कोटी कोटींची अमली ममता

By Admin | Published: June 24, 2016 01:00 AM2016-06-24T01:00:36+5:302016-06-24T01:00:36+5:30

अडीच हजार कोटींचा आकडा, २३ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि त्यात एका जमान्यात अनेक सिनेमावेड्यांची लाडकी असलेली ममता कुलकर्णी हिचे चर्चेत आलेले नाव

Crore crores of money | कोटी कोटींची अमली ममता

कोटी कोटींची अमली ममता

googlenewsNext

अडीच हजार कोटींचा आकडा, २३ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि त्यात एका जमान्यात अनेक सिनेमावेड्यांची लाडकी असलेली ममता कुलकर्णी हिचे चर्चेत आलेले नाव, यामुळे सोलापूरकर चक्रावून गेले आहेत. सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत नक्की काय घडले आणि घडते आहे याविषयी कुणालाच कुणकुण कशी लागत नाही, याचीच चर्चा चालू आहे. साधी पानटपरी सुरू करायची तर हज्जार शासकीय अडथळे पार केल्यानंतर ती सुरू होते हा सर्वसामान्य अनुभव. पण इथे हजारो कोटींचे अवैध व्यवहार सुरू असताना कुठलाच अडथळा का आला नाही, हा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता अनेक चिंताजनक मुद्दे पुढे आले. केमिकल कारखाने आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावरच या निमित्ताने प्रकाश पडतो आहे. सोलापूर शहरालगत १५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. ही कंपनी औषध निर्मितीचे काम करते आहे. जवळजवळ दीडशे लोकांना रोजगार देण्याचे काम या कंपनीने केले. निर्मिती होते पण नक्की कशाची याचा पत्ता मात्र त्या दीडशे लोकांना आजही लागलेला नाही. याच कंपनीतून इफेड्रीन हे अमली पदार्थ मानले जाणारे ड्रग पोलिसांनी हस्तगत केले आणि सर्वांचे डोळे उघडले.
नायजेरियाच्या माफियाला ताब्यात घेतलेल्या ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाचे सोलापूर कनेक्शन शोधून काढले. ठाणे पोलीसच या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर इफेड्रीन आणि अमली पदार्थ माफियांचे जाळे कसे विणले गेले आहे, याची माहिती त्यांनी उजेडात आणली. ड्रग डॉन गोस्वामी आणि त्याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या सहभागापर्यंत पोलीस यंत्रणेचा तपास पोहोचला. देशात आणि विदेशात या प्रकरणाने खळबळ उडाली असताना सोलापुरात मात्र सामसूम असल्याचेच चित्र आजही दिसते. वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या अमली पदार्थासारख्या विषयाचे कनेक्शन सोलापूरशी आहे म्हटल्याबरोबर जिल्हा प्रशासन खडबडून जागे व्हायला हवे होते. तसे न घडता जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणताही उद्योग सुरू होताना कंपनी कायद्यानुसार नोंदणीपासून ते अन्न व औषधी प्रशासनापर्यंतच्या असंख्य परवान्यांची गरज असते. उद्योग सुरू झाला तरी कामगार कायद्यापासून ते औषधी प्रशासनापर्यंतच्या अनेक तपासण्यांना दर महिन्याला उद्योगांना सामोरे जावे लागते. असा अनुभव एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीच्या बाबतीत आलाच नसेल काय? जर तशा तपासण्या वेळोवेळी झाल्या असतील तर अन्न व औषधी विभागाला त्यात काहीच का सापडले नाही. असे अनेक प्रश्न उभे राहतात. एरव्ही उद्योगाशी संबंधित सर्वच स्थानिक शासकीय यंत्रणा त्रुटी राहिली की कायद्याचा बडगा उगारताना दिसतात. तोच न्याय एव्हॉन कंपनीला वेळोवेळी लावला असता तर अमली पदार्थाचे जाळे वेळीच उद्ध्वस्त करता आले असते. त्यात औषध निर्मिती आणि त्यावरील नियंत्रण पद्धती यातील तांत्रिक गौडबंगालही सामान्य माणसाच्या विचारापलीकडचे आहे. शासनमान्य औषधांच्या फॉर्म्युल्यात थोडाबहुत फरक केला तरी तो अमली पदार्थ म्हणून वापरात येऊ शकतो, असे सांगितले जाते. त्याचाच फायदा अमली पदार्थ निर्मितीत गुंतलेले तस्कर घेतात. २० महिन्यांपूर्वी कुर्डूवाडीत एका कारखान्यात अशीच अमली पदार्थ निर्मिती झाल्याचे उघडकीस आले होते. त्या प्रकरणात स्थानिक ढवळे व शहा ही मंडळी आजही तुरुंगात आहेत. त्या प्रकरणाची पाळेमुळे आणि सूत्रधार आजही शोधले गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर एव्हॉन कंपनी आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचे रॅकेट सोलापूरच्या माध्यमातून कार्यरत असेल तर ती चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उद्योगांशी असलेल्या सर्वच विभागांचे मजबूत कुंपण कार्यरत करायला हवे तसे घडल्यास कोटी कोटींची अमली ममता रोखून सोलापूरही स्वच्छ राहील.
- राजा माने

Web Title: Crore crores of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.