- मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. स्वबळ, युती, आघाडीचे दावे हवेत विरले. आयाराम-गयाराम सर्वच पक्षांमध्ये झाले. आता प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कसोटी आहे. शिवसेनेने ‘युती’साठी पुढे केलेला हात झिडकारलेल्या भाजपाने स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे; पण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे अद्याप प्रचारासाठी आलेले नसल्याने उमेदवार चिंतेत आहेत. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीच्या १५ वर्षांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विकासाचे दावेभाजपा करीत आहे. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिका कर्जमुक्त करू, असा वायदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगावच्या विकासासाठी राज्य सरकारकडून २०० कोटी रुपयांचा निधी आणू असा दावादेखील महाजन यांनी केला आहे. विकासाच्या नव्या आश्वासनांना खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी आक्षेप घेत, जळगावच्या विकासात आडकाठी घालण्याचे काम राज्य सरकार आणि भाजपाचे आमदार यांनीच केल्याचा आरोप केल्याने प्रचारात रंगत वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांचा विशेष निधी केवळ आमदारांच्या आडमुठेपणामुळे अद्याप खर्ची झाली नसल्याचे सांगत एकप्रकारे भाजपाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खासदार, आमदार आणि मंत्री भाजपाचे असताना जळगाव महापालिकेला सावत्रपणाची वागणूक देण्यात आल्याचे मतदारांच्या लक्षात आणून देण्यात जैन यांना यश आले आहे. ‘बदल घडविणार’ म्हणणाऱ्या भाजपाला त्यामुळे नव्या रणनीतीचा शोध घ्यावा लागत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक हे या निवडणुकीच्यानिमित्ताने ‘संपर्कसे समर्थनतक’ या अभियानाची उजळणी करीत आहे. प्रचार सभांपेक्षा २५-५० नागरिकांशी संवाद साधताना केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीविषयी जनमानसाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न हे नेते करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर पेटलेले आंदोलन, मालवाहतूकदारांच्या संपामुळे त्रस्त झालेले व्यापारी, उद्योजक हे भाजपापुढे अडचणीचे विषय आहेत. भाजपाचा समर्थक असलेला व्यापारी, उद्योजक केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे. चार वर्षांत नोटाबंदी, जीएसटी, रेरा, प्लॅस्टिकबंदी असे मोठे आर्थिक निर्णय घेतल्याने या वर्गात असंतोष आहे. त्याची कल्पना नेते आणि मंत्र्यांना आलेली आहे. शिवसेनेकडून सुरेशदादा जैन यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली आहे. आरोप-प्रत्यारोपापेक्षा मतदारांची भेट घेऊन त्याच्याशी सुसंवाद साधण्यावर जैन यांनी भर दिला आहे. विकासाचा मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर आला आहे.