- किरण अग्रवाल
घरात दिवाळीच्या आनंदाचा माहोल असताना बळीराजाला रात्र शेतात जागून काढावी लागत आहे. विजेच्या वाढत्या भारनियमनामुळे रब्बीच्या पिकासाठी सिंचनाचा प्रश्न उपस्थित झाला असून, ऐन दिवाळीत या विषयावरून फटाके वाजू लागले आहेत, हे चिंतनीय आहे.
एकीकडे दिवाळी सणानिमित्तच्या उत्साहात आसमंत उजळून निघू पाहत असताना दुसरीकडे विजेचे भारनियमन व कमी व्होल्टेजच्या पुरवठ्यामुळे बळीराजाला ऐन सणासुदीच्या दिवसात रात्र-रात्र शेतात काढण्याची वेळ येणार असेल तर वीज वितरण कंपनीचा प्रश्न म्हणून त्याकडे जिल्हा प्रशासनाला दुर्लक्ष करून चालणार नाही.
शेतकरी बांधव सध्या रब्बीच्या हंगामात व्यस्त आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगाम हातचा गेला. दुबार पेरणी करूनही अनेकांचा लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. अशाही स्थितीत ऋण काढून सण साजरा करण्याची आपली मानसिकता असल्याने बळीराजा दिवाळी सणाच्या तयारीला लागला आहे. त्याची आशा आता रब्बीवर लागून आहे, पण रब्बीची पिके घेतानाही त्याला वीज भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा होत असला तरी कमी होल्टेजमुळे वीज पंप चालतच नसल्याच्या समस्या येत आहेत, त्यामुळे बळीराजाला पुन्हा कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे.
पश्चिम वऱ्हाडात गहू, हरभरा, तूर, कापूस आदी पिकांची पेरणी झाली असून, त्यांना आता पाण्याची आवश्यकता आहे. कृषी सिंचनासाठी महावितरण आठ तास वीज देते हे कागदोपत्री खरे असले तरी, प्रत्यक्षात या वीजपुरवठ्यात येणारे अडथळे लपून राहिलेले नाहीत. दुसरे असे की, पुरवठ्यातील अडचणीव्यतिरिक्त सदर वीजपुरवठा हा रात्रीच्या वेळीच अधिक ठिकाणी होत असल्याने थंडीत कुडकुडत व वन्यप्राण्यांचा धोका पत्करून शेतकऱ्यांना शेतात रात्र काढावी लागत आहे. राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक नुकतेच बुलढाणा येथे येऊन गेले. तेथे वीज कंपन्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यात सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत ४२ हजार कोटींची कामे सुरू असल्याचे सांगतानाच सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतीसाठी दिवसा वीज मिळेल असेही ते म्हणाले, पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे रब्बीच्या आशेवर पाणी फेरले जाण्याच्या भीतीतून शेतकरी संतप्त झाले असून, जागोजागी आंदोलनेही सुरू झाली आहेत. कृषी सेवा केंद्र चालकांच्या बंदमुळे बसणारा फटका कमी म्हणून की काय, वीज वितरणातील फटकाही सहन करावा लागतो आहे. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा उपकेंद्रावर धडकून निवेदन देण्यात आले असून, बाळापूर तालुका, तसेच व्याळा, खिरपुरी फिडरच्या तक्रारीही केल्या गेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे काँग्रेसने आंदोलन केले तर शहापूर, वहाळा, बोथा काझी आदी परिसरातील शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी खामगावच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात धडक देऊन अटाळी सब स्टेशनच्या गलथान कारभाराबद्दल निवेदन दिले. वाशिम जिल्ह्यात शेलूबाजारला शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात रास्ता रोको केला तर कामरगावच्या समस्याग्रस्तांनी वीज उपकेंद्रावर धडक देऊन कनिष्ठ अभियंत्याला धारेवर धरले. इतरही ठिकाणी असंतोष वाढीस लागताना दिसत आहे, त्याची वेळीच दखल घेतली जाणे गरजेचे आहे.
सारांशात, नैसर्गिक आपत्तींना इलाज नसतो; परंतु ज्या बाबी आपल्या हातच्या असतात म्हणजे प्रशासनाच्या अखत्यारीत असतात तेथे लक्ष देऊन व्यवस्था सुरळीत राहील असा प्रयत्न केला तर मानवनिर्मित अडचणी टाळता येतात. तसे होत नाही तेव्हा व्यवस्थेविरोधात रोष निर्माण होतो. एखाद्या विभागाच्या अशा अनियमिततेमुळे किंवा दुर्लक्षामुळे शासन व प्रशासनही अडचणीत सापडते. वीजपुरवठ्यातील अडचणीमुळे तशीच वेळ आता येऊन ठेपलेली असल्याने जिल्हा प्रशासनाने यात तातडीने लक्ष पुरविणे अपेक्षित आहे.