भाष्य - यूपीचा कायापालट

By admin | Published: March 29, 2017 12:56 AM2017-03-29T00:56:11+5:302017-03-29T00:56:11+5:30

बिहारपाठोपाठ शेजारील उत्तर प्रदेशातही योगी महाराजांच्या संगतीने साक्षात रामराज्यच अवतरणार की काय, अशी आशा निर्माण झाली आहे

Commentary - UP's turnover | भाष्य - यूपीचा कायापालट

भाष्य - यूपीचा कायापालट

Next

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दारूबंदी केल्यापासून बिहारमधील लोक दूध प्यायला लागलेत म्हणे. परिणामी येथील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली. एवढेच नाही तर अनेकजण वाल्याचे वाल्मीकी होऊन आज सात्त्विक जीवन जगताहेत, असे कळते. हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा की आता बिहारपाठोपाठ शेजारील उत्तर प्रदेशातही योगी महाराजांच्या संगतीने साक्षात रामराज्यच अवतरणार की काय, अशी आशा निर्माण झाली आहे. गोरखपूरच्या मठाधिपतिपदावरून राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेले योगी आदित्यनाथ यांनी सत्तासूत्रे स्वीकारताच उत्तर प्रदेशची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दोन दिवसातच त्यांनी अनधिकृत कत्तलखाने बंद करविले. सडकछाप मजनूंच्या बंदोबस्ताकरिता अ‍ॅन्टी रोमिओ स्क्वॉड सक्रिय केले. त्यांच्या या स्वच्छता मोहिमेने सर्वात मोठी कोंडी झाली ती सरकारी कर्मचाऱ्यांची. त्यांचे गुटखा, पानमसाले, तंबाखू खाणेच बंद केल्याने कार्यालयात वेळ घालवायचा कसा, असा गंभीर प्रश्नच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कार्यालयात पानतंबाखू खाऊन भिंतीवर पिचकाऱ्या उडविणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच. तोसुद्धा योगींनी हिरावून घेतलाय. राज्याचे दोन मंत्री आणि काही अधिकारी हातात झाडू घेत साफसफाई करताना दिसले तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही मोठा हेवा वाटला. अधिकारी एवढी चांगली झाडझूड करतात हे माहिती असते तर आम्हीसुद्धा त्यांच्याकडून ही कामे करवून घेतली असती, असा टोमणा त्यांनी मारलाच. एकंदरीतच सांगायचे झाले तर नजीकच्या काळात आपल्याला या राज्याचा चेहरामोहरा बदलेला दिसणार हे नक्की. परंतु भाजपा आणि योगी आदित्यनाथांच्या विरोधकांनी मात्र या स्वच्छतेच्या झपाट्यात वेगळाच सूर लावलाय. योगी केवळ शाळा कार्यालयातील स्वच्छता आणि मजनूंना पकडण्यासच प्राधान्य देणार काय? राज्यातील खऱ्या रोगांवर ते उपचार करणार की नाहीत याबद्दलची साशंकता त्यांच्या मनात आहे. अल्पसंख्यकांवरील वाढते अत्याचार, धार्मिक तेढ, दंगलखोरी, महिला आणि दलितांविरुद्धचे गुन्हे, आरोग्याचा भीषण प्रश्न, भ्रष्टाचाराने पोखरलेले पोलीस खाते या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. योगींनी घेतलेल्या निर्णयांचा अर्थ आणि उद्दिष्ट शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी सध्या चालविला आहे. तेही बरोबरच आहे. माणसाचा स्वभाव काही एका दिवसात बदलत नाही. योगींमध्ये अचानक जो बदल झालाय, त्यांच्या बोलण्यातून सामंजस्याचा जो सूर निघू लागलाय त्यावर सहजासहजी कुणाचा विश्वास बसण्याचे कारण नाही. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ हे फक्त बोलण्यापुरतेच राहणार काय अशी भीती लोकांना आहे.

Web Title: Commentary - UP's turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.