हा प्रश्न फक्त शाळांचा नाही ! मुले ऑनलाइनच शिकणार; तर पुढे काय करणार? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 01:07 PM2021-05-08T13:07:12+5:302021-05-08T13:07:21+5:30

फक्त फी किती द्यावी-घ्यावी एवढीच चर्चा मर्यादित नको!

corona lockdown online school fee hike and education in crisis | हा प्रश्न फक्त शाळांचा नाही ! मुले ऑनलाइनच शिकणार; तर पुढे काय करणार? 

हा प्रश्न फक्त शाळांचा नाही ! मुले ऑनलाइनच शिकणार; तर पुढे काय करणार? 

Next
ठळक मुद्देपरिक्षार्थींना विद्यार्थी बनवण्याची एक चांगली संधी आपल्या समाजाला आली आहे. पण हा फक्त शाळांचा प्रश्न आहे, असा विचार करुन ती घालवू नका. 

 भक्ती चपळगावकर

तोत्तोचानची गोष्ट दुस-या महायुध्दाच्या काळातली आहे पण आजूबाजूला युध्द पेटलंय याचा उल्लेख गोष्टीत मोजक्याच प्रसंगात होतो. या शाळेतल्या मुलांना युध्दाची झळ निश्चित पोचत असणार पण शाळा आजूबाजूचे मृत्यूचे तांडव, टंचाई, गरिबी या दुखःद गोष्टीवर फुंकर घालते. शाळा हे ठिकाणच असं आहे. एकदा शाळेत प्रवेश केला की मुलं बाहेरच्या वातावरणापासून दूर जातात आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर एक वेगळे जग निर्माण करतात. 

हे वेगळे जग गेले वर्षभर ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून घरी तयार करण्याचा प्रयत्न झाला. ते निर्माण करणे अशक्य असले तरी मुलांना गुंतवून ठेवण्यात, त्यांच्या शिक्षणात खंड पडू न देण्यात ऑनलाईन शाळेची भूमिका महत्वाची ठरते. करोनाचा फेरा अजून किती काळ राहणार आहे हे सांगतां येणार नाही. ऑनलाईन शाळाही गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी चालूच राहतील. 

त्या घाईघाईने सुरू झाल्या. त्यामुळे त्यांचे स्वरूप कसे असावे याचा अंदाज शाळा चालकांना नव्हता. फार थोड्या काळात देशभरातील शिक्षकांनी इंटरनेट शिक्षणाचे तंत्र समजावून घेतले आणि अभ्यासक्रम सुरू ठेवला. वर्गात शिकवताना जे प्रत्यक्ष समजावून सांगता येते त्या गोष्टी शिक्षक मुलांना व्हिडियो, संवाद, प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून शिकवत आहेत. याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञताच वाटते. करोनाच्या हल्ल्याची अनेक कुटूबांना झळ पोचली. कुटुंबेच्याकुटूंबे आजारी पडली, अनेक ठिकाणी मृत्यू झाले. हे सगळे दुःख पचवून इतर गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करायला या शाळेचे मोठे योगदान आहे. शाळा समाजाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांचे अस्तित्व टिकून राहिले. (बहुतेक ठिकाणी) शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार सुरू राहिले. संगणक क्रांतीनंतर पहिल्यांदाच संगणक तंत्रज्ञानाचा वापर आणि उपयोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी जगातल्या अब्जावधी लोकांनी केला. त्यामुळे ऑनलाईन शाळा हा वर्तमान स्वीकारणे गरजेचे आहे. 

इथे ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आठवते पण अगदी उलट अर्थाने. पुस्तक वाचलीत तर जीवन वाचेल अशा अर्थाने ही उक्ती वापरतात पण आज तुमचे आयुष्य वाचले तर शिक्षणासाठी/पुस्तकं वाचण्यासाठी आयुष्य पडले आहे, असे म्हणता येईल.

मानसशास्त्रज्ञ चिंतन नाईक यांच्या मते, ‘मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्म आवश्यक आहेत. असे असले तरी, It takes a village to bring up a child अशी एक म्हण आहे. मुलांना मोठं करण्यात अनेकांचा सहभाग असतो असा याचा ढोबळ अर्थ. मूल मोठं होताना त्याचा अनेकांशी प्रत्यक्ष संवाद होणे आवश्यक आहे. शाळेच्या ग्राऊंडवर मुलांच्या मेंदूला जी चालना मिळेल ती ऑनलाईन वर्गात मिळणार नाही. थोडक्यात ऑनलाईन क्लास मुलांना माहिती पुरवेल पण शहाणं करु शकणार नाही. कारण ऑनलाईन शाळा रोबोटिक आहे. त्यात आजुबाजूच्या व्यक्तींचे हावभाव, आवाज, भाषेची लकब, शारिरीक हालचाल या आणि अशा अनपेक्षित गोष्टींतून मिळणारे ज्ञान मिळत नाही.’

