मॉडर्न 'सोनू'ची नऊवारीतल्या शांताबाईवर मात
By चंद्रशेखर कुलकर्णी | Published: July 26, 2017 02:34 AM2017-07-26T02:34:05+5:302017-08-01T11:36:53+5:30
ती ना ग्रेट कविता आहे, ना सुरीली चाल आहे. तरीही सोनू गाजली. सोशल मीडियावर गिरक्या घेत फिरली. राजकारणानं या विडंबनाची दखल गंभीरपणे घेतल्यानं सोनूचं शेल्फ लाईफ वाढलं. सोनूचा भरवसा अंगावर घेणाºयांचा मात्र ससा झाला!
मुंबईत सध्या ‘सोनू, तुला माह्यावर भरोसा नाय का’ या गाण्यानं धूम उडवून दिली आहे. मलिष्का नावाच्या रेडिओ जॉकीनं हे गाणं वाजवलं आणि ते वाºयाच्या वेगानं व्हायरल झालं. मुंबईतले खड्डे आणि इथल्या रस्त्यावरचा ट्रॅफिक जाम यावर बोट ठेवत केलेलं ते एक साधं सोपं विडंबन होतं. त्यात ना ग्रेट कविता आहे, ना सुरीली चाल आहे. तरीही सोनू गाजली. सोशल मीडियावर गिरक्या घेत फिरली. राजकारणानं या विडंबनाची दखल गंभीरपणे घेतल्यानं सोनूचं शेल्फ लाईफ वाढलं. बरं या सोनूच्या विडंबनाच्या जाळ्यात जशी सत्ताधारी शिवसेना अडकली तसेच विरोधी पक्षही गुरफटले. बहिरी माणसं जशी संशयी होतात, तशी गत अनेक राजकारण्यांची या गाण्याच्या निमित्तानं झाली आहे. ज्यांना नीट ऐकू येत नाही, त्यांना अवती-भवतीचे सारे आपल्याबद्दलच काही-बाही बोलत आहेत, असे सतत वाटत राहते.
गाण्याच्या निमित्तानं मुंबापुरीत जे काही सुरू आहे, ते एका जुन्या गोष्टीतून लख्ख सांगता येईल. याच श्रीमंत शहरात एक होती सोनू. तरुणपणी छान छबकडी होती. तिच्या प्रत्येक विभ्रमात मराठी अस्मितेचा हुंकार होता. मराठी माणसं हा हा म्हणता तिच्यावर लट्टू झाली. इये मराठीचिये नगरी, ही सोनू हृदयसम्राज्ञी झाली. आता सोनूची पन्नाशी उलटली आहे. पण इतकी सारी माया या शहरात गोळा केल्यानंतरही सोनूचा स्वत:वरचाच भरोसा उडायला लागलाय. कुणीतरी रेडिओवर अन् सोशल मीडियावर सोनू तुझा माह्यावर भरोसा नाय काय? हे गाणं वाजवलं अन् सोनूला वाटलं, हे आपल्यावरंच बेतलंय. वाटलं तर वाटलं... तिची फिरकी घ्यायची सोडून सोनूनं विडंबन गंभीरपणानं घेतलं. चर्चेला ऊत आला. हा असा प्रकार बघितल्यावर ऐन जवानीत सोनूवर लट्टू झालेल्यांच्या मनात एक ओळ अवचित येऊ लागली.. सोनू तुझा तुझ्यावर भरोसा नाय काय?
गोष्टीतूनच सांगायचं तर ऐका... एक होता ससा. मुळात घाबरट. पण, रानावनात वाढल्यानं झाला होता धिटुकला. आपण वाघ आहोत असं वाटायला लागल्यानंतर खुशाल माळरानावर खुलेआम चरायचा. एक दिवस चरता चरता त्याच्या पाठीवर पिंपळाचं पान पडलं. त्याला वाटलं आभाळ कोसळलं. वेगानं पळत सुटला अन् ओरडत राहिला. आभाळ पडलं, पळा पळा...!
दुसरीकडे सोनूची गोष्ट भलतीच पॉप्युलर. गावात लै फेमस होती. हिच्या नावानं पब्लिक रिबिनी बांधायला लागलं होतं. रंगही ठरलेलाच. सोनूचे फॅन वर्षाकाठी एकदातरी वाजत गाजत गुलाल उधळत शिवतिर्थावर जमू लागले. काही जणं कमळ घेऊनही अनुनयास गेले. सोनूच्याही मनावर मोरपीस फिरलं. तिचंही मन कावरं बावरं झालं. सोनू गुण्यागोविंदानं पंचवीस वर्ष नांदली. पण आता हेच कमळधारी अधूनमधून तिला विचारतातच... सोनू तुझा माह्यावर भरोसा नाय काय?
आता तर कहर झाला. सशासारख्या सोनूच्या पाठीवर गाण्याचं पान पडलं. ज्या तरुणाईला नावं ठेवण्यात हयात गेली, अशी पन्नाशी ओलांडलेली सोनूची पिढी त्यावर वेगळ्या प्रकारे व्यक्त झाली. जेननेक्स्टनं चार दिवस याचा आनंद लुटला. ते गाणं मागं सोडून नव्या खड्ड्यांमधून त्यांचा पुढला प्रवास सुरूही झाला. पण सोनूची पिढी अजून खड्ड्यातच अडकली आहे. गंमत म्हणून केलेल्या एका बोलगाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला अफाट खाद्य दिलं. मॉर्डन सोनूनं नववारीतल्या शांताबाईवरही मात केली. तारुण्य निघून गेलेल्या राजकारण्यांनी सोनूच्या गाण्याभोवतीच फेर धरलाय. कुणाच्या अब्रुवर घाला घातला गेला, तर विरोधी बाकांवर बसलेल्यांनी सोनूवर भरोसा नसल्याचा ठेका धरला. परिणामी नव्या पिढीला प्रश्न पडलाय... सोनू, तुझं गाणं थांबणार की नाय? त्यांनाच भारुडही खुणावतंय...
आधी होता वाघ्या,
त्याचा झाला पाग्या
तरी त्याचा येळकोट जाईना...