गोबेल्सची इंद्रदेवांकडे कैफियत
By राजा माने | Published: April 16, 2018 12:10 AM2018-04-16T00:10:39+5:302018-04-16T00:10:39+5:30
महागुरू नारदांसोबत इंद्र दरबारात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने आपला इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके आज खुशीत होता. कुठलीही असाईनमेंट नाही, टेन्शन नाही म्हणून खुशीतच त्याने नारदांच्या कक्षात प्रवेश केला. कुठचाही विषय नसताना इंद्र दरबारात मराठी भूमीच्या प्रतिनिधीला का बोलावले जातेय, ही शंकेची पाल मात्र त्याच्या मनात चुकचुकत होती.
महागुरू नारदांसोबत इंद्र दरबारात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने आपला इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके आज खुशीत होता. कुठलीही असाईनमेंट नाही, टेन्शन नाही म्हणून खुशीतच त्याने नारदांच्या कक्षात प्रवेश केला. कुठचाही विषय नसताना इंद्र दरबारात मराठी भूमीच्या प्रतिनिधीला का बोलावले जातेय, ही शंकेची पाल मात्र त्याच्या मनात चुकचुकत होती. ती शंका हद्दपार व्हावी म्हणून त्याने महागुरूंना छेडले...
यमके : गुरुदेव, आजच्या दरबाराचा अजेंडा काय आहे?
नारद : (स्मितहास्य करत) गोबेल्स...
यमके : म्हणजे...?
नारद : जोसेफ गोबेल्स तुला माहीत नाही का? अरे, जगाची झोप उडविणाऱ्या हिटलरचा तो उजवा हात होता.
यमके : हो, मला माहिती आहे... ८०-९० वर्षांपूर्वी या माणसाने जनसंपर्क आणि माहितीशास्त्रात आपल्या अफलातून नीतीने खळबळ उडवून देऊन इतिहास घडविला होता.
नारद : अगदी बरोबर ! तेव्हापासूनच ‘गोबेल्स नीती’ मानव लोकात गाजू लागली. अनेक प्रांतात कटकारस्थाने याच नीतीच्या आधारावर रचली जाऊ लागली आणि फत्तेही होऊ लागली.
यमके : असत्याला ‘सत्य’ म्हणून गळी उतरविण्याच्या या गोबेल्स नीतीचा आणि इंद्रदेवांनी बोलावलेल्या आजच्या दरबाराचा काय संबंध?
नारद : अरे, १९३३ सालापासून जर्मनीच्या दरबारात आपल्या तंत्राने हिटलर आणि फॅसिस्टांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या गोबेल्स नीतीच्या जनकाने नरकातून इंद्रदेवांकडे तक्रारी अर्ज सादर केला आहे. त्याला हिटलरचेसुद्धा अनुमोदन आहे म्हणे !
यमके : गुरुदेव, नरकातून आलेल्या अर्जाचीही इंद्रदेव एवढी दखल घेतात?
नारद : हो, त्यांना दखल घ्यावीच लागते... कारण अशा अर्जांवर स्वर्गलोकातील मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाºयांचा बारीक डोळा असतो. दुर्लक्ष झाले की ते आंदोलनाचे हत्यार उपसतात.
यमके : जगावर दुसरे महायुद्ध लादून अमानवी कृत्य करणाºयांचीही दखल का घ्यावी?
नारद : दखल तर त्रिलोकाची घ्यावी लागते. म्हणून तर आज खास जोसेफ गोबेल्सच्या तक्रार अर्जावर इंद्र दरबार भरतो आहे.
यमके : तक्रार नक्की कशाबद्दल आहे?
नारद : तब्बल शतकभर चर्चेत असणारी ‘गोबेल्स नीती’ या नावाने ओळखली जाणारी नीती आता कालबाह्य झाली आहे. अनेकजण स्वत:ची ‘नीती’ वापरतात आणि नाव मात्र गोबेल्सचे देतात. त्यामुळे ज्याच्या-त्याच्या नीतीचे नामकरण ज्याच्या-त्याच्या नावानेच करावे, अशी मागणी गोबेल्सने केली आहे. ‘गोबेल्स नीती’ या नावाचा गैरवापर करणाºयांची यादीच त्याने इंद्रदेवाला सादर केली आहे.
यमके : त्या यादीत कुणाची नावे आहेत?
नारद : अरे, ट्रम्पपासून मोदींपर्यंतची नावे त्यात आहेत. थोडक्यात काय तर आता ‘गोबेल्स नीती’ ऐवजी ‘ट्रम्प नीती’, ‘मोदी नीती’ आणि अशीच नावे वापरण्याचे बंधन ज्या-त्या क्षेत्रावर घालावे. गोबेल्सची बदनामी करू नये, अशी त्याची मागणी आहे. मराठी भूमीतीलही अनेक नावे आहेत. पाहू त्यांचे काय करायचे ते!