कोरोना संकट काळात प्रवेश परीक्षांचे दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:43 AM2021-06-01T05:43:25+5:302021-06-01T05:45:20+5:30
आजच्या संकटकाळी शिक्षणावर नवकिरणांचा प्रकाशझोत टाकावा. वर्षानुवर्षे परीक्षांचा जो पॅटर्न आहे, तो बदलणे सोपे नाही. सर्वंकष, सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धत अस्तित्वात आहे, ती सक्षम करून व्यापक गुणवत्तेचा शोध घेतला पाहिजे.
दहावीचा तिढा सुटेल, आता बारावीची परीक्षा घ्यायची की नाही, यावर खल सुरू आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. परीक्षा घेतली पाहिजे, त्याशिवाय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार; शिवाय आपण एकामागून एक परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे नुकसान तर करत नाही ना? - ही भावना काहींना सतावत आहे. त्यावर बरेच मंथन झाले आहे. याउलट नवे शिक्षण धोरण तीन तासांच्या परीक्षेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या समग्र, सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा आणि त्यावर आधारित गुणवत्तेचा आग्रह धरणारे आहे. विद्वानांसाठी हा वादविवादाचा विषय असू शकतो. तूर्त कोरोनाने निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीत आपण कसे निर्णय घेणार, हा कळीचा मुद्दा आहे. दहावीचा निर्णय प्रत्येक राज्याने आपल्या स्तरावर घेतला, तर सीबीएसईने घेतलेली भूमिका त्यांच्याशी संलग्न देशभरातील शाळांना लागू झाली. आता बारावीच्या परीक्षेचा निर्णयही त्याच दिशेने जात आहे. मात्र, त्यावर जो काही अंतिम निर्णय येईल तो देशपातळीवर एकसमान असला पाहिजे.
सीबीएसई, आयसीएसई वा त्या-त्या राज्यातील शिक्षण मंडळांचा अभ्यासक्रम भिन्न आहे. त्यांच्या शिक्षणाचे भाषा माध्यम वेगळे आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायची नाही, असे ठरले तर प्रत्येक मंडळाने गुणदान कसे करणार, याचा आराखडा मांडावा आणि तो विद्यार्थी-पालकांना पटवून द्यावा. गुणांकनाची कोणतीही पद्धत सर्वमान्य असणार नाही. त्रुटी निघणार, काढल्या जाणार. दहावीचे झाले तेच बारावीचे होणार आहे. मात्र, कमीत कमी दोष असणारी पद्धत मान्य करून पुढे जावे लागेल. याउपरही ज्यांना गुणांकन मान्य नसेल त्यांना कोरोना स्थितीत सुधारणा झाली की परीक्षा देण्याची मुभा देता येईल. तोपर्यंत पुढील वर्षाचे प्रवेश थांबणार नाहीत. दहावीनंतरचे सर्व अभ्यासक्रम आणि अकरावी प्रवेशासाठी महाराष्ट्रात सीईटी होणार आहे. बारावीनंतरही तोच पर्याय असेल. वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी तर आधीपासूनच नीट, जेईईसारख्या प्रवेशपूर्व परीक्षा आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास निकषपात्र गुण मिळतील, इतपत करतात आणि संपूर्ण लक्ष नीट, जेईईकडे देतात. परंतु, बारावीनंतर केवळ वैद्यकीय आणि अभियांत्रिकी इतकेच शिक्षण नाही. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची पदवी घेणारे विद्यार्थी सर्वाधिक आहेत. याशिवाय अनेक क्षेत्रे खुली होतात. त्या सर्वांचे प्रवेशही अशीच एखादी सीईटी घेऊन द्यावे लागतील. फक्त सरकारने परीक्षांचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे.
विविध ज्ञान शाखांसाठी एकच सामान्यज्ञान परीक्षा घेऊन योग्य निवड केली जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना ज्या विषयात उच्चशिक्षण घ्यायचे आहे, त्याचे कितपत आकलन आहे, याचा आढावा घेतला पाहिजे. त्यासाठी विद्यापीठे आणि संबंधित अभ्यासक्रमाच्या संस्थांना आपापल्या प्रवेश परीक्षा घेण्याची मुभा दिली पाहिजे. हे सर्व परीक्षा रद्द झाली तर विचारात घेता येईल. मुळात परीक्षा घेतलीच पाहिजे वा परीक्षा आजच्या स्थितीत नको, या दोन वेगवेगळ्या भूमिका असणाऱ्यांपैकी कोणालाही विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे नाही. आपली मुले स्पर्धेत मागे पडू नयेत, त्यांचे मूल्यमापन योग्य व्हावे ही प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे सर्वांचेच न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत. तिथे जो दिशानिर्देश मिळेल त्यावर खळखळ न करता विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याकडे लक्ष वळवावे.
परीक्षा घ्यायची असेल तर ती लगेच होणार नाही. त्यामुळे परीक्षा घेण्याच्या बाजूने निकाल आला तर आजच वेळापत्रक देऊन पुरेसा वेळ दिला पाहिजे. परीक्षा रद्द झाली तर गुणदान पद्धती जाहीर करून लवकर निकाल लावणे आणि पुढील सर्व प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षेचा मार्ग अनुसरणे हिताचे आहे. जितकी दीर्घ चर्चा आणि विलंब तितका विद्यार्थ्यांचा छळ केल्यासारखे होईल. विद्यार्थी आणि पालकांच्या कळा पाहून नुसताच कळवळा उपयोगाचा नाही. तत्पर आणि ठाम निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी केवळ सरकारला जबाबदार धरून चालणार नाही. शिक्षणातील धुरीणांनी वेगळ्या वाटा दाखवाव्यात. दहावी, बारावी परीक्षा होणार की रद्द होणार? इतका लहान, तात्पुरता विचार करून थांबू नये. आजच्या संकटकाळी शिक्षणावर नवकिरणांचा प्रकाशझोत टाकावा. वर्षानुवर्षे परीक्षांचा जो पॅटर्न आहे, तो बदलणे सोपे नाही. सर्वंकष, सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धत अस्तित्वात आहे, ती सक्षम करून व्यापक गुणवत्तेचा शोध घेतला पाहिजे. परीक्षेतून पाठांतर नव्हे, ज्ञानदर्शन झाले पाहिजे. त्यादिशेने जाताना कोरोना प्रादुर्भावाने रद्द होणाऱ्या परीक्षांना मागे सोडून प्रवेश परीक्षांच्या दिवसाचे स्वागत करूया !