आनंद, सुख-समाधानाच्या व्याख्या अगर संकल्पना या व्यक्तिगणिक बदलणाऱ्या असतात हे खरेच; पण तरी त्यात किमान समान तत्त्वाचा विचार करायचा झाल्यास दुस-याच्या चेह-यावर हास्य निर्मिता आल्याखेरीज यातली कोणतीही बाब साध्य ठरू शकत नाही. आजची परिस्थिती मात्र यापेक्षा काहीशी विपरीत आहे. ‘मी’ व ‘माझ्यातले’ अडकलेपण इतके काही वाढले आहे की दुस-यांचा अगर इतरांचा विचारच केला जाताना दिसत नाही, आपमतलबीपणाचे हे पाश तोडल्याखेरीज खरा आनंद अनुभवता येणे शक्य नाही. यंदाच्या दिवाळीत प्रवाहापासून लांब असलेल्या वंचित, उपेक्षितांच्या जीवनात आनंदाचा उजेड पेरण्यासाठी तेच करायला हवे.
सध्या सगळीकडे दिवाळीची लगबग अनुभवयास मिळत आहे. नाही म्हटले तर, यंदा निसर्गाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळाची छाया असून, मायबाप सरकारकडून दिलाशाची अपेक्षा केली जातेय, त्यादृष्टीने काही निर्णय घेतलेही गेले आहेत. ते पुरेसे नसले तरी बाजारातील वातावरण चैतन्याची चाहुल देणारे आहे. व्यक्तिगत दु:खे, अपेष्टा बाजूला सारून सण साजरे करण्याची आपली परंपरा आहे. प्रसंगी ऋण काढून आपण सण साजरे करीत असतो, कारण यानिमित्ताने कुटुंबातील, समाजातील प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद हा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा-प्रेरणा देणारा असतो. नकारात्मक बाबींच्या अंध:कारावर प्रकाशाचे चांदणे पेरणारा हा सण असल्याने सारेच त्यासाठी उत्सुक असतात. दोन्ही कर जोडोनी उजेडाची उधळण यात होते, घराघरांवर आकाशदीप उजळलेले दिसतात. सारे वातावरण व आसमंतच एका अनोख्या चैतन्याने व मांगल्याने भारणारा हा सण आहे; पण चैतन्याचे, उत्साहाचे व आनंदाचे हे तरंग सर्वव्यापीपणे अनुभवास येताना दिसत नाहीत ही वास्तविकता आहे.
आपण आपल्यातच मशगुल असतो. आपल्यापलीकडे काय चालले आहे, इतरेजण कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला शिवत नसतो. दिवाळीचा सण व त्यानिमित्तचा आनंद साजरा करताना या आपल्यापलीकडल्यांकडे लक्ष देण्याची किंवा त्यांचा विचार करण्याची गरज आहे. आर्थिक विषमतेच्या पातळीवर जे चित्र दिसून येते त्यासंदर्भानेच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे. आनंद अगर समाधानाचे भाव केवळ आपल्या कुटुंबीयांच्या चेह-यावर अथवा मनांमध्ये अनुभवण्यासोबतच विवंचनेत असणा-या, परिस्थितीने गांजलेल्या वंचित, उपेक्षितांबरोबरच विशेषत: काही कारणपरत्वे कुटुंबाने व समाजानेही टाकून दिलेल्यांमध्ये अनुभवता आले तर कुणाचाही आनंद द्विगुणीत झाल्याखेरीज राहणार नाही. शेवटी आनंद हा मानण्यावर असतो असे नेहमीच म्हटले जाते, मग ही मानण्याची प्रक्रिया आपल्याखेरीज इतरांनाही आनंदानुभूती मिळवून देण्याच्या दृष्टीने सुरू करायला काय हरकत असावी? खरा आनंद हा त्यातच असतो.
आपल्या सभोवताली अनेक अप्रिय घटनांचा काळोख दाटला आहे. म्हणून का अवघे विश्व अंध:कारमय झालेले आहे असेही म्हणता येणार नाही. दूर कोठेतरी सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात कार्यमग्न आहेतच ना. ते त्यांच्यापरिने पणती बनून सभोवतालचा अंधार छेदण्याचे कार्य करीत आहेत आणि हिच आशेचे तिरीप म्हणता येईल. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील अनेक बांधव अजूनही मूळ प्रवाहात येऊ शकलेले नाहीत. शहरी भागात आपण दिवाळीच्या फराळाची स्पर्धा करतो; परंतु तिकडे नियमित व आवश्यक त्या जेवणाचीच मारामार असल्याने कुपोषणासारखा विषय सुटू शकलेला नाही. समाजसेवी संस्था व व्यक्ती ‘एक करंजी मोलाची’सारखे उपक्रम राबवून आदिवासी भागात जातात व तेथील वंचितांबरोबर दिवाळी साजरी करतात, अशा संस्था-व्यक्तींना आपण बळ द्यायला हवे. त्यांच्यासोबत आदिवासी भागात जायला हवे. आपल्या या सहृदयतेने आदिवासी बालकांच्या चेह-यावर साकारणारा आनंद हा किती अनमोल वा अवर्णनीय असतो, हे ते प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज कळणारे नसते. अनैतिक संबंधातून जन्मास आलेली मुले कचराकुंड्यांजवळ टाकून दिलेली आढळतात.
अशा मुलांना मायेची ऊब देणा-या संस्था त्यांच्यापरीने दिवाळी साजरी करतातच; पण आपणही आपला आनंद त्यांच्यासमवेत वाटून घेतला तर त्यातून लाभणा-या समाधानाची तुलना करता येऊ नये. हल्ली वृद्धाश्रमे वाढीस लागल्याचे दुर्दैवी चित्र आहे. ज्यांचे बोट पकडून आपण चालू लागलो, वृद्धावस्थेत त्यांचेच बोट सोडून देण्याचे पातक करणारेही समाजात आहेत. त्यासंदर्भातील कारणमीमांसेत जाण्याचा हा विषय नाही; परंतु कुटुंबाकडूनच नाकारल्या गेलेल्यांसमवेत आपण काही क्षण घालवू शकलो, तर ख-याअर्थाने अंध:कारावर उजेडाचे शिंपण घडून येईल. अखेर कारुण्य असते, तिथेच संवेदना जागते. संवेदनशीलताच व्यक्तीला प्रयत्नांच्या मार्गावर अग्रेषित करते. तेव्हा, दीपावलीचा आनंद हा आपल्यापुरता किंवा केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता ज्यांच्या उशाशी दीप लागू शकत नाही अशांसमवेत वाटून घेतला तर ती दिवाळी संस्मरणीय ठरू शकेल. त्यासाठी मनामनांमध्ये त्यासंबंधीच्या जाणिवेचा, संवेदनांचा उजेड पेरूया...