आहिस्ता चल जिंदगी, कुछ दर्द मिटाना बाकी है!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 05:41 AM2021-06-05T05:41:08+5:302021-06-05T05:41:33+5:30

रोज आजार आणि मृत्यूची वाट पाहणे हे कसले जगणे, प्रभू? हृदय विदीर्ण करणारी आपल्यांच्या आपलेपणाची ही कठोर परीक्षा का?

corona crisis Life goes on slowly some pain is left to be eradicated | आहिस्ता चल जिंदगी, कुछ दर्द मिटाना बाकी है!

आहिस्ता चल जिंदगी, कुछ दर्द मिटाना बाकी है!

googlenewsNext

- अश्वनी कुमार, माजी केंद्रीय कायदा मंत्री

शब्दांत मांडणे अतिकठीण अशा  अपार वेदनांना शब्दरूप देण्याचा  प्रयत्न करीन म्हणतो. कारण व्यक्त होणे, सांगणे हाच शेवटी हृदयविदारक दु:ख हलके करण्याचा इलाज असतो. दीर्घकाळ मनात  असलेल्या दुःखाची किनार अधिकच गडद होऊ नये यासाठी ते आज मी देशवासीयांसमोर मांडू इच्छितो. 

तसे पाहता आपला इतिहास म्हणजे माणसाने मानवतेवर केलेल्या अगणित जुलमांची कहाणीच आहे. परंतु आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत तिच्यासारखे कोणतेच पान या इतिहासात दिसत नाही. राम राज्याची कल्पना जेथे मांडली गेली अशा भारतात आज दिसत असलेल्या परिस्थितीचे वर्णन कसे करावे हे मला कळत नाही. महामारीच्या प्रकोपातून वाचलेल्या भाग्यवंतांनी जरा आपल्या आजूबाजूला पाहावे, असे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. काय दिसते सभोवती?



आपल्या तरुण मुलाला खांदा देण्याची वेळ वयस्कर बापावर येते आहे. लहानग्या मुलांना नजरेआड होताना आया व्याकूळ होत आहेत... ही वेळ, हे प्रभो, तू का आणलीस? असहाय हतबल वृद्ध त्यांच्या जीवनाच्या अंतिम चरणात आप्तांच्या प्रेमापासून, सेवेपासून वंचित का होत आहेत? मरणाच्या दारात पोहोचलेल्या नातवंडांना इस्पितळात घेऊन जायची वेळ, हे प्रभो, तू आजी आजोबांवर का आणलीस?  आपल्या मातेचे शव एकट्याने स्मशानात नेण्याची वेळ एखाद्या मुलावर का यावी? पित्याचे पार्थिव शरीर स्मशानात जागा न मिळाल्याने दोन दिवस घरात का ठेवावे लागावे? अंत्येष्टीविना पाण्यात सोडलेल्या शवांच्या पापांचे ओझे गंगामाईला का डोईवर घ्यावे लागले? हजारो कर्मचारी कर्तव्य बजावताना विनाइलाज कोरोनाचे शिकार का झाले? अनाथ असहाय मुलांना ही शिक्षा का प्रभू? हृदय विदीर्ण करणारी आपल्यांच्या आपलेपणाची ही कठोर परीक्षा का?



- इतके सगळे झाल्यावर तरी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जायला तयार आहोत का? सर्व पात्र नागरिकांना तिसरी लाट येण्याआधी लस मिळेल का?  मुलांना कोरोनाने ग्रासले तर तोंड द्यायला देश सज्ज आहे का? देशात १८ वर्षांच्या खाली १६.५ कोटी मुले आहेत. पाच टक्के मुलांना इस्पितळात भरती करण्याची गरज भासली तर १.६५ लाख अतीव दक्षता सुविधेच्या खाटा लागतील. आज देशात केवळ दोन हजार अशा खाटा आहेत. देशात डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उणीव भासत असताना देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यायला तयार आहे का? 

अहंकार आणि वर्चस्वाच्या लढाईने आपल्या नेत्यांना आंधळे केले आहे.  पण, तरीही हे कठीण प्रश्न विचारलेच पाहिजेत. कोरोनाविरुद्ध आरपारची लढाई जनतेच्या सहयोगातून सरकारच लढू शकते. सकारात्मक सूचनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य निर्णय घेतले तरच या परीक्षेत सरकार यशस्वी होईल. लोकांचे दबलेले दु:ख आणि मूक आक्रंदनात सरकार उलथवण्याची ताकद  असते, हे पंतप्रधान विसरू कसे शकतात? या प्रश्नातच उत्तर आहे. सरकार संवेदनशील आणि राष्ट्र सक्षम नाही, असेच वर्तमान स्थिती सांगते. हृदयाला पाझर फोडणारी राष्ट्रीय पीडा गल्ली-बोळांत ऐकू येते आहे. रोगराई आणि मृत्यूच्या सावलीत जगण्याचा अर्थ कवी गुलजार  नेमका पकडतात, तो हा असा...
आहिस्ता चल जिंदगी
अभी कुछ कर्ज चुकाना बाकी है, 
कुछ दर्द मिटाना बाकी है!

शेवटी पुरुषार्थ आणि धैर्य विजयी होते हे मला ठाऊक आहे. परंतु या महासंकट काळात केवळ आशावादी राहणे पुरेसे नाही. या विध्वंसक काळात ईश्वराची कृपा आणि करुणाच संकटातून सोडवील. राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘रश्मी रथी’ या कवितेतील ओळी उद्धृत करून हा लेख संपवतो.

“हे दयानिधे, रथ रोको अब 
क्यों प्रलय की तैयारी है? 
यह बिना शस्त्र का युद्ध है, जो 
महाभारत से भी भारी है 
राघव-माधव-मृत्युंजय
पिघलो, यह अर्ज हमारी है... 
(लेखातील विचार व्यक्तिगत)

Web Title: corona crisis Life goes on slowly some pain is left to be eradicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.