- विजय दर्डागेल्या आठवड्यात दोन अशा घटना घडल्या, ज्यात धमकावण्याचा इरादा अगदी स्पष्ट दिसतो. देशाचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांना ज्या पद्धतीने लक्ष्य केले गेले, त्यावरून कोणीतरी त्यांना भयभीत करू पाहात असावे, हे जाणवते. खरं तर सर्वच संवैधानिक संस्थांना घाबरवून सोडण्याचे नेटाने प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. विरोधी पक्षांचे नेते तर आधीपासूनच घाबरलेले आहेत. नोकरशाही घाबरून आहे. एवढेच कशाला माध्यमांचा एक वर्गही जीव मुठीत धरूनच काम करत आहे.सरन्यायाधीशांवर ज्या महिलेने आरोप केला, त्या महिलेला सर्वोच्च न्यायालयात नोकरी लावण्यासाठी एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून अटक झाली असून, सध्या ती जामिनावर आहे. तिने कोणाच्या तरी सांगण्यावरून सरन्यायाधीशांना लक्ष्य केल्याचे मानले जाते. तिच्या आरोपातील कथित घटनाही तेव्हाची आहे, जेव्हा न्या. गोगोई नुकतेच सरन्यायाधीश झाले होते. तिच्या आरोपांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष सुनावणीही झाली. त्यावेळी न्या. गोगोई यांनी त्यांच्यावरील आरोप निखालस खोटे असल्याचे ठामपणे खंडन तर केलेच, पण न्यायसंस्था गंभीर धोक्यात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी असेही सांगितले की, पुढील आठवड्यात त्यांच्यापुढे अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार असल्याने मुद्दाम हे आरोप आत्ता करण्यात आले आहेत. काही लोक सरन्यायाधीशांचे पद खिळखिळे करू पाहात आहेत. पैशावरून मला कोणी कशात अडकवू शकले नाहीत, म्हणून आता हे असे आरोप केले जात आहेत. यामागे कोणी एक व्यक्ती नाही, तर अनेकांचा त्यात हात आहे.सरन्यायाधीशपद निष्क्रिय करणे व न्यायसंस्था धोक्यात असणे हे सरन्यायाधीशांनीच जाहीरपणे सांगावे, हे कमालीचे चिंताजनक आहे. स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष न्यायसंस्था हा लोकशाहीचा प्राण असतो. लोकशाहीच्या पायाभूत म्हणून मानल्या गेलेल्या अनेक संवैधानिक संस्थांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण होत असल्याचे सर्वांनाच जाणवते आहे. या कारस्थान्यांना यात यश आले, तर ते देशासाठी अतिशय वाईट ठरेल.आता जरा दुसरी घटना पाहू. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जिगरबाज पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी जी भाषा वापरली, तिचा उल्लेख करतानाही माझ्या मनाला यातना होत आहेत. साध्वी म्हणाल्या, ‘तुमचा सर्वनाश होईल, असे मी करकरे यांना सांगितले होते. त्यानंतर, बरोब्बर सव्वा महिन्याने सुतक लागले आणि दहशतवाद्यांनी त्यांना ठार केले.’ एखाद्या साध्वीच्या तोंडून अशी भाषा यावी, यानेच मी हैराण झालो. संतांचे विचार तर असे नसतात! स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञासिंगने संत परंपरेचाही अपमान केला आहे, असे मला नक्की वाटते.सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात ही साध्वी मुख्य आरोपी आहे. ज्या मोटारसायकलमध्ये हा बॉम्ब ठेवलेला होता, ती साध्वी प्रज्ञासिंह हिच्या नावावर होती. त्यावेळी हेमंत करकरे दहशतवादविरोधी पोलीस पथकाचे (एटीएस) प्रमुख होते. प्रज्ञासिंह यांचे जाबजबाब घेण्याची जबाबदारी करकरे यांच्यावर होती. त्याप्रमाणे, करकरे यांनी जाबजबाब घेतले. त्यानंतर, २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला व त्यात अतिरेक्यांशी दोन हात करताना करकरे शहीद झाले. एक करारी आणि जिगरबाज अधिकाºयाच्या हौतात्म्याने संपूर्ण देश हळहळला. सन २००९ मध्ये करकरे यांना शांतताकाळात दिल्या जाणाºया ‘अशोकचक्र’ या सर्वोच्च ‘शौर्य’ पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात आले. कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी बजावेल तशाच पद्धतीने त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. अशा बहादूर शहीद अधिकाºयाचा साध्वी प्रज्ञासिंह यांनी असा अपमान करावा, याने साºया देशाचे रक्त खवळून उठणे स्वाभाविक होते. देशभर काहूर माजल्यावर साध्वीने आपले वक्तव्य मागे घेतले, पण त्यांनी त्याबद्दल जराही माफी मागितली नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. तसंही एखाद्याचा अपमान केल्यावर माफी मागून झालेला अपमान कमी होत नसतो. साध्वीच्या बाबतीत तर नक्कीच नाही. कारण ज्याने देशासाठी प्राणांची बाजी लावली, अशा अधिकाºयाचा साध्वीने अपमान केला आहे. जिच्यावर इतरांचे प्राण घेतल्याचा आरोप आहे, तिच्याकडून आणखी अपेक्षा तरी काय ठेवावी?पण साध्वीला हे धाडस कसे झाले? तिचा बोलविता धनी कोण आहे? हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर संपूर्ण देश जाणून आहे. दहशतवादाच्या खटल्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी देताना लाज कशी नाही वाटली, असा प्रश्न देशवासी भाजपला विचारत आहेत. त्यांना लाज वाटणार तरी कशी म्हणा. सत्तेसाठी काही करण्याचे धोरण ठेवून चालणाºया भाजपला अशा गोष्टींची लाज वा खंत वाटणे अपेक्षितही नाही! पण अशा नतद्रष्ट विचारसरणीला लगाम घालायला विरोधी पक्ष एकजुटीने तुटून पडताना दिसत नाही, हे खरे दुर्भाग्य आहे. माध्यमांचा एक मोठा वर्गही या शक्तींपुढे नतमस्तक आहे. अशा परिस्थितीत देशाचा गाडा हाकणाºया शक्ती बेगुमान व बेलगाम होणे ओघाने आलेच, परंतु या भयगंडावरही मात करावीच लागेल, अन्यथा अनर्थ अटळ आहे!(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)
आरोप व अपमानाचे भयावह कारस्थान!
By विजय दर्डा | Published: April 22, 2019 4:32 AM