सृजनात्मक साक्षरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:14 PM2017-09-06T23:14:25+5:302017-09-07T00:11:30+5:30

ज्ञान विज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना, होणारा अक्षरसंकोच चिंताजनक आहे. सा-यांचाच प्रवास साक्षरतेकडून सुजाणतेकडे आणि सुजाणतेकडून सुसंस्कृतपणाकडे व्हायला हवा...

 Creative Literacy | सृजनात्मक साक्षरता

सृजनात्मक साक्षरता

Next

ज्ञान विज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना, होणारा अक्षरसंकोच चिंताजनक आहे. सा-यांचाच प्रवास साक्षरतेकडून सुजाणतेकडे आणि सुजाणतेकडून सुसंस्कृतपणाकडे व्हायला हवा...
माणसाच्या मूलभूत गरजा तीन. अन्न, वस्त्र आणि निवारा! पण याही पलीकडे एक गरज उरतेच. ती म्हणजे संवादाची! त्यामुळेच जन्माला आली अक्षरे आणि लिपी. त्याच्या विकासातून आले शिक्षण. माणसाचा विकास होत गेला तसतसे प्रत्येक टप्प्यावर शिक्षण विकसित होत गेले आणि माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे अवकाश विस्तारत गेले. अक्षरांना गुंफणारी भाषा नसती तर संवाद प्रक्रियेला मोठी खीळ बसली असती. म्हणूनच साक्षरतेचे महत्त्व सर्वकालिक आहे. आज जो एक संपन्न समृद्ध वारसा आपण अनुभवतो आहोत, त्यामागे भाषिक विरासत हा फार मोठा आधार आहे. सुरेश भटांसारख्या प्रख्यात कवीनेही ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या शब्दांत भाषेचा गौरव केला तो यामुळेच असावा. जागतिक साक्षरता दिन साजरा होत असताना तर अक्षरांचे महत्त्व, त्याची गरज अधोरेखित करतानाच त्याचा पैस विस्तारणे आवश्यक आहे.
असं म्हणतात, की ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’ आणि ज्याला अक्षर कळतं तो ‘साक्षर’! रामायण, महाभारतापासून ते शेक्सपीअरच्या नाटकांपर्यंत आणि संत ज्ञानेश्वर-तुकारामांपासून ते खांडेकर-शिरवाडकर-पाडगांवकरांपर्यंत जी काही साहित्य संपदा वैभवशाली वारसा जपून आहे ती केवळ अक्षरांमुळेच.
१९६५ रोजी तेहरान येथे जागतिक पातळीवरील एक परिषद भरली होती. या परिषदेत पार पडलेल्या ठरावानुसार ८ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. भारतात १९७८ पासून साक्षरता दिनाचे रोपटे लावले गेले. पण या रोपट्याचे वटवृक्षात अद्यापही रूपांतर होऊ शकले नाही ही खरी खंत आहे. राष्ट्रीय स्तरावर ५ मे १९८८ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन स्थापण्यात आले. त्यानुसार इ.स. २००० पर्यंत संपूर्ण भारत पूर्ण साक्षर अशी आपल्या राज्यकर्त्यांनी घोषणा केली होती. ही मुदत संपून आज १७ वर्षे झाली तरी संपूर्ण भारत पूर्ण साक्षर आहे, अशी आपल्याला घोषणा करता येत नाही. देशात राष्ट्रीय प्रौढ शिक्षणाचीही सुरुवात झाली.
देशाचा विचार करताना लक्षात येते की, आपल्याकडे अद्यापही साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्के नाही. २०१५ अखेरपर्यंत भारतात ग्रामीण भागात ७१ टक्के तर शहरी भागात ते ८६ टक्के होते. काल-परवापर्यंत साक्षरतेचे १०० टक्के प्रमाण असलेले केरळ राज्यही पाच टक्क्यांनी घसरून ९५ टक्क्यांवर आले आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड ही राज्ये अद्यापही ७० टक्क्यांहून कमी साक्षरता असलेली आहेत तर महाराष्ट्रात हे प्रमाण ८५ टक्के आहे. आज युरोप अमेरिकेपेक्षा आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्याला कारण आपल्या देशात विशिष्ट समाजालाच शिकण्याचा व शिकवण्याचाही अधिकार होता. त्यात स्त्रियांना तर नव्हताच. मग ती स्त्री उच्च वर्गातील असो वा कनिष्ठ. तेव्हा हजारो वर्षांची ही त्रुटी पूर्ण करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, सामूहिक प्रयत्न याद्वारेच साध्य करता येईल. त्यासाठी शैक्षणिक वातावरण पूरक आणि पोषक असणे फार गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकाची भूमिका कमालीची महत्त्वाची आहे. शिक्षक बुद्धिमान, संस्कारप्रेमी आणि सदैव सतर्क आणि दक्ष असायला हवा. शिक्षकानं विद्यार्थ्यांना केवळ अर्थच समजून सांगावा असे नाही तर त्यांच्यात जीवनाचे भान, जाण निर्माण करावी. शिक्षण हे माणूस घडविण्यासाठी, माणूसपण वाढविण्यासाठी आणि जीवनाच्या साफल्यासाठी असायला हवं. विद्यार्थ्यांच्या जाणिवांचा विकास शिक्षकानं करावा. शिक्षणाचा संबंध केवळ अक्षरांशी, पुस्तकी ज्ञानाशी नाही तर तो जगण्याशी आहे. जगण्याचं सार आत्मसात करणं हाच शिक्षणाचा गाभा आहे.
दुर्दैवानं आजकाल ज्ञान विज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना, होणारा अक्षरसंकोच चिंंताजनक आहे. साक्षरतेकडून सुजाणतेकडे आणि सुजाणतेकडून सुसंस्कृतपणाकडे असा प्रवास व्हायला हवा तरच आपण खºया अर्थाने सुजाण जबाबदार नागरिक म्हणवून घेण्यास पात्र ठरू शकू.

- विजय बाविस्कर

Web Title:  Creative Literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.