- धर्मराज हल्लाळे
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले. बहुतांश लोक एका बाजूचे आहेत म्हणून त्यांचा विचार वा कृती सर्वमान्य असावी असे नाही, हेच न्यायालयाने नमूद केले होते. त्यानंतर सण-उत्सवातील डीजेला तूर्त बंदी घालताना उच्च न्यायालयानेही शासन यंत्रणेची कानउघाडणी केली. त्यावर अंतिम निर्णय यायचा असला तरी न्यायालयाने सर्वच सण-उत्सव काळात होत असलेल्या गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करुन पाठ फिरवू शकत नाही, असे म्हटले आहे. एकंदर उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने जावा ही न्यायालयाची भुमिका आहे.
विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण घेतो. स्वाभाविकच थोर परंपरा आपला सांस्कृतिक वारसा समृद्घ करीत असतात. विविधतेत एकतेचा नारा आपण देतो. अर्थात इतरांच्या विचारांचा, श्रद्घेचा सन्मान करीत आपण आपले विचार आणि श्रद्घा जपली पाहिजे हे अभिप्रेत आहे. विविध समाजातील सण, श्रद्घा या ज्याच्या त्याच्या खाजगी आयुष्याचा भाग आहेत. राज्यघटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाच्या धर्म उपासनेचे स्वातंत्र्य अबाधित राहिल, यासाठी सर्वांनी कटिबद्घ राहिले पाहिजे. मात्र, सार्वजनिक उत्सव साजरे होताना इतरांच्या स्वातंत्र्याचा, हक्काचा संकोच होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्याच हेतूने घटनादत्त तरतुदींचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाचे भक्कम कवच आहे.
कोणत्याही सार्वजनिक उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने गेला पाहिजे. आज लोकजागरण होत आहे. पर्यावरणपूरक उत्सवाकडे लोक वळले आहेत. शासनही प्रोत्साहन देत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही अनेक मंडळे समाजोपयोगी उपक्रम राबविताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांनी वर्षभरापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम केले. यंदा राज्यातील नामांकित गणेश मंडळांनी ३७० मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या आवाहनाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. राज्यातील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषदांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’चे आवाहन केले होते. त्यासाठीही हजारो गावांनी पुढाकार घेतला.
गणेश मंडळांनी देखाव्यांमधून सामाजिक प्रश्न मांडले. हे सर्व व्यापक पातळीवर होत आहे. परंतु ही प्रबोधनाची गती अधिक वेगाने वाढली पाहिजे. ज्या बांधिलकीतून सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचा पायंडा निर्माण झाला, त्या बांधिलकीशी सर्वांनी स्वत:ला जोडून घेतले पाहिजे.