ऑनलाईन शाळा हा प्रत्यक्ष शिक्षणाला पर्याय नाही हे सत्य आहे. एक पालक आणि एकेकाळची शाळकरी मुलगी म्हणून ही बाब प्रकर्षाने जाणवते. प्रत्यक्ष भरणा-या शाळेचा टाईमटेबल थोडाफार बदलून ऑनलाईन स्वरूपात राबवण्याचा शाळांचा अट्टहास अनाठायी वाटतो. मुलांना सुपर कम्प्युटर बनवण्याच्या भारतीय पालकांचा अट्टहासही याला ब-याच प्रमाणात कारणीभूत आहे. आम्ही पालकांकडून पूर्ण फी घेणार आहोत आणि त्यासाठी ठोस कारण देताना मुलांच्या शिक्षणात आम्ही कोणताही खंड पडू देत नाही आहोत असा आटोकाट प्रयत्न शाळा करत आहेत. पण शाळाचालक आणि पालकांच्या या गोंधळाचा परिणाम मुलांवर होत आहे. ऑनलाईन शाळेचे वेळापत्रक त्यांना झेपत नाही. त्यांच्या डोळ्यांवर निश्चित परिणाम होत आहे. करोनाची साथ ओसरल्यानंतर जाड भिंगाचे चष्मे घातलेली मुले सर्वत्र दिसू लागतील. स्क्रीनसमोर दिवसभर बसल्याने इतरही परिणाम होत आहेत. त्यांच्या मेंदूच्या संवेदना बधिर होत आहेत. प्रत्यक्ष जगात येणारे अनुभव आणि वर्चुअल जगातले अनुभवविश्व यांची सरमिसळ होत आहे. शाळा संपल्यानंतरही मुलांना मनोरंजन हवे आहे.  विशेषतः शहरी भागातल्या अनेक झोपडपट्टयात, दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये एकेका घरात जिथे आठ दहा लोक रहातात, तिथे मुलांना घरात कोंडून राहताना मोबाईलचा आसरा आहे. ऑनलाईन शिक्षणाचे सरासरी पाच तास आणि मोबाईल मनोरंजनाचे चार तास मिळून नऊ दहा तास मुले वर्च्युअल जगात वावरत आहेत. पूर्वीच्या काळी रडणा-या मुलांना सुईच्या टोकावर अफू देत असत. आजच्या समाजात मुलांना घरात ठेवण्यासाठी अशी अफू देण्यात येत आहे. हे स्वरूप बदलून शाळकरी मुले आणि शाळा यांच्यातल्या ऑनलाईन संवादाचे स्वरूप बदलण्याची तीव्र गरज आहे. आधुनिक विज्ञानाचा वापर करुन मुलांना घरी शिक्षण देऊया पण त्याचे स्वरूप कसे असावे याचा विचार करण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक, पालक, मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर्स, शाळा चालक यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा. त्यातही लहान मुलांच्या शिक्षणाचे स्वरूप आणि मोठ्या शाळकरी मुलांच्या शिक्षणाचे स्वरूप वेगळे असणे आवश्यक आहे. लहान मुलांना रोज पाच विषयांचे शिक्षण देण्याऐवजी एका दिवशी एकाच विषयाची माहिती, त्याच विषयी त्यांच्याशी गप्पा, त्याच विषयाची एखादी फिल्म आणि त्याच विषयावर एखादा कला प्रकल्प असे स्वरूप करता का येऊ नये? एक दिवस पूर्ण विज्ञानासाठी, दुसरा दिवस फक्त गणितासाठी, एखादा दिवस फक्त चित्रकलेसाठी अशा स्वरूपात शिक्षण का देता येऊ नये? असे करताना विद्यार्थ्यांना वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांशी संवाद करण्याची व्यवस्था हवी.मुलं शाळेत अभ्यासाला जातात पण त्याहीपेक्षा आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला जातात. परिक्षार्थींना विद्यार्थी बनवण्याची एक चांगली संधी आपल्या समाजाला आली आहे. पण हा फक्त शाळांचा प्रश्न आहे, असा विचार करुन ती घालवू नका. 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

bhalwankarb@gmail.com

Web Title: corona lockdown online school fee hike and education in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.