फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत लोकशाही व मध्यममार्ग यांनी ट्रम्पशाहीवर विजय मिळविला आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन हे त्या देशाचे नवे अध्यक्ष सर्वसमावेशक वृत्तीचे व लोकशाही मूल्यांचे समर्थक आहेत. ३९ वर्षे वयाच्या या तरुण अध्यक्षाने ज्या मारीन ली पेन यांचा ६५ टक्के मते मिळवून पराभव केला, त्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्गाने जाणाऱ्या होत्या. ‘अमेरिका फर्स्ट’ या ट्रम्प यांच्या घोषणेप्रमाणेच त्या ‘फ्रान्स फर्स्ट’ असं म्हणत होत्या. इंग्लंडच्या टेरेसा मे यांच्याप्रमाणे त्यांना फ्रान्सला युरोपीयन कॉमन मार्केटमधून बाहेर न्यायचे होते. निर्वासितांच्या प्रवेशावर बंदी घालायची होती आणि फ्रान्सच्या अर्थकारणाबाबत सुरक्षेचे धोरण स्वीकारायचे होते. याउलट मॅक्रॉन युरोपीयन कॉमन मार्केटशी संबंध राखण्याचा, युरोपीयन राजकारण बळकट करण्याचा, निर्वासितांना निवडक प्रवेश देण्याचा व साऱ्या जगाशी पूर्ववत संबंध राखण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारे नेते होते. थोडक्यात कमालीच्या उजव्या व मध्यम अशा दोन विचारसरणीच्या प्रतिनिधीतील ही निवडणूक होती. मॅक्रॉन यांच्या विजयामुळे एकीकडे ट्रम्प यांच्या त्या भूमिकांविषयीची युरोपची नाराजी प्रगट झाली आणि त्याचवेळी इंग्लंडच्या युरोपीयन कॉमन मार्केटमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाविरुद्धही फ्रान्सच्या जनतेने आपले मत नोंदविले. टोकाचे उजवेपण युरोपीय लोकशाह्यांचा घास घेते की काय अशी जी भीती जगात निर्माण झाली होती तिला मॅक्रॉन यांच्या विजयाने निकालात काढले आहे. इंग्लंडमध्ये येत्या ८ जूनला ब्रेक्झिटच्या प्रश्नावर निवडणूक व्हायची आहे. तिच्यावर मॅक्रॉन यांच्या विजयाचा काय परिणाम होतो याची चिंता आता टेरेसाबार्इंना वहावी लागणार आहे. फ्रान्समध्ये अध्यक्षपदाची निवडणूक दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात सर्वपक्ष व अनेक अपक्ष उमेदवार आपले नशीब पारखायला उभे राहतात. त्यातील पहिल्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या दोन उमेदवारात अंतिम निवडणूक होऊन फ्रान्सचा अध्यक्ष निवडला जातो. मॅक्रॉन आणि ली पेन हे दोन्ही उमेदवार फ्रान्समधील कोणत्याही प्रस्थापित पक्षाचे (सोशालिस्ट आणि रिपब्लिकन) प्रतिनिधी नव्हते. ते स्वत:च्या कार्यक्रमावरच जनतेला मते मागत होते. फ्रान्सची जनता प्रकृतीने काहीशी लहरी आहे. त्यामुळे या निवडणुकीत टोकाचा प्रचार करणाऱ्या आणि फ्रान्स फर्स्ट म्हणणाऱ्या ली पेन यांच्या उमेदवारीची हवा तेथे आरंभी जोरात होती. परंतु जसजशी मतदानाची वेळ जवळ आली तसतसा फ्रेंच मतदार गंभीर होऊ लागला व युरोपातील देशात आपले महत्त्व राखायचे तर युरोपीयन कॉमन मार्केटमध्ये राहण्याचा विचार त्यांच्यात प्रभावी होऊ लागला. त्याचवेळी फ्रान्सच्या सर्वसमावेशक, लोकशाहीवादी व मध्यममार्गी परंपरेचाही आठव त्याला होऊ लागला. परिणामी सुरुवातीला आघाडी घेणाऱ्या पेनबाई मागे पडल्या आणि त्यांना अवघ्या ३५ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. मॅक्रॉन यांच्यापुढील आव्हाने मोठी आहेत. ट्रम्प यांच्या संबंधांचा त्यांना भरवसा धरता येत नाही. इंग्लंड युरोपीयन कॉमन मार्केटमधून बाहेर पडल्यास त्याच्याशी नव्याने आर्थिक संबंध त्यांना प्रस्थापित करावे लागतील. नाटोमधून बाहेर पडण्याच्या आणि ती संघटना सैल करण्याच्या ट्रम्प व मे या दोघांच्याही धोरणाचा अटल परिणाम फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहारावर होणार आहे. त्याचीही जबाबदारी नव्या अध्यक्षांना घ्यावी लागणार आहे. मॅक्रॉन यांच्यामागे राजकीय पक्षाची वा विचारांची परंपरा नसल्याने उर्वरित जगही त्यांच्याकडे काहीकाळ साशंकतेने पाहणार आहे. अमेरिकेचा जगातील गट तुटणे, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी त्यांची धोरणे स्वतंत्रपणे आखणे ही बाब जर्मनीचे युरोपातील महत्त्व वाढविणारी आहे. जर्मनीविषयी फ्रेन्चांच्या मनात एक ऐतिहासिक संशय आहे. या संशयावर मात करून मॅक्रॉन यांना जर्मनीशी व त्यांच्या पंतप्रधान (चान्सलर) अॅन्जेला मेर्केल यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. मेर्केल या मॅक्रॉन यांच्या विजयाने आनंदित झालेल्या नेत्या आहेत. युरोपीयन कॉमन मार्केटमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या ली पेन यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून येणे हे त्यांनाही नकोच होते. ही स्थिती जर्मनी व फ्रान्स यांना जवळ आणणारी आणि अमेरिका व इंग्लंड यांच्यापासून त्यांना काहीसे दूर नेणारी आहे. तसेही ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेला नाटो व इतर पाश्चात्त्य देशांपासून काहीसे दूर नेले आहे मॅक्रॉॅन यांच्या विजयाने ते अंतर वाढणार आहे, शिवाय त्यांचा विजय अमेरिकेच्या वर्चस्वाला काहीसा बाधित करणाराही आहे. जग मात्र मॅक्रॉनमुळे आनंदित आहे. मध्यममार्गी, लोकशाहीवादी आणि सर्वसमावेशक असे नेतृत्व जनतेला आवडणारे असते. टोकाच्या विचारसरणी काही काळच भुरळ घालू शकतात. जगाचा मूळ मार्ग मात्र मध्यमच आहे आणि मॅक्रॉन त्या मार्गाचे प्रवासी आहेत. मॅक्रॉनची निवड ही मध्यममार्गापासून घडत जाणाऱ्या अनेक लोकशाही देशांना मार्गदर्शक ठरावी अशी आहे. अमेरिकेने केलेली ट्रम्पची निवड, इंग्लंडने घेतलेला ब्रेक्झिटचा निर्णय आणि जर्मनीत मेर्केलविरुद्ध संघटित होणारे पक्ष ही या ढळणाऱ्या राजकारणाची चिन्हे आहेत.
फ्रान्समध्ये ट्रम्पशाहीचा पराभव
By admin | Published: May 08, 2017 11:42 PM