अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:19 PM2018-08-31T23:19:53+5:302018-08-31T23:20:05+5:30
आपल्याच अखत्यारितील कामावर नाराजी प्रकट करणारे किंबहुना मला मंत्री म्हणून लाज वाटते, असे बेधडक विधान करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रामाणिक हेतूला नक्कीच दाद दिली पाहिजे.
- धर्मराज हल्लाळे
आपल्याच अखत्यारितील कामावर नाराजी प्रकट करणारे किंबहुना मला मंत्री म्हणून लाज वाटते, असे बेधडक विधान करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रामाणिक हेतूला नक्कीच दाद दिली पाहिजे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात होत असलेल्या दिरंगाईवर गडकरी लाज वाटत असल्याचे बोलून गेले. त्याचवेळी युपीए सरकारच्या कार्यशैलीवरही बोट ठेवले. गडकरींनी असे विधान पहिल्यांदाच केले असे नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर वर्षभरात अकोल्यात झालेल्या एका सोहळ्यातही ते लाज वाटत असल्याचे म्हणाले होते. कारण होते कृषी विकास दर शून्यावर असण्याचे. एकंदर अधूनमधून तत्कालीन सरकारला धारेवर धरताना आपल्याही कामाचे विश्लेषण गडकरींनी परखडपणे केले, असे म्हणू शकतो. मात्र प्रश्न हा आहे, महाराष्ट्रातील राज्य रस्त्यांची नियमित होणारी दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यावर कोणालाही लाज का वाटत नाही? स्वाभाविकच खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच पचनी पडत नाही. त्यामुळे लाज वाटण्याइतके काही घडले, याची जाणीवच होत नाही.
महाराष्ट्रात सुमारे ९० हजार किलोमीटर इतके राज्य रस्ते आहेत. त्यामध्ये साधारणत: ३० हजार किलोमीटरचे रस्ते ठिकठाक आहेत. ३० हजार किलोमीटरच्या मार्गावर खड्डे तर उर्वरित ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांचा खड्ड्यांमध्ये शोध घ्यावा लागतो. ३१ डिसेंबरपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करू, अशा घोषणा सर्वांच्या कानी पडल्या होत्या. त्याला आठ महिने उलटले आहेत. परिस्थिती जैसे थे आहे. जिथे मुरुमाने खड्डे बुजविले तिथे चिखल झाला आहे. नाही म्हणायला मंत्र्यांचे दौरे लक्षात घेऊन काही ठिकाणी डांबराने खड्डे बुजविले. एकूणच खड्ड्यांचे दुष्टचक्र कायम सुरू आहे. त्यातही गेल्या काही वर्षांत राज्य रस्त्यांची झालेली दुरवस्था संताप निर्माण करणारी आहे. एकीकडे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात धुमधडाक्यात राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू केले आहे. बहुतेक मार्ग प्रगतिपथावर आहेत. कामाची गती जनतेच्या लक्षात येण्यासारखी आहे. परंतु, त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे हजारो किलोमीटरचे राज्य रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. सर्वसामान्य कोट्यवधी जनता जिल्हा रस्त्यावरून सर्वाधिक वेळा प्रवास करते. त्यातही लाखोंची संख्या असलेल्या शहरातील मनपा रस्त्यांचे विचारायलाच नको. काही सन्माननीय अपवाद वगळले तर जिल्ह्यांची ठिकाणे असलेली शहरे खड्ड्यांमुळे चर्चेत आहेत. तिथे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतुचक्राप्रमाणे खड्डेही कालांतराने पडतच असतात, त्यामुळे लाज कशाला अन् कोणाला वाटेल!
अर्थात सर्वजण निलाजरे नाहीत. खड्डेमुक्तीत पुणे जिल्ह्यात काम झाले. दिवसाला तीन किलोमीटर या गतीने रस्ते झाले. अशीच काही दुर्मिळ उदाहरणे अन्यत्रही आहेत. मात्र मराठवाड्यात एखाददुसरा राज्य मार्ग वगळला तर सर्व रस्ते खड्डेग्रस्त आहेत. तूर्त पावसाळ्याचे कारण पुढे करून लोकांना खड्डेमय प्रवास करणे अनिवार्य केले आहे. त्याची लाज कसली?