काही दिवसांपूर्वी माझ्या योग शिक्षकांनी मला आश्चर्याचा धक्काच दिला. हे तरुण गृहस्थ धार्मिक वृत्तीचे हिंदू असून सनातन धर्माशी निष्ठा दाखवत असतात. शिवाय पक्के शाकाहारी. सगळे हिंदू सण उत्साहाने साजरे करतात. प्रार्थना, ध्यानधारणा यात पुष्कळ वेळ घालवतात. “रामाच्या नवरात्रात दिल्लीत मांस खाण्यावर बंदी आणण्यात आली हे तुम्हाला नक्की आवडले असेल” असे मी त्यांना सहज म्हणालो.तर माझ्या योग गुरूंनी क्षणभर विचार केला. मग ते उत्तरले, “सर, मांसाहारावर बंदी आणल्याने काय होणार आहे? बाकी काही नाही, दोन धर्मांमध्ये वादाची ठिणगी पडावी म्हणून हे सारे चालू आहे, हे सगळ्यांना कळते; पण मला भीती याची वाटते की या आगीत मुस्लिमांबरोबर हिंदूही भाजून निघतील. हा असा वेडेपणा लवकर थांबवला गेला नाही तर उभा देश पेटलेला असेल. ते कोणाच्याच हिताचे नाही.”- आत्मघातकी अतिरेकीपणा सामान्य हिंदुंनाही नको आहे हे माझे मत या गृहस्थांच्या उत्तराने पक्के झाले. बऱ्याचशा हिंदूंच्या मनात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे हे खरे. त्याचे कारण, याआधी धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक झाला ! राजकीय लाभासाठी मुस्लिमांचे तुष्टीकरण केले गेले याचा अनेकांना राग आहे. हिंदू व्यक्तिगत कायदाच का बदलला गेला? इतर धर्मियांना स्पर्श का केला गेला नाही? केवळ हिंदू मंदिरेच सरकारी निगराणीखाली का? बाकीच्यांची का नाहीत? शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वटहुकूम काढून का डावलला गेला? काश्मिरी पंडितांना देशोधडीला लागावे लागले तेव्हा धर्मनिरपेक्षतावाले गप्प का होते? - अशा प्रश्नांची यादी मोठी आहे. ते योग्यही आहेत. त्यांची उत्तरेही दिली जायला हवीत.- परंतु अनेक हिंदूंना हे व्हावे असे वाटत असताना कट्टरपंथीय भक्त सोडले तर कोणालाही त्यासाठी उभ्या देशाला आग लागली तरी चालेल असे मात्र नक्कीच वाटणार नाही. यातून सारा देश अराजकाकडे ढकलला जाऊ शकतो. अस्थैर्यातून कारभार ढासळून आर्थिक प्रगती खुंटू शकते.सामान्य माणसाचे जीवित धोक्यात येऊ शकते. धर्मावर भेदभाव न करणारे, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण न करणारे, आणि हिंदू संस्कृतीमधील चांगल्या गोष्टींना मान्यता देणारे सरकार हिंदूंना हवे आहे. निवडणुकीतला अल्पकालीन फायदा मिळविण्यासाठी देशाला अराजकाकडे नेणारे सरकार त्यांना नको आहे. हिंदूंना इतर धर्मीयांप्रमाणे संरक्षण हवे आहे; पण त्यांच्या रखवालीचा बहाणा करून निवडणुका जिंकणारे सरकार त्यांना नको आहे.सध्या देशात उत्पादन क्षेत्रात घट दिसतेय.शेतीत कुंठीत अवस्था आहे. साट्यालोट्याची भांडवलशाही बोकाळलीय, भाववाढ, बेरोजगारी अशा प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी सत्तारुढ पक्ष हिंदू मूलतत्त्ववाद वापरतो हेही हिंदूंना कळते. २० कोटी मुस्लीम देशभर विखुरलेले असल्याने सहिष्णुता आणि सहअस्तित्वाला पर्याय नाही हे सजग, सुबुद्ध हिंदू जाणतात. आर्थिक वाढ आणि प्रगतीसाठी सलोखा आणि स्थैर्य आवश्यक आहे.स्वत:शीच लढणारा देश प्रगती करू शकणार नाही. जाती जमाती कायम एकमेकांशी लढत राहिल्या तर आपल्या मुलाबाळांचे भविष्य धोक्यात येईल हे हिंदुंना कळते. इमानाने कारभार करायचे सोडून अशांतीच्या ज्वाळा भडकावू पाहणारे राजकीय पक्ष सामान्य माणसाला ओलीस ठेवणार आहेत. म्हणूनच हरिद्वारच्या धर्मसंसदेत भडकावू भाषणे झाली तेव्हा भाजपतल्या मूठभर लोकांना वाटत होते त्याच्या विपरित सामान्य हिंदुंची भावना होती. ‘सबका साथ सबका विकास’ ही पक्षाची घोषणा असूनही भाजपच्या एकाही नेत्याने भडकावू विधानांचा निषेध केला नाही याचा सामान्य लोकांना धक्का बसला. हरिद्वारला अशी भाषणे देणाऱ्यांपैकी एकाला अटक करायला सरकारने तब्बल महिना लावला याचेही आश्चर्य लोकांना वाटले नाही. या द्वेष मेळ्यातला एक आरोपी यती नरसिंहानंद याला जामीन कसा मिळाला? - याचे अनेकांना कोडे पडले आहे. कारण असे काही करणाऱ्या इतरांना जालीम कायद्याची कलमे लावली जातात. जामिनासाठी घातलेल्या अटीचे उल्लंघन करून हे यती नरसिंहानंद आणखी एक भडकावू भाषण करते झाले. त्यांना लगेच अटकही झाली नाही. एका धर्माच्या लोकांनी अन्य धर्मीय महिलांवर बलात्कार करावेत असे वक्तव्य दुसरे एक संत बजरंग मुनी दास करते झाले याचाही लोकांना रागच आला. हिंदूच नव्हे, जहाल मुस्लीम नेतेही अशी वक्तव्ये करत असतील तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे असेच सर्वसामान्य नागरिकांना वाटते. हिजाब, हलाल, झटका, शाकाहार, उर्दूचा वापर, लव्ह जिहाद, मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी, हिंदू महिलांना पोषाख संहिता यासारख्या द्वेष भारित उपद्व्यापांना लोक कंटाळले आहेत. हा सनातन धर्म वहाबीसारख्या पंथात रुपांतरित करण्याचा प्रयत्न असफल होणार आहे.- आपल्या धर्माचे रक्षण कसे करायचे हे हिंदू जाणतात. तसे नसते तर तो इतकी वर्षे टिकलाच नसता. जातीय दंगे, अस्थैर्य, बुलडोझर्सचा बेकायदा वापर,घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली, द्वेषपूर्ण भाषणे, न थांबणारा हिंसाचार, कायदा खुंटीला टांगणे यातले काही म्हणजे काहीच लोकांना नको आहे... भले निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांना ते सारे हवे झालेले असले, तरीही!
या आगीत मुस्लिमांसह हिंदूही भाजून निघतील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 9:19 AM