ताजमहालला ‘द्वेषाचे प्रतीक’बनवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:27 AM2018-04-16T00:27:15+5:302018-04-16T00:27:15+5:30
ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये.
- सविता देव हरकरे
ताजमहालवर आपला हक्क सांगणाऱ्या सुन्नी वक्फ मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले हे फार चांगले झाले. ताजमहालवर हक्क हवा असेल तर आधी शहाजहाँची स्वाक्षरी असलेले दस्तावेज सादर करा असा आदेशच न्यायालयाने दिला. उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ मंडळाने २००५ साली ताजमहाल ही मंडळाची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. एवढेच नाहीतर शहाजहाँने या वास्तूचा मालकी हक्क मंडळाच्या सुपूर्द केला होता असा दावाही केला होता. ताजमहालवर दावा सांगण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे. ताजमहाल हा तेजोमहाल अर्थात श्रीशंकराचे देवस्थान असल्याचा जावईशोध या देशातील काही उपद्रवींनी लावला होता. न्यायालयाने तो सुद्धा फेटाळून लावला. आग्रा येथील ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. सतराव्या शतकात मुघल सम्राट शाहजहाँने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी अप्रतिम अशा ताजमहालची निर्मिती केली होती. तेव्हापासून ही वास्तू देशविदेशातील कलाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. परंतु अलीकडच्या काळात या ऐतिहासिक वास्तूवर नैसर्गिक आघातांसोबतच धार्मिक आणि राजकीय आघातही मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. तिचा इतिहास बदलण्याचे मनसुबे आखले जात आहेत. पुरातत्त्व विभाग आणि न्यायालयाने ताजमहालकडे वक्रदृष्टी टाकणाºया उपद्रवींचे नापाक इरादे वेळोवेळी उधळून लावले, हे खरे. पण कुणीही यावे टिकली मारूनी जावे असला प्रकार ताजमहालच्या बाबतीत सध्या अनुभवास येत असून हे या देशाचे आणि ही अप्रतिम वास्तू निर्माण करणाºया कलाकारांचे दुर्दैवच म्हणायचे. ताजमहालला राजकीय खेळीचा सामना करावा लागेल याचा तरी विचार कुणी केला होता का? पण तेही घडतेय. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तर ताजमहालला वाळीत टाकण्याचा जणू चंगच बांधण्यात आला. या राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळण्यात आले. विदेशी पाहुण्यांना भेट स्वरुपात ताजमहालची प्रतिकृती देण्याची परंपरा जाणीवपूर्वक मोडीत काढण्याचा असांस्कृतिक प्रकारही घडला. पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे शतकांपासून मोठ्या डौलाने उभ्या असलेल्या या वास्तूचे अस्तित्व तसेच धोक्यात आले आहे. तिचे मूळ रूपात जतन करण्याचे सर्वंकष प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून सुरु असले तरी प्रदूषणाच्या भीषणतेपुढे ते थिटे पडतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. परवा आलेल्या वादळात ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले अन् पांढºया रंगाचा छोटा घुमटही पडून तुटला. केवळ भारतवंशाचीच नव्हे साºया जगाची शान समजल्या जाणाºया ताजमहालच्या जपणुकीचे प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून सरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे ताजमहाल भविष्यातही असंख्य वर्षे असाच डौलाने उभा राहील, याबद्दल शंका नाही. पण त्याच्यावर होणारे धार्मिक आणि राजकीय आघात तसेच मिळणाºया परकेपणाच्या वागणुकीचे काय? ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये.