अहिंसक युवाशक्तीची हिंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:45 AM2020-01-29T02:45:12+5:302020-01-29T02:48:42+5:30

संसदीय आणि संसदबाह्य असे राजकारणाचे दोन विभाग हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य.

The courage of non-violent youth | अहिंसक युवाशक्तीची हिंमत

अहिंसक युवाशक्तीची हिंमत

Next

- डॉ. कुमार सप्तर्षी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)

भारत १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. महात्मा गांधी स्वातंत्र्यलढ्याचे सेनापती. लोकमान्य टिळक व नामदार गोखले या महान नेत्यांच्या विचारसरणीचा तथ्यांश स्वीकारून, त्यांनी भारतीय जनतेला सामुदायिक पुरुषार्थाची दीक्षा दिली. त्यातून व्यापक जनसंघटन निर्माण केले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ९१ टक्के जनता निरक्षर होती. शिक्षणाच्या माध्यमातून नवा भारतीय नागरिक निर्माण करण्याचे ध्येय ठरले. नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये हा गाभा असलेले संविधान तयार झाले.

संसदीय आणि संसदबाह्य असे राजकारणाचे दोन विभाग हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य. शासन, प्रशासन व संसद या संस्था जातिधर्मनिरपेक्ष असल्याच पाहिजेत हा संविधानाचा गाभा. २६ जानेवारी १९५० रोजी प्रत्येक भारतीय व्यक्ती जातिधर्माच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वतंत्र झाली. नागरिकांना धर्माचे पालन करण्याचे वा न करण्याचे, ईश्वर मानण्याचे वा न मानण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु जातपंचायत किंवा धर्म यांना व्यक्तीवर वर्चस्व गाजविण्याचा अधिकार नाही. संविधानाने संसदीय पक्षांवर संविधानातील पायाभूत मूल्ये समाजात रुजविण्याची जबाबदारी सोपविली आहे. परंतु राजकीय पक्षांनीच पक्षांतर्गत लोकशाहीचा लोप केला आणि त्यांचे नेतृत्व फॅसिस्ट बनले तर काय करायचे, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. भाजप २०१४मध्ये सत्तारूढ झाला आणि वातावरण बदलले. आम्ही म्हणजेच राष्ट्र आणि आम्हाला विरोध म्हणजेच राष्ट्रद्रोह हे केंद्रीय नेतृत्वाचे सूत्र बनले.

या पार्श्वभूमीवर देशभरातल्या विद्यापीठांमध्ये चालू असलेल्या सरकारच्या विरोधातील विद्रोहाचे स्वागत केले पाहिजे. संसदेत विरोधी पक्ष भाजपसमोर शक्तिहीन आहेत. अशा विकलांगांचे नेतृत्व तरुणपिढी कशी मानेल? या अपरिहार्यतेमधून सत्ताविरोधी राजकारणाचे रणांगण संसदबाह्य शक्तींच्या हातात जाणे स्वाभाविक आहे. या विद्रोहाचे, स्फोटाचे निमित्त बनला धर्मांवरून भेदाभेद करणारा नवा नागरिकत्वाचा कायदा! देशात भयाचे वातावरण आहे. तरुण वर्ग बेकारीमुळे निराशाग्रस्त आहे. उरतो तो फक्त विद्यापीठात शिक्षण घेणारा विद्यार्थीवर्ग. हा वर्ग रोज एकमेकांच्या संपर्कात असतो. तारुण्यात प्रचंड ऊर्जा असते; विशेष म्हणजे ते हिंसेचा आश्रय घेत नाहीत. त्यांनी सध्या ‘लढाऊ अहिंंसा’ हे तत्त्व आत्मसात केलेले दिसते.

१९६७ सालात जगभर विद्यार्थी आंदोलने झाली. त्यात एकच सूर होता. बापांचे पापाचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा तरुण म्हणून आमचा वयसिद्ध मूलभूत अधिकार आहे. बापपिढीने आमच्यासमोर अंधाराची भिंंत उभी केली असेल, तर प्रकाश आणण्यासाठी ती फोडण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे.



१९७४ साली देशातील सर्व युवकांनी जयप्रकाश नारायण या ७२ वर्षांच्या वयोज्येष्ठ व्यक्तीचे नेतृत्व मान्य केले. संसदबाह्य जनआंदोलनाच्या माध्यमातून १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले. सत्ताबदल घडून केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. जयप्रकाशजी महात्मा गांधींचा वारसा चालविणारे. त्यामुळे अहिंसक जनशक्ती उभी राहिली. गुजरातमध्ये युवकांना दडपण्यासाठी इंदिरा गांधींनी लष्कर पाठविले होते. मुलींनी जवानांना राख्या बांधल्या. लष्कराने विद्यार्थ्यांवर रणगाडे घालण्यास नकार दिला. या प्रसंगाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो.

आता लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यासारखे अनुभवी नेते नाहीत. म्हणून हे आंदोलन नेतृत्वहीन अवस्थेत संपेल असे अनेकांना वाटते. मला मात्र तसे वाटत नाही. १९७४ सालाच्या तुलनेत देशातील महाविद्यालयीन तरुणांची संख्या आज अफाट वाढली. त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार ठिकठिकाणी युवा नेत्यांची साखळी निर्माण होईल. त्यातून कालांतराने राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्माण होतील, ही अटळ प्रक्रिया आहे. यालाच लोकशाहीची गतिमानता म्हणता येईल. आता परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. संगणक युग आहे. इंटरनेट आहे. सोशल मीडिया आहे. आंदोलनातील तरुण देशात अन् देशाबाहेरील विद्रोही तरुणांशी मोबाइलद्वारे संपर्कात आहेत. ते काही तासांत प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरतात.

दडपशाहीने, बंदुकीच्या धाकावर विद्यार्थी आंदोलनाला दडपता येत नाही हे वारंवार जगात नि भारतात सिद्ध झाले आहे. सरकारला या आंदोलनांत हिंंसा व्हायला हवी आहे; हे आंदोलकांना उमगले आहे. ते शहाणपणाने हिंसा टाळत आहेत. यात अग्रभागी मुली आहेत. मोदी-अमित शहा या जोडगोळीला या पिढीवर आपले संकुचित विचार लादताना यश लाभणार नाही. कपटनीतीने लाखो-करोडो तरुणांच्या सर्जनशीलतेशी सामना करता येणार नाही. तरुण मंडळी निर्भय आहेत. भारतीय संविधान हीच त्यांची मूल्ये आणि विचारसरणी आहे. नागरिकत्वाला हात लावून शहा-मोदींनी धु्रवीकरण चालू केले, म्हणून तरुण पेटला. मैदानात उतरला. देशात पुनश्च आशावाद उदयाला आला. युवाशक्तीच्या अजगराला सुस्तावस्थेमधून बाहेर काढण्याचे श्रेय सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल, हे मात्र नक्की!

फार काळजीचे कारण नाही. भारतीय मातीत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान, प्रबोधन रुजलेले आहे. या अशांततेच्या काळात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन महापुरुष थडग्यातून बाहेर येऊन मुलांच्या मनात जिवंत झाले आहेत. हे तर महापुरुषांचे कामच असते. ते प्रत्येक काळात पुन:पुन्हा चेतना देत राहतात.

Web Title: The courage of non-violent youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.