापीठातच अखेरचा श्वास घेतला.आता संत्री उत्पादकांसाठी ‘सिट्रस इस्टेट’ येऊ घातल्या आहेत. ‘सिट्रस इस्टेट’ म्हणजे नेमके काय, त्याचा काय, कसा व किती उपयोग होणार, याबाबत बहुतांश संत्रा उत्पादक अनभिज्ञ आहेत. शेतक-यांना संत्रा उत्पादन व विपणनाची आधुनिक तंत्रे शिकविण्यासाठी तज्ज्ञांची सेवा देणे, संत्रा लागवड व पीक काढणीसाठी लागणारी विविध यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, रोगराईच्या बीमोडासाठी प्रयोगशाळा व ‘प्लँट हेल्थ क्लिनिक’, शीतगृहांची उभारणी, उत्तम दर्जाचे पॅकेजिंग साहित्य पुरविणे, अशी ही एकंदर संकल्पना आहे. ‘सिट्रस इस्टेट’मागचा सरकारचा एकंदरीत हेतू निश्चितपणे चांगला आहे; पण प्रश्न अंमलबजावणीचा आहे. इस्रायली कापूस प्रकल्प इस्रायलमध्ये यशस्वीच आहे. आपल्या इथे मात्र तो पुरता फसला. ‘सिट्रस इस्टेट’चे तसे काही होऊ नये. त्यासाठी इस्रायली कापूस प्रकल्पातील चुकांपासून धडा घेतला म्हणजे झाले!जाता जाता : नागपूरकर भोसल्यांनी विदर्भात संत्री आणल्यापासून विदर्भातील शेतकरी दर्जेदार संत्री पिकवितच आहे. म्हणूनच तर ती जगप्रसिद्ध आहेत. शेतक-याला उत्पादनाचे तंत्र नव्हे, तर रोग व्यवस्थापन, विपणन, प्रक्रिया हे पैलू शिकविण्याची खरी गरज आहे.
‘सिट्रस इस्टेट’चा ‘इस्रायली कापूस’ होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:40 PM