शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

‘मांझी’ म्हणू नये आपला !

By admin | Published: February 13, 2015 11:08 PM

लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला (जदयू) मोठा पराभव पत्करावा लागला म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला (जदयू) मोठा पराभव पत्करावा लागला म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व आपले विश्वासू सहकारी जितनराम मांझी यांच्याकडे ते पद सोपविले. एका अर्थाने रामाने सोपविलेल्या पादुका निष्ठेने सांभाळणे व त्यांच्या बळावर राज्य चालविणे ही भरताची ऐतिहासिक व नैतिक जबाबदारी मांझी यांच्यावर आली. पण मांझी भरत नव्हते. ते आताच्या राजकारणातले तरबेज सत्ताबाज होते. नितीशकुमारांच्या गैरहजेरीच्या काळात त्यांनी पक्षातील काही आमदार स्वत:कडे वळविले. ते वळविताना आपले दलितत्वही त्यांनी नीट वापरून घेतले. बिहार विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या मोठी आहे. मांझींनी त्या आमदारांशी व त्यांच्यामार्फत दिल्लीतील मोदी व शाह यांच्या राजकारणाशी आपले सूत जमविले. आपल्यासोबत आमदारांचा असा एक गट तयार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नितीशकुमारांना आव्हान द्यायला सुरुवात केली. गेले काही महिने मांझी यांचे हे उंडारलेपण खपवून घेतल्यानंतर व राज्याची स्थिती बिघडल्याचे दिसल्यानंतर नितीशकुमारांनी पुन्हा एकवार बिहारच्या राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे मांझींनी त्यांच्या मार्गात अडसर उभा केला आणि दिल्ली व पाटण्यातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी त्या प्रयत्नात माझींना साथ दिली. आता मांझी म्हणतात ‘मीच मुख्यमंत्री’. आपल्याला बहुमताचा पाठिंबा असल्याचा दावा करताना दिल्लीही आपल्या पाठीशी असल्याचे सांगतात. दुसरीकडे नितीशकुमार यांंची बिहारच्या पक्षनेतेपदी पक्षाच्या आमदारांनी नव्याने केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा सभापतींनी दिला आणि नितीश कुमारांनी आपल्या सोबत असलेल्या १३० आमदारांना थेट राष्ट्रपतींसमोर हजरही केले. आता मांझींना दिलेला पाठिंबा काढून घ्यायचा तर तोंडघशी पडण्याची पाळी आणि मतदानाने बहुमताचा निर्णय घ्यायची वेळ आली तर पराभवाची आपत्ती अशा शृंगापत्तीत भाजपाचे राष्ट्रीय व प्रादेशिक पुढारी अडकले आहेत. नितीशकुमार हे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय होते आणि त्यांच्या कारकीर्दीत बिहारचे ‘बिमारू’ राज्यातून एका सुदृढ राज्यात रूपांतर झालेले देशाने पाहिले. एक अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा कार्यक्षम मुख्यमंत्री अशी ख्यातीही त्यांच्या वाट्याला आली. हा माणूस वृत्तीने साधा व सरळ असावा. त्याचमुळे कदाचित राजकारणी मित्रावर भरवसा ठेवून तो काही काळासाठी राजकारणाबाहेर गेला असावा. पण बिहारचे राजकारण हे तसेही बेभरवशाचे आणि अस्थिर आहे. शिवाय त्यातली मांझीसारखी माणसे नुसती लोभी लबाडच नाहीत तर भरपूर मतलबीही आहेत. आता विधानसभेत नितीशकुमारांचे बहुमत सिद्ध होतपर्यंत मांझी मुख्यमंत्रिपदावर बसणार आणि आपल्या दिल्लीकर मित्रांच्या मदतीने आमदारांच्या घोडेबाजारात उतरून नितीशकुमारांचे आमदार विकत घेणार. स्वच्छ भारत आणि त्याचे स्वच्छ राजकारण अशी ग्वाही देणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे पराभूत पक्षाध्यक्ष अमित शाह ही खेळी जिंकून दिल्लीत आपण गमावलेल्या शिरपेचाचे काही तुकडे पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करणार. देशाला हे राजकारण नुसत्या अप्रामाणिकपणाचेच नव्हे तर बेईमानीचे वाटणार आणि राजकारणात हे असेच चालायचे म्हणून देशातली सज्जन माणसे स्वस्थ बसणार. एक गोष्ट नितीशकुमारांविषयीही, जयप्रकाशांच्या तालमीत तयार झालेले हे गृहस्थ सरळ व साधे असावे हे एका मर्यादेपर्यंत ठीक. पण एवढ्या वर्षांच्या राजकीय अनुभवाने त्यांनी राजकारण जराही शिकले नसेल तर मात्र तो त्यांच्याबाबतचाही चिंतेचा विषय ठरावा. बिहार हे तसेही सगळ्या तऱ्हेचे बरेवाईट राजकारण खोलवर गिरवणारे राज्य आहे. त्यात राहूनही नितीशकुमार असेच राहिले असतील तर त्यांनी राजकारण करण्याहून संतकारण करणे हेच अधिक चांगले नाही काय? आजच्या राजकारणाच्या अध:पतनाचा इतिहास मोठा आहे. १९६७ मध्येच त्याला सुरुवात झाली. त्याआधीही अनेकांच्या राजकारणातल्या निष्ठा पातळ झालेल्या व त्यांनी आपले जुने पक्ष सोडल्याच्या घटना घडल्या. ६७ नंतर या प्रक्रियेला वेग आला. १९७७ च्या निवडणुकीनंतर तर राजकारणी लोकांनी लोंढ्यांनी त्यांचे पक्ष सोडले. १९८० च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तेव्हा अगोदर जनता पक्षात गेलेले बरेच जण पुन्हा माहेरी परतलेले दिसले. ही लागण तेव्हापासून आतापर्यंत तशीच आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात जाणाऱ्या लोकांची यादी अशीच मोठी आहे. त्यानंतरही हे पक्षांतर तसेच चालू राहिलेले आपण पाहिले आहे. राजकारणाच्या या अध:पतनाचा नितीशकुमारांना जाच होणार नाही असे अनेकांना त्यांच्याकडे पाहून वाटत आले. पण राजकारणातील लोभ हा सगळ्या नीतितत्त्वांचा पराभव करील अशीच सध्याची देशस्थिती असल्याने मांझीच मुख्यमंत्री राहिले आणि नितीशकुमारांच्या वाट्याला पुन्हा विजनवास आला तर त्याचे आपण आश्चर्य करण्याचे कारण नाही. माणसे अविश्वासापायी वाया जातात असे आपण नेहमीच म्हणतो. नितीशकुमारांच्या बाबतीत हे उलटे म्हणावे लागेल. ‘ते विश्वासापायी वाया गेले’ असाच त्यांच्याविषयीचा निर्णय इतिहासाला कदाचित द्यावा लागेल.