धर्मराज हल्लाळे
‘अच्छे दिन’ च्या स्वप्न रंजनात असलेल्या जनतेला इंधन भडक्याने जागे केले आहे. एकुणच शहरातील मध्यमवर्ग पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने हैराण झाला आहे. तर पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस अन् परतीच्या पावसाचीही हमी नसल्यामुळे खरिप पिके करपणार. या सर्व परिस्थितीत सरकारला मात्र बुरे दिन येण्याची शक्यता आहे.
राज्यात आतापर्यंत झालेला पाऊस ८० टक्क्यांवर गेला नाही. सप्टेंबर मध्ये उष्मा एवढा वाढला होता की, आॅक्टोबर हिट म्हणावे की सप्टेंबर हिट असा प्रश्न पडला होता. मराठवाड्यात अधिक भीषण स्थिती असून, सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असलेला प्रदेश दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये ८० टक्के क्षेत्र हे सोयाबीनचे आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असून, शेत शिवारात जमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. हलक्या प्रतिची माती असलेल्या शिवारातील पिके जवळ जवळ करपून गेली आहेत. मुगाच्या राशी मात्र झाल्या आहेत. परंतू, त्यांनाही बाजारपेठेत भाव नाही. हमीभाव केंद्रे सुरु झालेली नाहीत. सण उत्सवाचे दिवस उसणवारीवर करून शेतकऱ्यांनी आभाळाकडे डोळे लावले आहेत. किमान परतीचा पाऊस येईल आणि शेतातील सोयाबीन, खरिपाची पिके तग धरतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी शेतकऱ्यांची आशा मावळली असून, खरिप उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. काही भागात अधुन मधुन झालेल्या पावसामुळे तरलेल्या पिकांची अवस्थाही कुपोषित आहे. पाण्याअभावी सोयाबीनचे दाणे भरली नाहीत.
मराठवाड्यात विशेषत: लातूर जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ८० टक्के आहे. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा आहे. जिल्हा तूर उत्पादनामध्ये राज्यात अग्रेसर आहे. एकट्या लातूर शहरात ९० पेक्षा अधिक डाळमिल आहेत. राज्यातला तुरीचा भाव लातूरमधून निघतो. इतकेच नव्हे बाजार समिती सुद्धा राज्यात अग्रणी आहे. परंतू, पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन बरोबर तूर उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. पिकाची वाढ खुंटलेली आहे.
एकीकडे मराठवाड्यातील मध्यम लघू प्रकल्पांमध्ये २९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा नाही. जो गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही अधिक होता. टंचाईची ही तीव्रता मराठवाड्यात अधिक जाणवणार अशी आजची स्थिती आहे. जलसाठे उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच कोरडे पडतील. ज्यामुळे रबी हंगामही शेतकऱ्यांच्या मदतीला येईल का? हा प्रश्न कायम आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात आले आणि गेले. त्यांनी कुठलीही घोषणा केली नाही. आश्चर्य म्हणजे आजच्या परिस्थितीवर आणि जलसाठ्याच्या आरक्षणाबाबतही प्रशासन स्तरावर हालचाली दिसत नाहीत. अशावेळी शेतकरी एकच प्रार्थना करू शकतो. ती म्हणजे हवामान खात्याचा परतीचा पाऊस न पडण्याचा अंदाज खोटा ठरो.