अपुऱ्या यंत्रणेवर अपु-या हवामानाचे अंदाज कठीणच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:17 AM2018-06-24T05:17:53+5:302018-06-24T05:17:56+5:30
अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन संकल्पना राबविणे जरूरीचे आहे. मात्र, शेतकºयाला हवी तशी हवामानाच्या अंदाजाची व्यवस्था नाही
रामचंद्र साबळे
हवामान अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन संकल्पना राबविणे जरूरीचे आहे. मात्र, शेतकºयाला हवी तशी हवामानाच्या अंदाजाची व्यवस्था नाही. उदा. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सरासरीने ५ हजार मिमी पाऊस पडतो, त्याच जिल्ह्यातील म्हसवड येथे सरासरी २५० मिमी पाऊस पडतो. यावरून सरासरी जिल्ह्याचा अंदाज दिल्यास तो बरोबर येत नाहीत. देशाच्या पूर्वेला चेरापुंजी येथे सरासरी १२ हजार मिमी पाऊस पडतो, तर देशाच्या पश्चिमेला राजस्थानमध्ये जोधपूर येथे ३०० ते ३५० मिमी पाऊस पडतो. यावरून सरासरी दिलेले अंदाज बरोबर येत नाहीत. त्यासाठी स्थानिक ठिकाणांचा पावसाचा अंदाज देणारी मॉडेल बनवून हवामानाचे अंदाज दिल्यास ते काही प्रमाणात बरोबर येतील.
बदलते हवामान ही जगभर मोठी समस्या बनलेली आहे. यामागे वाढते तापमान, हवेमध्ये वाढणारे प्रदूषण, हवेतील कार्बन डायआॅक्साइड, नायट्रो आॅक्साइड, मिथेन गॅस यांचे वाढते प्रमाण, तसेच कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढत गेल्यास तापमान वाढत आहे आणि यापुढे हे प्रमाण अधिक असेल. जेथे तापमान वाढेल, तेथे हवेचा दाब कमी होईल. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वारे बाष्प वाहून नेतील. त्यामुळे पाऊस पडेल. मात्र, जेथे हवेचा दाब अधिक राहील, तेथे दुष्काळी परिस्थिती उद्भवेल. हवामान बदलाला रोखणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे वृक्ष, वने. मात्र, जगभरातून वनांना नष्ट केले जात आहे. आशिया खंडात ५५ दशलक्ष हेक्टर जागेवरील जंगल, आफ्रिका खंडात ६५ दशलक्ष हेक्टर जागेवरील जंगल, उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडात ८५ दशलक्ष हेक्टर जागेवरील जंगल मानवाने नष्ट केले आहे. कार्बन डायआॅक्साइड शोषण करणारी शोषण यंत्रणा मानवाने नष्ट केली आहे. दुसºया बाजूस कारखानदारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाहने वाढत आहेत. यातून कार्बन डायआॅक्साइड मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडला जातो. त्यामुळेच कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढत आहे. विमानांची संख्या वाढत असल्याने, कोरो कार्बन हवेतील वरच्या थरावर सोडला जात आहे. त्यामुळे पुढील काळात हवामान बदलाचे परिणाम वेगाने जाणवत आहेत आणि जाणवतील. गारपीट, कधीही वीज कोसळणे याचे प्रमाण वाढत आहे. याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे जगाच्या बहुतांश देशांत अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. दुसºया बाजूला लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशी परिस्थिती उद्भवत राहिली, तर सर्व जगात अन्न सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होईल.
देशाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. कारण देशातील सध्याची लोकसंख्या १३४ कोटीवर पोहोचली आहे, तर चीनची लोकसंख्या १३८ कोटी आहे. आपला देश लवकरच चीनला मागे टाकून जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होणार आहे. त्यामुळे देशातील अन्न सुरक्षा क्षेत्राकडे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. पाणी समस्यादेखील दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे हा परिणाम हवामान बदलामुळे दिसून येत आहे.
बदलत्या हवामानाला अनुरूप व्यवस्थेची गरज आहे. मात्र, त्या दिशेने संशोधनाची दिशा कमी पडत आहे. त्यामुळेच हवामान बदलावर आधारित शेती व्यवस्थापनावरही संकल्पना राबविणे आवश्यक आहे. देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. यात प्रामुख्याने कापूस, चहा उत्पादक शेतकºयांचा समावेश जास्त आहे. जवळपास ७ टक्के शेतकरी शेती व्यवसाय सोडण्याचा विचार करत आहेत. अलीकडच्या काळात शेती उत्पादनाचे भाव कोसळल्याने बहुतांश शेतकरी अडचणीत आहेत. दरवर्षी कर्जमाफी दिली, तरी शेतकºयांचे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी कृषीमधील आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र विभाग असणे गरजेचे आहे.
राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याचा प्रकल्प ‘स्कायमेट’ या कंपनीकडून महाराष्ट्र शासन राबवित आहे. मात्र, मॉडेल बनविण्यासाठी तीस वर्षांचा हवामानाचा डेटा लागतो. या डेटाची माहिती कोणालाही नसल्याने, ही केंद्र हवामान अंदाज देण्यासाठी उपयोगी पडतील, अशी चुकीची अपेक्षा धरून सर्वजण आपल्याला स्थानिक स्वरूपाचे हवामान, पावसाचे अंदाज मिळतील, या आशेवर आहेत. मात्र, आपल्याला त्यातून स्थानिक स्वरूपाचे हवामान कळू शकेल. यातून पंतप्रधान पीक विमा योजनेच्या कामासाठी उपयोग होऊ शकेल. भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि ‘स्कायमेट’ या कंपनीकडे हवी असलेली यंत्रणा अपुरी आहे. या अपुºया यंत्रणेवर अचूक हवामान देणे कठीण जात आहे. याबाबतीत सुधारणा झाल्याशिवाय हवामान अंदाज बरोबर येणार नाहीत. याशिवाय हवामान अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करता येणार नाही. सध्या दिले जाणारे मध्यम पल्ल्याचे, लांब पल्ल्याचे अंदाज काही प्रमाणात बरोबर येत असले, तरी त्याची अचूकता वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.
सर्व कृषी विद्यापीठांमध्ये आणि कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे, परंतु बहुतांश मनुष्यबळ हे हवामानाच्या अभ्यासाने प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. जोपर्यंत हवामान खात्यातील शास्त्रज्ञ, अधिकारी, शेतकरी हे प्रशिक्षित होणार नाहीत, तोपर्यंत हवामानावर आधारित संशोधन होणार नाही. हवामानावर आधारित योजना तयार होणार नाहीत. हवामानाच्या अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन करू शकणार नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे सर्वांनी गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे.
(शब्दांकन : कुलदीप घायवट)