कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:33 AM2019-03-14T05:33:10+5:302019-03-14T05:34:49+5:30

‘आयत्या पिठावर रांगोळ्या काढणं सोपं असतं’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. राजकीय क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही.

dynasty politics continues sujay vikhe patil and parth pawar to contest lok sabha election | कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का?

कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का?

Next

‘आयत्या पिठावर रांगोळ्या काढणं सोपं असतं’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. राजकीय क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या की, आयाराम-गयारामांचे राजकीय वावटळ उठते. पूर्वी पक्षांतर कायद्याचा अडसर नव्हता, तेव्हा हे वावटळ कधीही उधळायचे, सरकार अल्पमतात यायचे, मुख्यमंत्री बदलले जायचे. सतराव्या लोकसभेची निवडणूक सुरू होताच, अनेक राजकीय घराण्यांतील पहिली नव्हे, तर तिसरी पिढीसुद्धा आता आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्यासाठी पक्ष, तत्त्व, विचारधारा, आदी सर्व गुंडाळून ठेवून पुढे येत आहे. यातून राजकारणाचे गांभीर्यच संपत चालले आहे.

नगर जिल्ह्याच्या राजकारणावर गेली सत्तर वर्षे दबदबा ठेवून असणाऱ्या विखे-पाटील घराण्याचे तिसऱ्या पिढीचे वारसदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेत प्रवेश करण्याची घाई झाली आहे. त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे-पाटील यांनी अनेक वेळा काँग्रेसमध्ये राहूनच बंडखोरी केली. त्यात अपयश आल्यावर शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण करीत केंद्रीय मंत्रीही झाले. त्याच मार्गाने सुजय विखेसुद्धा जात आहेत. ‘अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याचे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर’ अशा बातम्या येत आहेत. शरद पवार यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे दोन शिलेदार निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी निवडणूक लढविणारच, असा निर्धार करताच, शरद पवार यांना माढ्यातून माघार घेऊन कुटुंबातील तीन-तीन उमेदवार नकोत, अशी भूमिका घ्यावी लागली.

काँग्रेस पक्षात घराणेशाही आहे, असा आरोप करणाऱ्या विरोधकांनीही आपली घराणी उभी केली आहेत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर प्रहार करताहेत. बीडचे राजकारण मुंडे घराण्याभोवती, तर जळगावचे खडसे घराण्याच्या अंगणातच खेळले जात आहे. कोणाला झाकावे आणि कोणाचा चेहरा उघडून दाखवावा? नेत्यांच्या वारसदारांनी राजकारण करण्यास कोणाची हरकत असायला नको, पण या नव्या पिढीच्या सर्व उड्या आयत्या पिठावर आहेत. राजकीय तत्त्वज्ञान नाही. विचारधारेशी काही देणे-घेणे नाही. राजकारण करायचे म्हणजे वलय लागते, बळ लागते, धन लागते, या पिढीला हे सर्व आयते मिळाले आहे. त्या जोरावर राजकीय पक्षांनाही तत्त्वज्ञानाशी तडजोड करण्याची ताकद यांच्यात आली आहे.

नगरचे तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले दिलीप गांधी जनसंघापासून भाजपाचे काम करतात. कालपर्यंत जनसंघ किंवा भाजपाच्या तत्त्वज्ञानाशी काही देणे-घेणे नसलेले काँग्रेसी नेत्याचे चिरंजीव म्हणून वावरणाऱ्या सुजय विखे यांच्यासाठी गांधींचा बळी द्यायला भाजपाने क्षणाचाही विचार केला नाही. असे असंख्य कार्यकर्ते वर्षोनुवर्षे राबत असतात. त्यांना घराण्याचे वलय नसते. सत्तेच्या जोरावर धनसंपत्तीची ताकद मागे नसते. त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचे का? नव्या पिढीनेही राजकारण करावे. मात्र, काही विचारधारेची गांभीर्याने मांडणी तरी करावी. यांच्या उड्या या बापजाद्यांनी कमावलेल्या राजकीय, तसेच संपत्तीच्या बळावर मारल्या जातात. अशांना मतदारांनी जागा दाखवायला हवी. केवळ सत्ता मिळविण्याचा धंदा करण्यासाठी या राजकीय उड्या आहेत. राजकीय पक्षसुद्धा हा बाजार मांडण्यास मदत करीत आहेत. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाºया नेत्यांचा बळी द्यायलाही मागे-पुढे पाहिले जात नाही.

साताऱ्याचे उदयनराजे, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आदींना सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचा विचार सोडून उमेदवारी द्यायच्या तयारीत होते. पहिल्या पिढीने तळागाळातील लोकांबरोबर समाज उभारणीचे काम केले होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा घेऊन नव्या भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी ते तत्त्वनिष्ठ राजकारण करीत होते. या आयत्या-रेडीमेड तिसऱ्या पिढीसमोर कोणते स्वप्न आहे? उद्याचा समाज कसा असावा, याचे काही स्वप्न हे पाहतात का? घराण्याच्या मिळकतीवर राजकीय रांगोळ्या काढण्यासाठी त्यात कोणताही रंग भरण्याची त्यांची तयारी आहे, हे लोकशाही प्रक्रिया बळकट होण्यास घातक ठरणार आहे.

Web Title: dynasty politics continues sujay vikhe patil and parth pawar to contest lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.