Coronavirus: ‘कोरोनापेक्षाही तिरस्काराच्या त्सुनामीचा धोका’; 'हे' प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 12:33 AM2020-05-09T00:33:30+5:302020-05-09T00:33:47+5:30
कोरोनाबाधितांना लवकरात लवकर शोधून काढावं लागेल. त्यांना आयसोलेट करावं लागेल आणि त्यांच्यावर तातडीनं उपचारही करावे लागतील, तरच ही महामारी आटोक्यात येईल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात काय काय उत्पात आणि उलथापालथ होईल, याबाबत सध्या काहीच अंदाज वर्तविता येत नाही; पण यामुळे मनामनांत जो द्वेष आणि तिरस्कार निर्माण झाला आहे. त्याची धग मात्र जास्त हानीकारक आहे, असा इशाराच संयुक्त राष्ट्र संघानं दिला आहे. संयुक्त राष्ट्र संघानं एक जागतिक अभ्यास केला असून, त्याची निरीक्षणं नुकतीच जगासमोर मांडली आहेत.
याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेनंही इशारा देताना म्हटलं आहे की, आफ्रिका खंडात सध्या कोरोनाचा वेग आणि प्रसार इतका वेगानं झालेला दिसत नसला, तरीही आफ्रिकेतील देश कोरोनाची सर्वांत मोठी शिकार होण्याची शक्यता आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, आफ्रिकेत या वर्षभरात किमान ८३ हजार ते एक लाख ९० हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. त्याचबरोबर याच काळात कोरोनाबाधितांची संख्याही सुमारे दोन कोटी ९० लाख ते चार कोटी ४० लाख इतकी वाढू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने त्यासाठी ‘प्रेडिक्शन मॉडेल’चा आधार घेतला असून, ४७ देशांच्या अभ्यासानुसार त्यांनी हा अंदाज वर्तविला आहे. यासंदर्भात तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत आफ्रिकेतील कोरोनाचा प्रसार तुलनेनं कमी दिसतो आहे. तिथला मृत्यूदरही कमी आहे; पण याचाच दुसरा अर्थ म्हणजे कोरोनाचा वेग इथे कमी असला, तरी इथे तो दीर्घकाळ आणि जास्त वर्षे चालेल.
जागतिक आरोग्य संघटनेचे आफ्रिकेचे संचालक मात्शिडिसो मोएटी यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात आफ्रिका खंडातील लहान देशांसोबतच अल्जेरिया, दक्षिण आफ्रिका आणि कॅमेरून यांसारख्या देशांनाही कोरोनाची मोठी झळ बसेल. त्यासाठी आतापासूनच खूप खबरदारी घ्यावी लागेल. कोरोनाच्या तपासण्या वाढवाव्या लागतील. कोरोनाबाधितांना लवकरात लवकर शोधून काढावं लागेल. त्यांना आयसोलेट करावं लागेल आणि त्यांच्यावर तातडीनं उपचारही करावे लागतील, तरच ही महामारी आटोक्यात येईल; पण संयुक्त राष्ट्र संघानं दिलेला इशारा यापेक्षाही अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे.
संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अॅँटोनियो गुटेरस यासंदर्भात म्हणाले की, कोरोनामुळे जगभर जात असणारे बळी ही मोठी चिंतेची गोष्ट तर आहेच; शिवाय यानिमित्ताने जगभर त्वेष आणि तिरस्कारही पसरविला जात आहे. त्या-त्या देशांत असणाऱ्या परदेशी व्यक्तींबद्दल द्वेष आणि तिरस्काराची भावना निर्माण केली जात आहे व त्यांना बळीचा बकराही बनविलं जात आहे. त्यासंदर्भात चिथावणीखोर भाषणं दिली जात आहेत. इंटरनेटवरही परदेशी नागरिकांविरुद्ध प्रचार केला जात आहे. रस्त्यांवरही परदेशी नागरिकांना स्थानिकांच्या रोषाला बळी पडावं लागण्याचे प्रकार घडताहेत. मुस्लिमविरोधी प्रचार केला जात आहे. स्थलांतरितांकडे तर जणूकाही ‘कोरोना प्रसारक’ या दृष्टीनेच पाहिले जात आहे. या गोष्टी कोरोनापेक्षाही जास्त गंभीर आहेत. हे प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत, तरच कोरोनाविरुद्धच्या जागतिक
लढाईत आपल्याला यश येऊ शकेल, असंही त्यांचं म्हणणं आहे.