संपादकीय - स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:27 AM2019-08-15T06:27:46+5:302019-08-15T06:28:00+5:30
मोदी सरकारच्या प्रगतीचा वेग मोठा आहे. मात्र या काळात देशातील सर्वधर्मसमभावाची सद्भावना लोप पावताना दिसली आहे. राष्ट्रीय उत्पन्नात घट येत आहे आणि देशात बेकारांची संख्या साडेसात कोटी एवढी प्रचंड झाली आहे.
१५ आॅगस्ट १९४७ ची पहाट. रात्रीचे १२ वाजून अवघा १ मिनिट झाला आहे. भारताच्या घटना समितीतील सारे सभासद येणाऱ्या जबाबदारीच्या जाणिवेने गंभीर आणि उत्सुक. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याचे स्वागत करायला व्यासपीठावर येतात. त्यांच्या चर्येवर गेल्या २७ वर्षांच्या सत्याग्रहाचा, तुरुंगवासाचा आणि लोकलढ्याचे नेतृत्व केल्याचा थकवा आहे. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे जमली आहेत. ते बोलायला सुरुवात करतात आणि सारे चित्र एका क्षणात पालटते. त्यांचा थकवा जातो, ती वर्तुळे दिसेनाशी होतात आणि नेहरू स्पष्ट आवाजात बोलू लागतात. ‘फार वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला आहे. या देशातील जनतेची सेवा करून तिचे सर्वांगीण कल्याण करण्याची त्यात प्रतिज्ञा आहे. हा करार पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपल्याला यापुढे कष्ट करावे लागणार आहेत.
स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे. तो देशाचा केवळ अलंकार नव्हे.’ नेहरूंचे हे ऐतिहासिक शब्द सारा देश जागेपणी ऐकत होता. देश स्वतंत्र झाला होता आणि त्याच्या लाल किल्ल्यावरील ब्रिटिशांचे युनियन जॅक हे निशाण उतरून त्या जागी भारताचा तिरंगी झेंडा फडकू लागला होता... नेहरूंचे सरकार स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून कामाला लागले. जबाबदाºया मोठ्या होत्या आणि त्या कित्येक शतकांपासून चालत व वाढत आल्या होत्या. सत्तेवर येताच देशातील दारिद्र्य, उपासमार व दुष्काळ यांच्याशी लढण्याचे काम नेहरूंच्या सरकारने हाती घेतले. काही काळातच देशातील दुष्काळावर मात करता आली. ज्या देशात सुतळीचा तोडा वा साधी टाचणी तयार होत नव्हती त्यात रेल्वे इंजिने बनू लागली. बोकारो व भिलाई येथे पोलादाचे अजस्त्र कारखाने उभे राहिले. भाकरा-नांगल व हिराकुंडसारखी जागतिक कीर्तीची धरणे उभी झाली. देशाचे औद्योगिक उत्पन्न १० वर्षांत २० टक्क्यांनी वाढले. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याहून महत्त्वाची बाब ही की पूर्वी कधी न अनुभवलेली घटनात्मक लोकशाही त्याच्या अंगवळणी पडली. निवडणुका होऊ लागल्या आणि लोकांनी निवडलेली सरकारे सत्तारूढ होऊ लागली. दारिद्र्य, अभाव व बेकारी असतानाही जनतेला घटनेने दिलेले मूलभूत अधिकार कायम राहिले.
पाकिस्तानचा पराभव करून नेहरूंच्या सरकारने काश्मीर राखले. ते करीत असतानाच जगातील दीडशेवर तटस्थ राष्ट्रांचे नेतृत्व करून नेहरू तिसºया जगाचे पहिल्या क्रमांकाचे नेते झाले. साºया महाशक्तींशी चांगले संबंध राखून त्यांना हे यश अल्पावधीत मिळविता आले. नेहरूंचा हा आदर्श पुढे लाल बहादूर शास्त्री व इंदिरा गांधींच्या सरकारने १९७५ च्या आणीबाणीपर्यंत चालविला. नंतरच्या १९८४ मध्ये झालेल्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात अस्थिरता आली. निवडणुका होत राहिल्या मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे येत राहिली आणि ती अस्थिरही राहिली. ही स्थिती २०१४ पर्यंत कायम राहिली. आज देशात पाठीशी मोठे बहुमत असलेले नरेंद्र मोदींचे सरकार अस्तित्वात आहे. त्याच्या प्रगतीचा वेग मोठा आहे. मात्र या काळात देशातील सर्वधर्मसमभावाची सद्भावना लोप पावताना दिसली आहे. राष्ट्रीय उत्पन्नात घट येत आहे आणि देशात बेकारांची संख्या साडेसात कोटी एवढी प्रचंड झाली आहे.
मोदींचे सरकार या साºया प्रश्नांना उत्तरे देण्यात आणि देशाची अर्थव्यवस्था सावरण्यात व्यस्त आहे. मात्र धार्मिक व सामाजिक तणावांना आवर घालण्यात त्याला फारसे यश येताना दिसत नाही. जे नेहरूंना फाळणीनंतर साधले, शास्त्रीजींना युद्धानंतर जमले, इंदिरा गांधींना पाकिस्तानचे तुकडे केल्यानंतर करता आले ते करून दाखविणे व देशात पुन्हा एकवार धार्मिक व सामाजिक सद्भाव उभा करणे हे मोदींच्या सरकारसमोरील आताचे सर्वांत मोठे आव्हान आहे. सरकारच्या हेतूविषयी शंका घेण्याचे कारण नाही. मात्र त्यातील काही नेते व कार्यकर्ते यांचे मनसुबे शंका घेण्याजोगे आहेत. त्यांना आळा घालून जनतेला शांतता व सद्भावाचे आश्वासन देणे हे आजच्या स्वातंत्र्य दिनाचे उत्तरदायित्व आहे. ते सर्व शक्तिनिशी पार पाडण्याचे बळ सरकारला व राजकारणाला देवो, ही सदिच्छा.